Kali Mirch - by Smita

Celebrating Passion for Food

  • Home
  • About us
  • Recipes
  • Contact
  • How To?
  • The Food Stop
  • Marathi Recipes

चाकरमान्याचो नवसाचो गणपती

September 9, 2021 by Smita Singh Leave a Comment

कुतूहल , आश्चर्य , जिज्ञासा , कौतुकमिश्रित हेवा ह्या अशा भावना मनुष्याच्या ठायी असणे , हा  अवघ्या मानवजातीचा स्थायीभाव ! अर्थात मीही याला अपवाद नाही . यातून जो तरला  तो खरा मोक्षार्थी !  नाही हो , आज अचानक  सणाच्या दिवसांत माझ्यातील अध्यात्मिक ज्योत जागली , असे वगैरे काही नाही . उलट दहा दिवस बाप्पासोबत  , किंबहुना बाप्पाच्या निमित्ताने खादाडी करून ,  आम्ही   सुद्धा जिव्हेवरचे सगळे रस तुषार उडवून घेणार आहोतच !

२०१९ साली पुण्यातलया मानाच्या  गणपतींची  मिरवणूक , अगदी झोकात लाकडी खांबांवर  दोन ढांगा विरुद्ध दिशेला टाकून,  तब्बल ४-५ तास याची देही याची डोळा पाहून घेतली .

हेच सुख बालपणी  मुंबईत ,बाबाच्या गुलालाने माखलेल्या खांद्यांवर बसून नी त्याच्या डोक्यावर इवल्या बोटांनी तबला वाजवत लालबागच्या राजाची आणि रंगारी बदक चाळीच्या लाडक्या लंबोदराची मिरवणूक पाहताना अनुभवलंय.  .

कोळीवाड्यातलया स्त्रियांचे फेर धरून नृत्य , भेंडीबाजार व मुहम्मद अली रोडवर मुस्लिमबांधवांचा बाप्पाला सलाम , पुण्यातले दांडपट्टा फिरवणारे मावळे , देशाच्या विविध भागांतून पुण्यात शिकायला किंवा कामाधंद्यानिमित्त  आलेल्या लोकांचे , मिरवणुकीत आपापल्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे कलाविष्कार , हे सगळे एका क्षणार्धात माझ्या डोळ्यासमोरून तरळून गेले , जेव्हा आज मी मागच्या काही वर्षांचे गणेश उत्सवाचे फोटोज आणि व्हिडिओस पाहत बसलेय . चौदा विद्या आणि चौसष्ट कलांच्या अधिपतीची मानवंदना म्हणजे लहान सहान गोष्ट आहे का ?

मनुष्य हा उत्सवप्रिय , त्याला समूहात नांदायला आवडते . ७०-८० च्या दशकात ,  माझ्या बाबासारखा, कोकणातून मुंबईत पोटापाण्यासाठी स्थायिक झालेला चाकरमानी हा आपल्या सणांसाठी तर अतिशय भावुक !  ” या खेपेस कोंचो रे कलम होळीस ” अशी विचारणा गावात दोन महिने आधीच  पोष्ट कार्ड पाठवून केली जायची ! कंपनीच्या  मालकाला, “नंतर ओव्हरटाईम करून मोटर्स रिपेअर करून देईन “, या  बोलीवर  बरोब्बर शिमग्याला आमचे पिताश्री रत्नांग्रीस हजर व्हायचे! कोकणात तेव्हा  ट्रेन सुरु नव्हती झाली . मग कुळाच्या गणपतीला , एसटीचे  तिकीट मिळाले तर  ठीक , नाहीतर   घाडगे- पाटलाच्या ओळखीच्या ट्रकमधून किंवा खाली बॅगांवर पथारी  पसरून , रातराणीने परेल एस टी डेपोवरून  बाबा  निघायचा , कामावरून अगदी  पूर्ण थकून – भागून परत आल्यावर सुद्धा ! बाबाचे हे आश्चर्याचे धक्के  आणि थरारक स्टंट्स आम्हाला नंतर पक्के ठाऊक झाले होते. ” शारदे,  यंदा नाय जायचो हां मी , कंपनीत नव्या मोटर्सची ऑर्डर आहे … ” असे म्हणता म्हणता दुसऱ्या दिवशी रात्री,  घाईघाईत घरात शिरून म्हणायचा , ” शारदे चपात्या बांध , आता दहाची एसटी आहे , बॅग भरूक होयी , बाय मी येतंय हां २ दिवसांत ,  प्रसाद नी अंगारा घेऊन यीन !” असे म्हणत  हा भाव वेडा , भजन वेडा चाकरमानी एका हातात सूटकेस आणि दुसऱ्या हातात चपाती भाजीचा डबा  व पाण्याची बाटली भरलेली गोणपाटाची पिशवी घेऊन, पायात वहाणा सरकवून झर्रकन नजरे आड व्हायचा !  आई डोळ्यांतले  काळजीमिश्रित अश्रू लपवायची . माझ्या चेहऱ्यावरचे   “मला पण जायचेय गावी गणपतीला” , या हट्टाचे  भाव मात्र लवकर सरायचे नाहीत  !

