आपल्या भारतीय जेवणात दह्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे . आयुर्वेदात अन्न कोणकोणत्या प्रकारांत खावे याचा उल्लेख आढळतो , जसे की लेह्य , पेय , चोष्य, भोज्य, आणि भक्ष्य यांत दह्याचा वेगेवेगळ्या प्रकाराने समावेश केला जातो . दह्यापासून बनलेल्या चटण्या , रायती , कोशिंबिरी पानाची डावी बाजू दृष्ट लागण्यासारखी सजवतात , तर दह्यापासून बनलेले श्रीखंड, लस्सी , पियुष , मठ्ठा सारखे मधुर पदार्थ आणि पेये जिभेचे चोचले सुद्धा पुरवतात . जेवणात सगळ्यात शेवटी वाढलेला दही भात पोटाच्या आरोग्यासोबत मनाचीही तृप्ती साधून जातो .
या सगळ्यांमध्ये ” कढी ” हा प्रकार अंमळ जरा जास्तच लोकप्रिय ! देशातल्या नकाशात कोणत्याही भागाकडे नजर टाका, त्या भागातून किमान एक तरी कढीची पाककृती , ” अहं भवामि ” , म्हणून पुढे येईलच ! आता या साऱ्या कढ्यांमध्ये दह्या- ताका सोबत किंवा त्या ऐवजी कधी चिंचेचा कोळ, कोकम, टोमॅटो यांचा वापर आंबटपणासाठी केला जातो ! माझ्या सासरी उत्तर प्रदेशातील कढी , सिंधी लोकांची भरपूर भाज्या घालून केलेली कढी , कोकणातील चिंचेचे सार, गुजराती गोडसर ताकाची कढी , पंजाबी घरांतील कढी पकोडा , विदर्भातील गोळ्यांची कढी , आपली महाराष्ट्रीयन दह्याची तिखट कढी , किती ते नानाविध प्रकार !
आपल्या देशाचे जे नॅशनल कंफर्ट फूड म्हणून खिचडी आहे , तसे प्रत्येक घरांत जे कंफर्ट फूड असते , त्यात कढी भाताचा नंबर लागतोच लागतो . बरं असे नाही की , या कढीला पंचपक्वान्नांच्या पंगतीत स्थान नाही .. अहो तसे असते तर अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष माननीय बराक ओबामा आपल्या द्विपक्षीय भारत भेटीत , गुजराती कढी त्यांच्या दुपारच्या जेवणात चाखून नसते गेले !
आमच्या घरात कढी म्हणजे सगळ्यांचा जीव की प्राण , एकूणच दह्याने बनलेले पदार्थच मुळी आवडीचे ! कधी भाजी बनवायचा कंटाळा आला किंवा आदल्या दिवशीचे जेवण जास्त झाले किंवा खास ” कढी -खिचडी ” दिन साजरा करायचा असला तर , त्यासाठी माझा मातीचा खास दह्यासाठी वापरला जाणारा गडू फ्रिजमधून बाहेर निघतो . एरवी शिळे खाणे टाळणाऱ्या माझ्या सासूबाई दुसऱ्या दिवशी फ्रिजमध्ये उरलेलया कढीचा डबा शोधू लागतात , आणि आपलं लक्ष गेल्यावर , हसत हसत ” मुझे ना बासी कढी बहुत पसंद है ..” असं म्हणत एव्हाना कढीत बोटे बुडवून बुडवून भात खायला सुरवात करतात ! आताही जेव्हा मी सगळ्यांचा आवडता कढी पकोडा बनवायास घेते , तेव्हा सासरे मला बेसन फेटताना पाहून अगदी मनापासून दाद देतात , ” जायका तसल्ली मौज बेमिसाल, यही है कढी पकोडे का कमाल !” हे त्याच्या गावातल्या एका ढाबेवाल्याचे आवडीचे वाक्य बरं का !
मग देऊया का आज तृप्तीचा ढेकर , गरमागरम भातासोबत कढी पकोडा , सोबत मिरचीचे तिखट लोणचे , आणि निखार्यावर भाजलेला पापड , अहाहाहाहाहा !

