आषाढी शुद्ध एकादशी ते कार्तिकी शुद्ध एकादशी , साधारण चार महिन्यांच्या या पवित्र काळाला हिंदू धर्मात ” चातुर्मास ” असे संबोधतात . आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी , या दिवसापासून भगवान विष्णू आपल्या शेषशायी शय्येवर क्षीरसागरात विश्राम करतात, म्हणूनच हिला देवशयनी एकादशी म्हणतात .
आता सृष्टीचा पालनकर्ता, भगवान विष्णू जर थोडे पहुडले आहेत तर आपण प्राणिमात्रांचा दानवी शक्तींपासून बचाव होण्यासाठी , चातुर्मासात आपापल्या इष्ट देवतेचे स्मरण आणि पूजन करावे असे म्हटले जाते! ( संदर्भ : ” सासू सुनेची संपूर्ण चातुर्मास मेन्यू डायरी ” –
अंतरात्म्यातील वाईट प्रवृत्तींवर विजय मिळवण्यासाठी , सात्त्विकतेचे आचरण अंगिकारण्यासाठीच जणू हा चातुर्मास निरनिराळ्या सणांनी आणि व्रत वैकल्यांनी बहरून असतो. सण म्हणजे उगाचच धर्माच्या बेड्या नाहीत तर आनंद पसरवण्याचा , एकत्र राहण्याचा मार्गच !
या चातुर्मासातील श्रावणाचा महिना हा लेखक ,कवींपासून ते सामान्य माणसे , पशुपक्ष्यांपर्यंत सगळ्यांचा लाडका ! ” श्रावणात घन निळा बरसला , रिमझिम रेशीम धारा , उलगडला झाडांतून अवचित हिरवा मोरपिसारा ” फुलवत हा श्रावण नाचत नाचत , बरोबर सणासुदींची लयलूट घेऊन येतो!
नागपंचमी हा श्रावणातला पहिला सण ! बालरूपी श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहाला विषारी करणाऱ्या उन्मत्त कालिया नागाला याच दिवशी पराजित केले . त्याच्या डोक्यावर नर्तन करून त्याचा अहंकार धुळीस मिळवला , ही गोष्ट विष्णुपुराणात ” कालिया मर्दन ” म्हणून आपणां सर्वाना माहीतच आहे ! अहंकार हारून हा कालिया नाग देवाकडे क्षमेची याचना करितो , आणि “शरण आलेल्यांना कधी देऊ नये मरण “ या उक्तीला साजेसेच भगवान श्रीकृष्णाचे वर्तन! भगवान विष्णू या शेष नागाच्या अवाढव्य फण्यावर आपल्याला विसावलेले माहीतच आहेत . असे म्हणतात ही सारी भूमी शेषनागाने आपल्या डोक्यावर पेलली आहे!
महाराष्ट्र हे कृषी प्रधान राज्य! साप हा तसा विषारी , एरवी पाहिल्यावर भीतीने एखाद्याची गाळण उडेल असा भूचर ! परंतु आपल्या बळीराजाचा हा खरा मित्र ! शेतात तुम्हाला एखादेतरी वारुळ दिसेलच ! जमीन भुसभुशीत करण्यास सापांची खूप मदत होते , तसेच जे प्राणी शेताची नासाडी करतात , जसे उंदीर, घुशी …यांचा साप हा कर्दनकाळ!
म्हणून शेतकरी बंधू भगिनी आपल्या या मित्राचे आभार मानण्यासाठी हा नागपंचमीचा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात . महाराष्ट्रात स्त्रिया नागाला भाऊराया मानून पाटावर नागाचे चित्र काढून साग्रसंगीत पूजा करतात . खेडोपाड्यांत जिथे नागाचे वारूळ आहे तिथे सवाष्ण स्त्रिया पूजेचे आणि प्रसादाचे ताट घेऊन जमा होतात . काही पारंपरिक खेळ खेळले जातात आणि नागाची महती सांगणारी गीते गायली जातात ! तुम्ही ” हळद रुसली कुंकू हसले ” मराठी चित्रपट पाहिलाय का हो .. आता काहीजण हसतील , परंतु मला हा चित्रपट खूप आवडतो , त्यात नायिकेच्या रडूबाई इमेजला फाटा देत तिला धाडसी आणि स्वतंत्र विचारांची दाखवली आहे . या चित्रपटात एक सुंदरसे नागपंचमी विशेष गाणे आहे , सडसडीत बांध्याची देखणी सुंदरा , अश्विनी भावे पिवळीधमक साडी नेसून सख्यांसोबत नागाच्या पूजेला जाताना दाखवलीय.