एका वर्षी त्याला   नाही जाता आले , तर देवाला न भेटता आल्याची खंत बाबा त्याच्या गाऱ्हाण्यांतून  आणि प्रसंगी घाऱ्या डोळ्यांत दाटलेल्या पाण्याची  , कडांवरून टिपं खाली ओघळणार नाहीत याची पुरेपूर दक्षता घेऊन  दर्शवायचा ! आता सुद्धा गावी बंदरावर   इनोद काकाच्या गजाली  ऐकायला बाकड्यावर  तरुण पोरे देखील जमतात . देवधर्मात  कर्मकांडापेक्षा,  देवाला सगे सोयरे मानून , कठीण प्रसंगी जेव्हा आपल्या हातात काही नाही असे कळल्यावर ” कशाक  रडूचा , देवाक काळजी ” , असे म्हणून स्वतःचे समाधान करणारा आणि जेव्हा  अगदीच प्रसंग बाका , तर देवालाही ‘त्याचे अस्तित्व सिद्ध कर’,  म्हणून साकडे घालणारा , नवस करणारा हा चाकरमानी !

तसं म्हटलं तर , कोकणात नवसाचो काही असला म्हणजे लाडाचा  , असंच समजलं जातं  . नवसाचो झील , नवसाची बाव , नाहीतर  नवसाचो बंगलो , काही ना काही गजाली   , कोकणातच कानावर पडूचीत . आता काही जणांना यात अंधश्रद्धेचा भाग वाटला तरी मला ,  जो पर्यंत त्या श्रद्धेचा आंधळा बाजार होत नाही , तोपर्यंत काहीच वावगे वाटत नाही . बघा ना ,  नवस करताना मनुष्य देवाला आपल्या प्रयत्नात सामील करून घेतो आणि ज्या कारणासाठी नवस केलाय ते कार्य सिद्धीस जावे म्हणून स्वतःच दुपटीने प्रयत्न करतो नाही का , फक्त  ‘देव आपल्या साथीला आहे’,  अशी भाबडी आशा किंवा प्रेरणा मनात बाळगून ! हां … आता “असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी” असे   समजून नवसाच्या नावाखाली देवास वेठीस धरणारे महाभाग वेगळेच !

अनेक अडचणींतून बाहेर येण्यासाठी ताकद दे,  म्हणून गजाननाचे नामस्मरण करताना आईला मी पाहिलेय , आणि त्या संकटाचे मळभ  दूर  झाले की स्वतः हातांनी बनवलेला कधी  २१ दुर्वांचा २१ जुड्यांचा हार, तर कधी  १०८ नारळाचे तोरण, वेळप्रसंगी इवलासा चांदीचा मोदक  व आमच्या ऐपतीप्रमाणे वर्गणीची पावती भरून,  लालबागच्या राजाच्या लायनीत  रात्रभर उभे राहून दर्शन घेतल्याचे मला आठवते . त्यात  बाप्पाच्या भेटीची ओढ तर होतीच परंतु संकटांवर मात केल्याचे, आणि सार्वजनिक गणपतीची आरास पाहण्याचा  , ती  मजा अनुभवायचा आनंद देखील होता !

नशिबाने म्हाडाच्या चाळीत , छोटेखानी का होईना , आम्हाला  मुंबईत स्वतःचे घर मिळाले . त्यातून गिरणगाव हा कोकणातल्या चाकरमान्यांचा  नोकरीधंद्याचा गाव म्हटले तरी हरकत नाही ! कापडाच्या मिल्स , मसाल्याचे घाऊक बाजार , कोळीवाडे, तांब्या-लोखंडाचा बाजार  अशांनी संयुक्त या गिरणगावात बैठ्या घरांच्या वस्तीत  , चाळींत, म्हाडाच्या  बिल्डींग्समध्ये , स्वतंत्र प्लॉट घेऊन बांधलेल्या घरांच्या गल्लीत , जिकडे तिकडे माणसे एकत्र एकमेकांना बांधून राहिली  . आपापल्या  मूळ गावांपासून दूर  पोटापाण्यासाठी आलेली ही कुटुंबे नकळत आपसांतच एक जिव्हाळ्याचे नाते निर्माण करून राहिलीत. माझ्या शाळेतल्या बऱ्याच मैत्रिणींकडे तसेच चाळीत प्रत्येक घर सोडून जवळजवळ सगळ्यांकडेच गणपती बसवला जायचा . आमच्या माळ्यावर दोन बिऱ्हाडांत गणेशाचे आगमन व्हायचे , एक कुटुंब होतं कोकणातलं आणि दुसरं होतं चाकण मधलं !