- साहित्य:
- कढीचे साहित्य:
- २ कप आंबट दही = ४५० ग्रॅम ( अति आंबट किंवा गोड दही टाळावे )
- अर्धा कप बेसन = ५० ग्रॅम्स
- १ मध्यम आकाराचा कांदा = ८० ग्रॅम्स लांब पातळ चिरून
- दीड इंच आल्याचा तुकडा किसून
- अर्धा टीस्पून मोहरी
- १ टीस्पून जिरे
- २ टीस्पून धणे जाडसर कुटून
- १ टीस्पून हळद
- पाव टीस्पून लाल मिरची पूड
- अर्धा टीस्पून हिंग
- पकोड्याचे साहित्य:
- १ कप बेसन= १०० ग्रॅम
- २ टीस्पून धणे जाडसर कुटून
- १ टीस्पूनलाल मिरची पूड
- १ टेबलस्पून दही
- तेल
- चवीनुसार मीठ
- २ ते ३ टेबलस्पून तूप
- २ सुक्या लाल मिरच्या
- कृती :
- सगळ्यात पहिल्यांदा पकोड्याचे / भजीचे पीठ भिजवून घेऊया. एका मोठ्या भांड्यात बेसन , कुटलेले धणे , लाल मिरची पूड , दही ,मीठ आणि १ टेबलस्पून गरम तेल घालून एकत्र करून घ्यावे . त्यात थोडे थोडे पाणी ( साधारण अर्धा कप ) घालून ते पीठ चांगले फेटून घ्यावे . . हे पीठ फार पातळ किंवा घट्ट भिजवू नये . हे मिश्रण किमान ४५ मिनिटांसाठी झाकून ठेवावे .
- कढीच्या मिश्रणासाठी एका मोठ्या वाडग्यात दही, बेसन , लाल मिरची पूड , हळद , आणि चवीपुरते मीठ घालून चांगले फेटून घ्यावे . बेसनाच्या गुठळ्या राहू देऊ
- नयेत . बेसन दह्यात नीट मिक्स झाल्यावर त्यात ३ कप पाणी घालून ढवळून घ्यावे .
- कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे . त्यात मोहरी , जिरे , हिंग , भरडले धणे , चिरलेले आले घालून नीट परतून घ्यावे . याच फोडणीमुळे कढी चविष्ट लागते . आता चिरलेला कांदा घालून मऊ होईपर्यंत परतून घ्यावा .
- नंतर आच मंद करून कढीसाठी बनवलेले मिश्रण कढईत हळूहळू ओतून ढवळून घ्यावे , म्हणजे कढी उष्णतेने फुटत नाही . या कढीत मध्यम आचेवर एक हलकी उकळी येऊ द्यावी . कढी खळखळून उकळू नये .
- टीप : नंतर आच मंद करून झाकून कढी ४० ते ४५ मिनिटे शिजू द्यावी . मंद आचेवर शिजलेली कढी फुटत तर नाहीच परंतु तिला अतिशय छान चव येते .मध्ये मध्ये कढी सारखी ढवळावी , म्हणजे तळाला चिकटत नाही .
- कढी अर्धा तास शिजली की आपण बाजूला पकोडे तळायला घेऊ .
- कढईत पकोडे बुडतील एवढे तेल तापायला ठेवूया . तेल चांगले गरम झाले की चमच्याने पकोड्याचे मिश्रण तेलात सोडायचे आहे . हे पकोडे मध्यम ते मोठ्या आचेवर चांगले खरपूस तळून घ्यायचे आहेत .
- पकोडे तळल्यानंतर ते पाण्याच्या भांड्यात बुडवून ठेवावेत. हे पाणी रूम टेम्परेचर वर असावे . १ मिनिट पाण्यात डुंबून झाले की हलक्या हाताने दाब देऊन या पकोड्यातील अधिकचे पाणी काढून टाकावे .असे केल्याने पकोडे आतूनही मऊ होतात आणि काढी चांगली आतपर्यंत मुरते . खूप जोरात दाबून भजीचा कुस्कर करू नये .
- कढीला चांगले ४५ मिनिटे शिजवल्यावर ती दाटसर होते . आता या कढीत आपण पकोडे घालायचे व फक्त २ मिनिटे झाकून मुरू द्यायचे . नंतर गॅस बंद करावा.
- बाजूला कढीच्या फोडणीसाठी एका तडका पॅन मध्ये २ टेबलस्पून तूप गरम करावे . त्यात सुक्या मिरच्या परतून घ्याव्यात . ही चुरचुरीत फोडणी कढीवर घालावी आणि कढी वाढेपर्यंत झाकून ठेवावी म्हणजे ती मुरते . कढी वाढताना नेहमी हलकी गरम अशी वाढावी .
- कढी पकोडा भातासोबत किंवा गरमागरम फुलके, पराठ्यांसोबत वाढावा !
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Click to watch recipe video
Leave a Reply