“राम ही तो करुणा में हैं, शान्ति में राम हैं
राम ही हैं एकता में, प्रगती में राम हैं
राम बस भक्तों नहीं, शत्रु की भी चिंतन में हैं
देख तज के पाप रावण, राम तेरे मन में हैं
राम तेरे मन में हैं, राम मेरे मन में हैं
राम तो घर घर में हैं, राम हर आँगन में हैं
मन से रावण जो निकाले, राम उसके मन में हैं !”
चैत्र नवरात्राची सांगता रामनवमी साजरी करूनच होते ! रामजन्माचा हा उत्सव ..!
“राम” या शब्दाचा नेमका अर्थ तरी काय ? संस्कृतात “र ” म्हणजे प्रकाश , ऊर्जा, सूर्य हा ऊर्जेचा स्रोत म्हणून त्याला “र ” असेही संबोधले जाते. “म” म्हणजे आत्मा ! आत्म्याचा परमात्म्यापर्यंतचा प्रवास म्हणजेच जीवन राममय !
रामायण आणि महाभारत यांतला फरक माझ्या अलीकडेच वाचनात आला , बघा हं किती सुंदर ओळ आहे , ” महाभारत आपल्याला शिकवते कि जीवनात कोणत्या गोष्टी करू नयेत , आणि रामायण आपल्याला जीवन कसे जगावे , कोणत्या गोष्टी कराव्यात हे शिकवते! ” .
आपण उद्या रामनवमी साजरी करणार आहोत. तर या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी काही विशेष गोडधोड तर बनवले पाहिजेच !
महाराष्ट्राची आन बान आणि शान असलेली पुरणपोळी ही प्रत्येक सणाचे आकर्षण! मऊसूत पुरणाने गच्च भरलेली , सोनसळी रंगाची , नाजूक किंचित जाडसर लाटलेली पोळी जेव्हा तव्यावर साजूक तुपात खमंग भाजली जाते ना तेव्हा त्या खरपूस सुवासाने घरातील कोपरा ना कोपरा मंगलमय होऊन जातो! पुरणपोळी म्हणजेच आनंदोत्सव हे जणू महाराष्ट्रात समीकरण ठरलेलेच ! माझी आजी सांगायची , जर मुलीला पोळ्यांचा स्वयंपाक सहज जमत असेल तर ती सुग्रण, सून म्हणून घरात आलीच म्हणून समजा ! बरं ही पुरणपोळी महाराष्ट्रातच नाही तर गुजरात, केरळ आणि कर्नाटकमध्ये सुद्धा बनवली जाते. माझ्या कर्नाटकातल्या वास्तव्यात कॉलेजमधल्या जुनिअरने त्याच्या घरी बनवलेली “होळिगे ” -आपल्या पुरणपोळीचे कर्नाटकी नाव, आणली होती माझ्यासाठी! आपल्या पुरणात चणा डाळ महत्त्वाची तसे गुजरातेत तुरीच्या डाळीचे पुरण घाटले जाते. कोणी नुसत्या मैद्याच्या किंवा कणकेच्या पोळ्या बनवते तर आमच्या कोकणात मैदा आणि कणिक दोन्ही मिसळून पोळ्या बनवतात, मैदा अंमळ जास्तच जरा!
आपल्या महाराष्ट्रातच तिला विविध नावांनी संबोधले जाते , खान्देशाचे मांडे ऐकलेच असेल तुम्ही! चुलीवर खापरावर भाजलेले भले मोठे मांडे बनवताना लागणारे कौशल्य वाखाणण्यासारखे आहे ! अहो आपल्या संतांनाही पुरणपोळीचा मोह नाही आवरला हो, पूर्ण गावाने मांडे भाजण्यासाठी खापर देण्यास नकार दिल्यावर हिरमुसलेल्या मुक्ताईचा पडलेला चेहरा ज्ञानोबाला नाही हो पाहवला ! आपल्या भावंडांसाठी हे मांडे ज्ञानरायांच्या पाठीवर मुक्ताईने बनवले! अलौकिक बंधू-भगिनी प्रेम!
लहान मोठा , राव रंक सगळ्यांच्या घरात सणासुदीला बनणारी ही पुरणपोळी , प्रत्येक जण आपापल्या आवडीप्रमाणे दूध, नारळाचे दूध, श्रीखंड, तूप, आणि कटाची आमटी खातात ! आमच्या मांसाहेब तर जाणूनबुजून थोड्या जास्त बनवून दुसऱ्या दिवशी त्या शिळ्या पुरणपोळ्या चहासोबत मिटक्या मारत खातात !
आता मला असे वाटतेय एवढे वर्णन वाचल्यावर तुम्हालाही वाटायला लागलेय ना , की पुरणपोळीचा घाट घातलाच पाहिजे लवकर ! मग चला तर लागू कामाला!