मला ना त्या वेळी एक गम्मत वाटायची!  दोन्ही घरं  आमने सामने , दोन्ही बिऱ्हाडांत गणेशोत्सव साजरा होतोय आणि तरीही थोडे वैविध्य !   एका घरात गणेशाची मूर्ती जेमतेम  १ फुटाची तर दुसरीकडे मोठी ३ फुटांपर्यंत . एक बाप्पा दरवषी वेगळे रूप धारण करून यायचा तर दुसरा बाप्पा नेहमीच राजाच्या रूपात , पुण्यातल्या दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती ! इकडे उकडीचे मोदक , तर तिकडे  तळणीचे .. एकाकडे गूळ खोबरे प्रसादात  वारेमाप , तर दुसऱ्याकडे पुरण  आणि शेंगदाण्याचा वापर करून बनवलेला प्रसाद ! आम्ही मुले सारखं गणपतींभोवती घुटमळायचो …  माझी आजी उकडीचे मोदक  बनवून द्यायला मदतीला सुद्धा जायची . आपल्या घरी देव्हाऱ्यातल्या देवाची पूजा झाल्यावर ,  आई रोज दोन्ही घरांत बसलेलया गणपतीला एकेक जास्वदींचे फूल नी दुर्वांची जुडी वाहून यायला सांगायची .

गणपतीच्या आदल्या दिवशी हरताळका …. मग हरताळकेच्या आदल्या रात्री हौशी  , लग्नाळू , कुमारिका  ताया , आम्हा पोरींच्या इवल्या इवल्या हातांवर मेंदी रचून द्यायच्या ! गाण्यांच्या भेंड्या खेळल्या जायच्या…  मला तसे नाचायला निमित्तच लागायचे ! शाळेच्या गॅदरिंग मध्ये केलेला ” आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे” किंवा  २६ जानेवारीला चाळीतल्या हळदीकुंकवाला बसवलेला  ” बाईला माझ्या नाद पान्याचा ” या अशा गाण्यांवर स्मिता ठुमकायची ! हे सगळे घडायचे कुठे ?  तर चाळीतल्या जिन्याच्या बोळांत ! कुणी जिन्यावरून वर – खाली  जायला लागले की,  तेवढ्यापुरता पार्श्वभाग बसल्या जागेवरूनच उचलायचा !  एखादी दिसायला चारचौघींत उठून दिसणारी ताई , उगाचच भाव खायची ! तिने एकदा माझ्या हातांवर मेंदी काढायला हिडीसफिडीस केल्यावर, माझ्या  डोळ्यांत उभा राहिलेला भादवा ,  आजीने पदराने निपटून काढला आणि घरातच काडेपेटीची काडी ओल्या मेंदीत बुडवून   सूर्यफुले माझ्या हाताच्या तळव्यांवर काढून दिली  अन्  म्हणाली , ” अशी सूर्यफुलासारखी हसत राहा हो माझी बाय “! दुसऱ्या दिवशी माझ्या हातावर रंगलेली मेंदी त्या ताईच्या दृष्टीस पडल्यावर कमालीची ओशाळली होती ती !

हे सगळे अनुभवताना आईला मात्र मी एक प्रश्न कायम विचारायचे , ” आई आपण का ग नाही गणपती बसवत ? मला तर सगळे येते बाप्पाचे करायला , तू फक्त मोदक बनव , मी बाप्पासाठी सगळं म्हणजे सगळं करीन !”  एका आठ – नऊ वर्षांच्या मुलीचे हे उद्गार ऐकून आईला हसू आले परंतु तरीही माझ्या भावना जाणून तिने मला एवढेच सांगितले की ” आपला बाप्पा रत्नागिरीत बसतो , वेगळा बाप्पा आपण नाही आणायचा ! इथूनच नमस्कार करायचा बाप्पाला आणि  गणपती मनात वसला म्हणजे झाले !त्याने दिलेल्या बुद्धीचा सदुपयोग  करणे म्हणजेच त्याची पूजा !” नंतर नंतर मीही हा प्रश्न विचारायचे विसरून गेले  आणि दरवर्षी गणेशोत्सव  नेहमीप्रमाणे आम्ही  साजरा करतच होतो .