” वारुळाला जाऊया, नागोबाला पुजूया !
शिवशंभुचा हार गळ्यातील तू भूमीचा राजा ,
हे नागराजा , तुझी आज आली नागपंचमी !
कधी वेळ मिळाला तर हे गाणे नक्की पहा ,युट्युब वर आहे , खूप सुंदर पारंपारिक रित्या चित्रीकरण केले आहे !
शहरांत गारुडी सापांना पकडून त्यांना त्रास देऊन पैसा कमावण्यासाठी जे थोतांड उभे करतात त्याला मात्र माझा पक्का विरोध आहे . माझी आई पाटावर शेषनागाचे चित्र काढून त्याला फुले वाहून पूजा करते आणि तीच पद्धत मीही पाळते .
या सणामागचा उद्देश महत्त्वाचा , आपल्याला मदत करणार्याची आपण जाणीव ठेवली पाहिजे इतकाच ! म्हणूनच शेतकरी बांधव आजच्या दिवशी जमीन खणत किंवा नांगरत नाहीत. संपूर्ण महाराष्ट्रात आजच्या दिवशी तळलेले खाणे , तव्याचा वापर करून केलेले खाणे , विळीवर चिरणे अशा गोष्टी जाणीवपूर्वक टाळल्या जातात ! उकडलेला , वाफेवर शिजवलेला नैवेद्य नागदेवतेसाठी बनवला जातो ! आमच्या रत्नागिरी बाजूला उकडीचे मोदक , हळदीच्या पानातले पातोळ्या, गोड सुरळी वड्या असे पदार्थ बनवले जातात , काही लोक खोबरे सुद्धा आदल्या दिवशी किसून सारण तयार करतात . असाच एक पदार्थ महाराष्टात खास नागपंचमीसाठी प्रसिद्ध आहे , तो म्हणजे ” पुरणाचे दिंड” ! आयताकृती दिंडीच्या आकाराचे हे दिंड मोदकपात्रात उकडून बनवतात आणि आमच्या विठाताई सांगत होत्या की गावी मोदकपात्र वगैरे नसल्यामुळे चुलीवर एका तपेल्यात पाणी गरम करून ते तपेले पूर्ण चाऱ्याने भरतात आणि त्यावर केळीच्या पानात हे दिंड उकडले जातात ! मराठी माणसांना पुरणावरणाचा स्वयंपाक म्हणजे पर्वणीच , आणि हे दिंड खायला खूपच छान लागतात !
मग या नागपंचमीला करताय ना पुरणाचे दिंड !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा

- १ कप = २०० ग्रॅम्स चण्याची डाळ , स्वच्छ धुऊन किमान २ तास पाण्यात भिजवून , त्यानंतर पाणी काढून टाकणे
- १ कप = २०० ग्रॅम्स किसलेला गूळ ( साधा गूळ घ्यावा , चिक्कीचा नाही )
- अर्धा टीस्पून वेलची पावडर
- अर्धा टीस्पून सुंठ पावडर
- दीड कप = २२५ ग्रॅम्स गव्हाचे पीठ
- १ टीस्पून मीठ किंवा चवीनुसार
- तूप गरजेप्रमाणे
- २ टेबलस्पून तेल
- सगळ्यात पहिल्यांदा आपण पुरण शिजवून घेऊ. त्यासाठी आपण १ कप चणा डाळ शिजवण्यासाठी ३ कप पाणी उकळत ठेऊ. त्यात भिजवून पाणी काढलेली चणा डाळ घालून मंद ते मध्यम आचेवर झाकण घालून शिजवावी. साधारण २० मिनिटांत चण्याची डाळ शिजते . हाताने दाबून शिजलीये की नाही ते पाहावे. गॅस बंद करून डाळीचे पाणी चाळणीतून गाळून वेगळे काढावे . या पाण्याची आपल्याला कटाची आमटी बनवता येईल .
