कम्फर्ट कम्फर्ट फूड – म्हंजी काय रं भावा? एका मराठमोळ्या रांगड्याला याचे उत्तर म्हाईत हाये .. मायच्या हातची चुलीवरली ज्वारीची भाकर, गरमगरम पिठलं आणि त्वांडाला जाळ सुटल येवढा तिखट मिरचीचा खर्डा! हे खाल्ल्यानंतर मग जगबुडी झाली तरी चालेल , पण आपला काय लागलेला डोळा उघडायचा न्हाय!
या पिठल्याच्या लै तऱ्हा महाराष्ट्रात .. साधे पिठले, तव्यावरचे पिठले, वाटणाचे पिठले , शेवग्याच्या शेंगाचे पिठले , रावण पिठले , हुश्श बास .. अरे आजच्या रेसिपीचे नाव तर राहिलं ना गड्या .. कांद्याच्या पातीचे पिठले!
मागच्या महिन्यात आईला सरप्राईझ द्यायचे म्हणून मराठी गाण्यांचा, स्पेशल सारेगामा कारवान विकत घेतला . काही कारणास्तव आईकडे रत्नागिरीला जाणे रहित झाले, मग काय रोज पार्टनर ऑफसला निघून गेल्यानंतर मराठी जुनी मेलोडिस ऐकत ऐकत कामाचा पसारा कधी आटोपला जातो कळतच नाही! त्या दिवशी नेमकी जयवंत कुलकर्णींची गाणी ऐकत होते. सोंगाड्या चित्रपटातले दादा कोंडके उर्फ दाजीबा नाजूक चवळीच्या शेंगेसारख्या बांध्याची सुंदर उषा चव्हाण उर्फ सखूला रस्त्यात अडवतात आणि विचारतात ,” काय ग सखू , बोलू का नकू , डोईवर घेऊन चाललीस काई ? ” सखू अगदी लगबगीत आपल्या नाजूक मानेला मुरके देत उत्तरते ,” डोईवर पाटी , पाटीत भाकरी , भाकरीवर तांब्या , तांब्यात दूध हाई गाईचं , गाईचं वं .. , घ्येता का दाजीबा वाईचं !” सखूने उत्तर देताच दाजीबा आले रंगात आणि गाणे पुढे कधी संपले मला कळलेच नाही. माझ्या डोक्यात आपला एक खुळचट विनोद , मी जर दाजीबा असते ना तर सखूला पुढे म्हटले असते कि “बायो ग … जरा भाकरीबरोबर झुणका किंवा पिठले आणले असतेस तर लै झ्याक झाले असते!” अहो खादाडी आपला जन्मसिद्ध अधिकार आहे .. काय खरं ना मंडळी! आदल्या दिवशीच आठवडा बाजारातून कांद्याच्या पातीची जुडी आणली होती . म्हटले भाजी करीन , पण नंतर आठवले की काही दिवसांपूर्वी “खान्देशी दरबार ” हॉटेलातून वांग्याचे भरीत आणि पिठले ऑर्डर केले होते , त्या पिठल्यात कांद्याची पात घातलेली होती. भारी आवडले होते मला ते पिठले! त्या हिरव्यागार पात्यांनीही माझ्याकडे बघून डोळे मिचकावले , जणू काय मला म्हणतायेत , ” आज या गार हवेत होऊन जाऊ दे की झणझणीत पिठले , उसमे क्या है sss … !” रात्रीच्या जेवणाला पिठले आणि गरमागरम बाजरीच्या भाकऱ्या टाकल्या , आणि वर डाएट ला फाट्यावर मारून, हुरड्याच्या कुरकुरीत भजी … एकदम कड्डक ! पार्टनर कसला खुश ,, एकदम रांगड्या दाजीबासारखा जेवला माझा धनी !
पुण्याच्या या थंडीत जेव्हा बाजारात इतका छान पातीचा कांदा मिळतोय तर वाट कसली पाहताय , होऊन जाऊ दे पिठले!
Read this recipe in English
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा

- कांद्याची पात एक जुडी - धुऊन आणि बारीक चिरून - ४०० ग्रॅम्स
- 8-10 लसणीच्या पाकळ्या
- 7-8 हिरव्या मिरच्या
- 1 कप बेसन – 125 ग्रॅम्स
- ½ टीस्पून मोहरी
- ½ टीस्पून जिरे
- ½ टीस्पून ओवा
- ¼ टीस्पून हिंग
- 1 टीस्पून हळद
- 2 टीस्पून लाल मिरची पूड ( तिखट ) - जास्त तिखट आवडत नसल्यास काश्मिरी मिरची पूड वापरावी
- 3 टेबलस्पून तेल
- मीठ चवीप्रमाणे
- एका भांड्यात चण्याचे पीठ /बेसन घालून त्यात १ कप पाणी घालून फेटून घ्यावे.
- लसूण आणि मिरच्यांची एका खलबत्त्यात कुटून किंवा मिक्सरला लावून जाडसर पेस्ट वाटून घ्यावी.
- एका कढईत तेल तापवून घ्यावे. त्यात मोहरी, जिरे , हींग आणि ओव्याची फोडणी द्यावी.
- आता लसूण मिरचीचा जाडसर खर्डा घालून तो परतून घ्यावा. चांगला २-३ मिनिटे परतावा जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघून जाईल.
- हळद घालून एक मिनिटभर परतावी. आता लाल मिरची पूड आणि बारीक चिरलेली कांद्याची पात घालून घ्यावी. मध्यम आचेवर २-३ मिनिटे परतून घ्यावी.
- कांद्याची पात पाणी सॊडायला सुरवात करते. आता बेसन घालून ढवळून घेऊ. ३-४ कप पाणी घालून पिठले हवे तितके पातळ करून घेऊ. मीठ घालून एक उकळी येईपर्यंत मध्यम आचेवर शिजू देऊ.
- पिठल्याला उकळी फुटली की गॅस कमी करून कढईवर झाकण घालून पिठले शिजू देऊ.
- जवळजवळ १२ मिनिटांमध्ये पिठले शिजून तयार होते, वरचेवर पिठले हलवायला विसरू नये, नाहीतर कढईच्या तळाशी चिकटू शकते.
- हे पिठले गरमागरम ज्वारीच्या /बाजरीच्या भाकरीसोबत किंवा वाफाळलेल्या ऊन ऊन भातासोबत भन्नाट लागते !

Leave a Reply