मग तो सोनियाचा दिन  उजाडला … आई – बाबाची काही दिवसांपासून रात्री हळूहळू आवाजात गुप्त चर्चासत्रं  चालू होती . त्यातली काही वाक्यं  माझ्या कानांवर पडत होती , ” जोशी गुरुजी ..” ” माझ्या नोकरीच्या  वेळेला केला होता ..” ” भायखळ्याला देसायांच्या गणपतीसमोर प्रसाद ठेवताना बोलले होते ..” मला काही नीटसं कळलं नाही त्यातून झोप अनावर होत होती . पण आई दुसऱ्या दिवशी सकाळी स्वतःच  म्हणाली की ,”आपण या वर्षापासून  पुढील ३ वर्षे गणपती आणायचा, माझा राहिलेला नवस फेडायचा आहे !”

हे ऐकल्यावर सकाळी शाळेची तयारी करत असताना , अर्धवट बांधलेल्या वेण्यांचे शेपटे उडवत , काय घरात मिरवणुकीत नाचल्यासारखा,  दंगा केलाय , सोबत बाबाचा तोंडाने वाजवलेला ढोल आणि त्याचे नेहमीचे गावची पालखी नाचवल्याच्या अविर्भावातले दोन पाय ढोपरांत दुमडून  नृत्य ! आनंदाचा कळस तो काय म्हणतात तो हाच  !

त्यानंतर येणाऱ्या बाप्पाची तयारी करताना जी धांदल उडाली … तरी बरं,   आजी नी बाबा..  दोघांनाही पूजा अर्चनेचं  सगळं ठाऊक होतं . आमच्याच माळ्यावरच्या , गणपती कार्यशाळा चालवणाऱ्या नंदू दादाला ऑर्डर देण्यात आली आणि त्याने तिन्ही वर्षे अतिशय वेगवेगळ्या रूपांतल्या , डोळयांत जिवंत भाव असलेल्या गणेशाच्या मूर्ती बनवून दिल्या . एकदा बाळकृष्ण रूपातील गाईसोबत , दुसऱ्या वर्षी सिंहावर आरूढ झालेली परंतु बालगणेश आणि तिसऱ्या वर्षी भरजरी वस्त्रांतील राजाच्या रूपातील गणाधिपती !

बाबाच्या लालबागच्या  पुस्तक विक्रेत्या मित्राच्या मुलाने व त्याच्या मित्रांनी मिळून सुंदर असे , मंदिराच्या आकारातले प्रशस्त मखर बनवून दिले .  रोज पूजेसाठी लागणारी  जास्वदांची फुले आणि दुर्वा आम्हाला तळमजल्यावर राहणारा मॅन्युअल दादा आणून द्यायचा ! धर्माने हा गोव्याचा कॅथलिक ख्रिश्चन , पण गणपतीवर सुद्धा श्रद्धा अपरंपार ! म्हणूनच जातीधर्माचे कोणी अवडंबर माजवताना पाहिले ना की , माझे मन दुःखी होते , कारण आम्हाला तो फरक कधी जाणवलाच नाही ! दिसली ती  श्रद्धा , दिसली ती  माया , दिसला तो जिव्हाळा !

माझ्या पहिल्या वक्तृत्व स्पर्धेतल्या पहिल्या क्रमांकाच्या बक्षिसाचा  लामणदिवा , पलंगातील छुप्या स्टोअर मधून बाहेर निघून देवाजवळ मखरात  लागला . आमच्याकडे उंच समया  नव्हत्या . जराश्या  बुटक्या होत्या . गणपती च्या चेहऱ्यावर उजेड कसा पडणार , तरी बाबाने एक  लाइट लॅम्प फोकस  करून ठेवला होता.  ते आपण नाही का स्टुडिओत फोटो काढायला जातो , तेव्हा आपल्या डोळ्यांवर एवढा प्रकाशझोत पडल्यावर , डोळे दिपून जातात तस्से अगदी झाले होते . त्या एवढ्या प्रखर प्रकाशात बाप्पा सुद्धा डोळे किलकिले करून  पाहतोय की काय असा भास झाला होता !जरा बाप्पाच्या चेहऱ्यावर मंद समईच्या शुभ्र कळ्यांचा  प्रकाश पडला असता तर ..  आई जराशी हिरमुसली , पण ‘आहे त्यात समाधान मानावे’,  असे आजीने समजावल्यावर लागलो आम्ही उरल्या कामाला !