- एका कढईत शिजलेली चण्याची डाळ आणि किसलेला गूळ घालून मंद आचेवर शिजू द्यावे.
- जसेजसे गूळ वितळू लागेल तसतसे एका मॅशर ने डाळ आणि गूळ एकत्र जाडसर घोटून घ्या. पुरणपोळीसाठी आपण पुरण शिजल्यावर मऊसूत वाटून घेतो . परंतु दिंडासाठीचे पुरण जाडसर असावे. म्हणून कढईतच शिजताना पुरण जाडसर घोटून घ्यावे.
- मध्यम आचेवर पुरण जरासे कोरडे होईपर्यंत शिजवावे. पुरण पातळ राहू देऊ नये नाहीतर ते दिंडात भरणे अशक्य होईल . मग वेलची पावडर आणि सुंठ पावडर घालून नीट एकत्र करून घ्यावे. गॅस बंद करून कढई खाली उतरवावी . पुरण थंड होऊ द्यावे.
- तोपर्यंत दिंडासाठी कणिक मळून घेऊ. एका खोलगट भांड्यात गव्हाचे पीठ , मीठ घालून एकत्र करून घ्यावे. त्यात २ टेबलस्पून कडकडीत गरम तेलाचे मोहन घालावे. नीट पिठात चोळून घ्यावे. असे केल्याने दिंड खुसखुशीत होतात आणि खाताना चिकट किंवा गिळगिळीत लागत नाहीत.
- पाणी घालून कणिक घट्ट मळून घ्यावी , जशी आपण पुरीसाठी मळतो तशीच ! मी अर्धा कप पाणी वापरले आहे कणिक मळण्यासाठी. ही कणिक किमान १५ मिनिटे तरी झाकून मुरू द्यावी.
- १५ मिनिटांनंतर परत एकदा कणिक चांगली दाब देऊन मळून घ्यावी . एका छोट्या लिंबाएवढे गोळे करून घ्यावेत . इतके चांगले दाब देऊन गोळे बनवावेत की त्यावर भेगा नाही राहिल्या पाहिजेत! हाताला तूप लावून गोळे मळून घ्यावेत.
- आता आपण दिंडासाठी पातळ पाऱ्या लाटून घेऊ. पोळपाटावर तुपाचा हात लावून एका पुरीच्या जाडीएवढ्या गोल पाऱ्या लाटून घेऊ. लाटण्यासाठी पीठ वापरू नये.
- जितक्या आकाराचा कणकेचा गोळा घेतला होता साधारण तेवढाच पुरणाचा गोळा घ्यावा .नीट गोल करून पारीच्या मध्यभागी ठेवावा . दिंड हे आयताकृती असतात . म्हणून पारीची वरची आणि खालची दोन्ही टोके दुमडून मध्यभागी चिकटवावीत. तसेच बाजूची दोन्ही टोके देखील मध्ये चिकटवावीत. असे दिंडाचे आयत तयार करून घ्यावेत. एका ताटलीत तुपाचा हात लावून त्यात तयार केलेले दिंड ठेवावेत .
- मोदकपात्रात पाणी उकळत ठेवावे. मोदकांच्या थाळीला ( भोके असतात ) तुपाचा हात लावावा व दिंड एका बाजूला एक असे लावून घ्यावेत . चिकटवून ठेवू नये , थोडे अंतर दोन दिंडाच्या मध्ये ठेवावे. कारण जसजसे दिंड उकडले जातात तसे ते प्रसरण पावतात आणि एकमेकांना चिकटूशकतात !
- पात्रात पाणी उकळले की आच मध्यम करावी आणि दिंड १८ ते २० मिनिटे व्यवस्थित वाफवून घ्यावेत . दिंड शिजल्यावर त्यांचा रंग थोडा बदलतो आणि एका एका सुरीच्या साहाय्याने दिंड शिजले असल्याची खात्री करू शकता !
- हे दिंड गरम गरम साजूक तुपाची धार घालून खावयास द्यावे !

Leave a Reply