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा

- १ कप चणाडाळ= २५० ग्रॅम्स , स्वच्छ धुऊन , कमीत कमी २ तास पाण्यात भिजवून ठेवावी
- १ कप किसलेला गूळ= २५० ग्रॅम्स
- पाऊण कप मैदा =१५० ग्रॅम्स
- १/२ कप गव्हाचे पिठ = १०० ग्रॅम्स
- १/२ टीस्पून हळद
- १/४ टीस्पून मीठ
- ३-४ हिरव्या वेलच्या
- १ छोटा जायफळाचा तुकडा
- १/२ टीस्पून सुंठ पावडर
- १/२ टीस्पून बडीशेप
- थोडे केशराचे धागे
- तेल
- तूप
- तांदुळाचे पीठ
- सर्वप्रथम चण्याची डाळ शिजवण्यासाठी एका पातेल्यात ५ कप पाणी उकळत ठेवावे . चणा डाळ १ कप घेतल्याने तिच्या ५ पट पाणी घ्यावे. पाण्याला उकळी आली की त्यात भिजवलेली डाळ घालून मंद ते माध्यम आचेवर झाकण घालून शिजू द्यावी.
- पोळ्यांसाठी पीठ भिजवून घेऊ. मैदा, गव्हाचे पीठ, मीठ आणि हळद घालून एकत्र मिसळून घ्यावी. हळदीने पोळ्यांना फार सुंदर रंग येतो . १ टेबलस्पून तेल घालून पिठात चांगले रगडून घ्यावे जेणेकरून पोळ्या खुसखुशीत होतात .
- थोडे थोडे पाणी घालून पोळ्यांची कणिक चांगली तिंबून घ्यावी. फार जास्त मऊ किंवा घट्ट असे पीठ मळू नये. पीठ मळताना मी ३/४ कप पाणी वापरले आहे . पीठ जरासं मुलायम झाले कि त्याला २ टीस्पून तेलाचा हात लावून चांगले रगडून घ्यावे. ह्या पिठाचा गोळा १ तास झाकून मुरू द्यावा.
- चण्याची डाळ मंद आचेवर अर्ध्या तासात शिजते . डाळीचा दाणा हाताने दाबून बघावा, लगेच पिठुळ झाला तर समजावे कि डाळ शिजली ! डाळ चाळणीत काढून तिचे उरलेले पाणी म्हणजेच "कट " वेगळा बाजूला काढावा . या कटाचीच प्रसिद्ध आमटी बनते जिला येळवण्याची आमटी असेही म्हटले जाते.
- पुरण शिजवण्यासाठी एका कढईत १ टेबलस्पून तूप घालून त्यात शिजलेली चण्याची डाळ ( गरम असतानाच ) घालावी आणि बरोबरच किसलेला गूळही घालावा. मंद ते माध्यम आचेवर गूळ पूर्ण विरघळू द्यावा.
- पुरण शिजेपर्यंत वेलच्या , बडीशेप आणि जायफळ खलबत्त्यात कुटून किंवा मिक्सरमधून फिरवून बारीक पावडर करून घ्यावी.
- १५ मिनिटांत पुरण शिजत आले की त्यातील गुळाचा रस आटत येऊन डाळीत एकजीव होतो. पुरण शिजले कि नाही हे पाहण्यासाठी त्याच्या मधोमध कढईत एक चमचा उभा करून ठेवावा , जर तो चमचा नीट उभा राहिला तर समजावे कि पुरण शिजले! या उप्पर पुरण शिजवू नये नाहीतर पुरण कोरडे पडून ते पिठात भरता येणार नाही ! त्यात तयार केलेली पावडर , केशर आणि सुंठ पावडर घालून नीट एकजीव करून घ्यावे. गॅसवरून उतरवून पुरण थंड होऊ द्यावे.
- पुरण थंड झाले कि ते पुरणयंत्रातून किंवा मिक्सरमधून फिरवून बारीक वाटून घ्यावे.
- पोळ्या बनवण्यासाठी पीठ आपण १ तास मुरू दिले , त्या पीठाला परत एकदा तेलाचा हात लावून चांगले मळून घ्यावे. जितके पीठ मुलायम तितक्या पुरणपोळ्या लाटायला सोप्या पडतात. पीठाचे एकदीड इंच व्यासाचे गोळे बनवून घ्यावेत. मोदकासारखी पारी करून त्यात पिठाच्या गोळ्याच्या आकारापेक्षा थोडा जास्त पुरणाचा गोळा घेऊन दाबून भरत जावा. नीट बंद करून हाताने चपटा करून पोळी लाटण्यास सुरुवात करावी.
- तांदळाच्या पिठीवर पोळी लाटावी , मला लहान आकाराच्या पोळ्या आवडतात , तुम्हाला आवडत असतील तर पीठाचे मोठे गोळे बनवून ८ ते १० इंच व्यासाची मोठी पोळी लाटू शकता.
- तव मध्यम आचेवर गरम करून पोळी दोन्ही बाजूंनी भरपूर तूप घालून खरपूस गुलाबी करड्या रंगावर भाजून घ्यावी. या पोळ्या खुसखुशीत तर बनतातच परंतु ५-६ दिवस बाहेर ठेवून सुद्धा खराब होत नाहीत.

केशराचे धागे कधी घालायचे ते सांगितलं नाही
स्टेप नंबर ७ पहा 🙂