ज्या दिवशी गणपती बसणार त्या दिवशी सक्काळी अगदी सहा -साडेसहाच्या सुमारास,  माझी मामी मोठाल्या समया  नी  गणपतीपुढे सजवून ठेवायचे , असे सारे फराळाचे साहित्य घेऊन दारात जड  पिशव्या सांभाळीत धापा टाकीत उभी ! बघा,  म्हणजे तिला काही माहित नसताना , ध्यानी मनी नसताना सहजच ती    समया  घेऊन आली !  आता या दैवी  प्रत्ययाला,  आपसूकच आपले हात जोडले गेले नाहीत तर नवल ! मग काय , बारा हत्तींचे बळ  आल्यासारखे उत्साहाने आम्ही कामांचा सपाटा  लावला . सहाणेवर चंदन उगाळणे , दुर्वांच्या १०८  जुड्या बांधणे , कापसाची हळद कुंकू चंदनाची बोटे लावून वस्त्रे बनवणे , पूजेचे साहित्य परातीत गोळा करणे , केळीची पाने धुऊन कोरडी करणे अशा कामांत मी ही बाबाला मदत करीत होते . मधे मध्ये दरवाजाच्या बाहेर उभे राहून सगळे लायटिंगचे बल्ब पेटत आहेत की नाहीत , आईने  लग्नाआधी छंद म्हणून बनवलेले काचेच्या काड्यांचे मोराचे तोरण दुमडले तर नाही ना , रांगोळी कोणी पसरवून तर नाही ना गेले , हे सगळे मी अगदी जातीने पाहत  होते . त्यातच एका सवंगड्याने विचारले , “खाली येतेस का गणपती पाहायला “, तर त्याला अगदी झोकात मुरडून , “नाही बाबा.  आमच्याकडे गणपती येणारेत”,  असे म्हणून  जरीच्या परकराचा फगारा  उडवत उत्तर दिले .आमचे गुरुजी ठरल्या मुहूर्ताच्या क्षणभर आधी आले आणि त्यांना पाहून  आम्ही सगळे अवाक झालो . ८० वर्षांचे वय  , आवाज कापरा असला तरी खणखणीत , एकेक श्लोक स्पष्ट उच्चारित , थरथरत्या हातांनी इशारे करत गुरुजींनी गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली . “मनाजोगते सगळे मिळेल”, असा त्यांनी दिलेला आशीर्वाद माझ्या कानांत अजून घुमतो आहे . दुर्दैवाने त्याच्या पुढच्या वर्षी ते गुरुजी आमच्या बाप्पा साठी नाही येऊ शकले , त्यांची प्राणज्योत त्याच वर्षी मालवली !

माझ्या आईने गणपतीची सेवा  जीव तोडून केली . तिन्ही वर्षे  आधीच ओव्हर टाईम करून फायलींचे ढीग उपसले , काकुळतीला येऊन सिनिअर्सकडून रजेचे  अर्ज मंजुर करून घेतले . दोन्ही वेळेला नैवेद्याचे भरलेले ताट , पूजेचे साहित्य , गणपतीजवळची स्वच्छता यांकडे  आई  बारकाईने लक्ष द्यायची . सतत तेवणार्या नंदादीपाची आणि अगरबत्ती धुपाची राखुंडी स्वच्छ करण्याची  , तसेच फळांवर माशा बसू नयेत म्हणून वेळच्या वेळी फुले , फळं  बदलणे हे काम मी अंगावर घेतले होते . त्या निमित्ताने मी बाप्पाच्या अगदी जवळ जाऊन त्याला निरखत बसायचे , मूर्तिकाराच्या कलेचं  मला जाम  कौतुक वाटायचे ! एके वर्षी दहावी होती , आणि गणपतीच्या सुट्टीत क्लास आणि शाळेतून दिलेल्या एक्सट्रा अभ्यासाच्या वह्या पूर्ण करायच्या होत्या . मग रात्री  समईच्या  तेजात , आणि माझ्या अभ्यास टेबलावरच्या  लॅम्पमध्ये गणपती चे तेज अधिक उजळून निघायचे . मी जरासे पाणी प्यायला उठले की वाटायचे बाप्पा वाकून माझ्याकडे पाहून हसत  म्हणतोय , “लवकर आटप , टाईमपास करू नको , तू झोपली की मी सुद्धा  एक डुलकी काढीन म्हणतोय . तुझी आऊस  आता उठेल, नी घेईन लगेच मला अंघोळ घालायला ! “ माझ्याच विचारांचे मला खूप हसू यायचे ! परंतु एरवी रात्री अभ्यास करताना खिडकीबाहेर काळोख्या अंधारात पाहायला घाबरणारी मी त्या वेळेला मात्र भीती हा शब्दच विसरून जायचे . सगळे कसे फ्रेश , उत्साही वाटायचे !बाप्पाचा आधार वाटायचा , आताही कधी काही मनात भीती निर्माण झाली की मी  हेच पूर्वीचे दिवस आठवते , बाप्पाचे तेजःपूंज रूप  आठवते,मनाला प्रचंड  उभारी येते !

दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमीची गडबड असायची , त्या दिवशी  बैलाच्या श्रमाचे काहीच खायचे नाही , साधे जेवण असायचे . मुख्य म्हणजे आम्हाला सगळ्यांना आजीच्या हातची ऋषीची भाजी आवडायची . मग निगुतीने आजी आणि आई मिळून ती  भाजी बनवायच्या , आणि गणपतीसाठी अजून एक गोड  पदार्थ बनवला जायचा ! एका वर्षी आईची बालमैत्रीण प्रमिला मावशी आमच्याकडे गणपती दर्शनाला आली याच दिवशी . आजीने तिला जेवायला वाढले आणि पहिला घास खाताच तिच्या डोळयांतून अश्रूच्या धारा वाहू लागल्या . आईला बिलगून म्हणाली , ” आज माझ्या गेलेल्या आईची आठवण आली सुमन , तुम्ही मायलेकींनी माझ्यावर खूप माया केलीत !” आमच्या बाप्पाने हा सख्यांचा , निखळ मैत्रीचा मिलाप सुद्धा पाहिलाय बरं  का !

गणपतीच्या एका वर्षी पूर्वात गौरीचे आगमन झाले होते . त्यामुळे नवविवाहितांचे  ववशे आमच्या घरी ठरले . काय त्या सजलेल्या बायका , नखशिखान्त दागिन्यांनी मढलेल्या ,  मोठे मोठे सुप  भरून गौरीला पुजायला आल्या . त्या निमित्ताने मीही आईची साडी नेसून, तिचा लक्ष्मीहार घालून  नटून मुरडून घेतले . त्या दिवशी नक्की गौरी – माझी आई कोण , हा संभ्रम आमच्या बाळगणेशाला पडला असेलच , एवढा तो माहेरवाशिणींचा , सौभाग्याचा सोहळा !

चाळीत राहण्याचा एक मोठा फायदा म्हणजे छोटासा  समारंभ हा उत्सवच होतो . त्यातून गणेशोत्सव म्हणजे उद्याचे ढोलकीवादक ,  गायक , यांना आयते चालून आलेली संधीच . आमची चाळ  सुद्धा अपवाद नव्हती . चाळीतली काही मुले ही शाहीर साबळे पार्टीत कलाकार म्हणून काम करायचीत . उत्तम गायक , उत्तम नर्तक आणि उत्तम ढोलकी वादक . तब्बल एक दीड  तास आरती चालायची .  एका जरी देवाची आरती सुटेल तर काय बिशाद . ” पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला ” ते ” यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी ” अशी सगळी भजने नी आरत्या  सुरात  म्हटली जायचीत . इकडे शेवटच्या दोन आरत्या आल्या की एक दादा आईला इशारा करायचा , की आता प्रसाद परातीत मांडायला घ्या . मग आई पदर खोचून जे मस्त पराती  भरायची , काय सांगू , केळीच्या पानाच्या द्रोणात भरलेले दूध पोहे ,  कधी तांदळाची घट्ट खीर , एके दिवशी मुगाच्या डाळीचे लाडू तर कधी खटखटे शेवेचे किंवा शेंगदाण्याचे लाडू ! माझ्या आईच्या हातचे चुणाचे  लाडू खाऊन भजनीकर मंडळी संकोचत विचारायचे , वहिनी  लाडू आहेत का हो अजून ?

आरतीनंतर भजनी मंडळी जराशी अजून काही वेळ गात बसायची , त्यांच्यासाठी उसळ पाव , वडापाव , आस्वादचे सामोसे , पियुष असा सरंजाम असायचा . तेवढ्याच तुटपुंज्या बजेटात  बाबा आनंदाने करायचा . त्या सात दिवसांत त्याने कोकणातला गणेशोत्सव मुंबईत २२५ स्क्वेअर फुटाच्या घरात साकारला होता .

लालबागवरून एके वर्षी बाल्या  नृत्य सादर करणाऱ्या पार्टीला आम्ही बोलावले होते . ते पाहायला पूर्ण चाळ  आमच्या दुसऱ्या  माळ्यावर गोळा झाली होती . रत्नागिरीत या नृत्याला ‘जाखडी’  किंवा ‘चेउली’ म्हणतात. या बाल्या  नृत्याला कोकणात एक खास परंपरा लाभली आहे . कोकण आणि भजन – लोकगीते हे समानार्थी शब्द ठरू शकतात, इतकी  लोकगीतांवर प्रेम करणारी माणसे आहेत इथे . मुख्य व्यवसाय भातशेती आणि त्या अनुषंगाने येणारे सण , परंपरा जपताना लोकसंगीताच्या माध्यमातून जनमानसाचे मनोरंजन होत असते ! गणेशचतुर्थीचा  सण  म्हणजे कोकणवासीयांच्या  धमन्यांत रक्ताऐवजी एक अजब रसायनच दौडवतो . पूर्वीपासून कोकणातील तरुण कामानिमित्त समुद्रात  बोटींवर तसेच मुंबई आणि नजीकच्या परिसरात  नोकरी धंद्यानिमित्त जातात.  त्यावेळी त्यांचे वेष इतरांपासून वेगळे ठरवण्यास कारणीभूत ठरत , त्यांच्या कानातल्या बाळ्या .. आणि दिवसभराच्या कामाच्या रगाड्यातून  उसंत मिळेल तेव्हा हे तरुण एकत्र जमून आपल्या सवंगड्यांसोबत करमणुकीसाठी जे लोकगीतांवर अनोख्या पद्धतीचे ठेका धरत , त्यालाच ” बाळ्या ” किंवा ” बाल्या ” नृत्य असे संबोधले गेले . या नृत्याचे ” जाखडी ” नामकरण म्हणजे ” खडी ” या संज्ञे वरून केले गेलेय . गोलाकार खडे म्हणजे उभे राहून केले गेलेले नृत्य – ” जाखडी ” ! तसेच ” चेऊली ” या नावाचा इतिहास तर अतिशय रंजक आहे . श्रीकृष्ण भक्त यदुवंशीय द्वारकेमार्गे कोकणात ” चौल ” बंदरावर उतरले आणि तेथे स्थायिक झाले , त्यांनी भगवान  श्रीकृष्णाची महती सांगणारी गीते सादर करत जो नृत्यप्रकार अस्तित्वात आणला तो म्हणजे ” चेऊली ” नृत्य ! म्हणूनच बाल्या  गीतांत कृष्णासंदर्भात गवळणी  आवर्जून सादर होतात आणि अतिशय प्रसिद्ध असे ” कलगी – तुरे  ” ( शिव – पार्वती महिम्न सांगणारे ) सुद्धा ! अधिक माहिती वाचण्यासाठी या संदर्भ लिंकला जरूर भेट द्या : https://maharashtratimes.com/editorial/ravivar-mata/balya-dance/articleshow/65822952.cms

जी त्या  मुख्य बाळ्याने मध्यभागी बसून , उभ्या ढोलकीवर ” तार्तररततता ” अशी सम  बांधली आणि गोलाकार उभे राहून बाल्यांनी  गणपती वंदन सुरु केले त्याला तोडच नाही .

 

“ॐ नमो सद्गुरु गुरुनाथ माझे (गुरुनाथ माझे)

शिवपुरा, चान्देबुवा, वाकवली, गजाननबुवा कविराज माझे (कविराज माझे)

नडगावा, कोइनामदेव, नवनाथा, वाझेबुआ गुरुनाथ माझे

ॐ नमो सद्गुरु गुरुनाथ माझे

बोल-बोल-बोल-बोल बजरंगबली की जय

गणा धाव रे, मना पाव रे

हे, गणा धाव रे, मना पाव रे

तुझ्या प्रेमाचे किती गुण गाऊ रे

तू दर्शन आम्हांला दाव रे

गणा धाव रे, मना पाव रे

तुझ्या प्रेमाचे किती गुण गाऊ रे..”

 

त्यानंतर सुरु झाला भक्तीचा आवेशपूर्ण सोहळा आणि रंगून गेले सारे ! आम्ही पोरे – पोरी सुद्धा अगदी जोशात त्यांना पाहून दुसरा फेर धरून बाल्या  स्टेप्स करत नाचू लागलो . आजही गणेशोत्सव जवळ आला की  बाल्या  गीते नुसती तोंडात गुणगुणली जात नाहीत , तर नकळत धरलेला ठेका कोकणी संस्कृतीत जन्माला आल्याचा अभिमान मनाशी कुरवाळतो !  शेवटी शेवटी त्या भजनानंदात  सगळे इतके दंगले की पहाटेचे ४ कधी वाजले हे कोणाच्या ही  टक्क  उघड्या पापण्यांनी कळू दिलेच नाही !

आमच्या बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी शिवाजी पार्क  समुद्रावर निरोपाची  आरती करत असताना एक सरदारजी बाबांजवळ आले आणि म्हणाले ” वीरजी साढे बाप्पा के लिये भी आरती गा दो ”

आम्ही वाकून बघितला त्यांचा गणपती , लालचुटुक शीख पद्धतीची  पगडी बांधलेला ! पाहिलेत ना , भक्तांच्या रंगात देव सुद्धा मिसळतो मग आपण कोण एकमेकांत आणि का  भेदभाव करणारे ?  तो गोडुला इवलासा  बाप्पा आजही कधी कधी माझ्या स्वप्नात येऊन नकळत झोपेत खुद्कन हसवून जातो !

विसर्जनांनंतर घरी आल्यावर बाप्पाचे रिक्त आसन बघून हुंदका फुटणार तेवढ्यात तोच मनातून बोलला की  मी आहे इथे , तुझ्या अंतरात , हृदयात ,, ही जागा कधीच रिक्त होऊ देऊ नकोस !

असा  साजरा व्हायचा गिरणगावातल्या चाळीतला , चाकरमान्याचा गणेशोत्सव ! जागा असेल चार कोबा लाद्यांची , पण उत्साह , आनंद हा पराकोटीचा !

या आठवणींत  भजनी मंडळी साठी जे पदार्थ आम्ही बनवायचो किंवा बाहेरून मागवायचो  ते पदार्थ तुमच्यासाठी खास !

 पांढरा वाटाणा उसळ

हिरव्या वाटाण्याची उसळ

कटवडा उसळपाव

मुंबई वडा पाव

समोसा

चमचमीत ओली भेळ

 मूगडाळीची कुरकुरीत भजी

बटाटा भजी

 साबुदाणा वडा

 दही वडे

 ब्रेड पॅटीस

पियुष

 

(Visited 147 times, 1 visits today)

Share this:

  • Click to email this to a friend (Opens in new window)
  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on Pinterest (Opens in new window)
  • Click to share on LinkedIn (Opens in new window)
  • Click to print (Opens in new window)

Related

Filed Under: Marathi Recipes

« कोबी चण्याच्या डाळीची भाजी – उपकरी
तवशाचे पोळे /काकडीची गोडाची आंबोळी / तौसाळी /तवसाळी »

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About us

Hey Foodies, Welcome to Kali Mirch!
Join us in this exciting journey where we unravel the magic of Indian cooking Read More…

Subscribe for updates

Badge for Top 20 North Indian Culinary Blogs – 2018

Recent Comments

  • subbaraman on Piyush Recipe-How to Make Piyush
  • Smita Singh on Mumbai Vada Pav recipe- How to make Vada Pav- Kali Mirch by Smita
  • ramesh on Mumbai Vada Pav recipe- How to make Vada Pav- Kali Mirch by Smita
  • Smita Singh on Egg Curry in Microwave-Anda Curry in Microwave-Dhaba Style
  • Sanjeev on Egg Curry in Microwave-Anda Curry in Microwave-Dhaba Style

Popular Posts

  • Chicken Handi-Popular Chicken Curry- Handi Chicken recipe-Murg HandiChicken Handi-Popular Chicken Curry- Handi Chicken recipe-Murg Handi
  • Pink Sauce Pasta recipePink Sauce Pasta recipe
  • Rice Appe-How to make rice appeRice Appe-How to make rice appe
  • Dhaba Style Aloo Matar recipe| Aloo Matar recipeDhaba Style Aloo Matar recipe| Aloo Matar recipe
  • Matki Usal Recipe-Maharashtrian Matki UsalMatki Usal Recipe-Maharashtrian Matki Usal

Archives

  • May 2022
  • April 2022
  • September 2021
  • August 2021
  • July 2021
  • June 2021
  • May 2021
  • April 2021
  • March 2021
  • February 2021
  • January 2021
  • December 2020
  • November 2020
  • October 2020
  • September 2020
  • August 2020
  • July 2020
  • June 2020
  • May 2020
  • April 2020
  • March 2020
  • February 2020
  • January 2020
  • December 2019
  • November 2019
  • October 2019
  • September 2019
  • August 2019
  • July 2019
  • June 2019
  • May 2019
  • April 2019
  • March 2019
  • February 2019
  • January 2019
  • December 2018
  • November 2018
  • October 2018
  • September 2018
  • August 2018
  • July 2018
  • June 2018
  • May 2018
  • April 2018
  • March 2018
  • February 2018
  • January 2018
  • December 2017
  • November 2017
  • October 2017
  • September 2017
  • August 2017
  • July 2017
  • June 2017
  • May 2017
  • April 2017
  • March 2017
  • February 2017
  • January 2017
  • December 2016
  • November 2016
  • October 2016
  • September 2016
  • August 2016
  • July 2016
  • June 2016
  • May 2016
  • April 2016
  • March 2016
  • February 2016
  • January 2016
  • December 2015
  • November 2015
  • October 2015
  • September 2015
  • August 2015
  • July 2015
  • June 2015
  • May 2015
  • April 2015
  • March 2015
  • February 2015
  • January 2015

Categories

  • Aagri-Koli Cuisine
  • Accompaniment
  • All recipes
  • Bangda/Bangude/Indian Mackerel
  • Beginner's Recipe
  • Beverages and Ice-creams
  • Bhindi/Okra Recipes
  • Biryanis
  • Chatpata Chaat
  • Chhath Puja recipes
  • Chicken/Murg recipes
  • Comfort Food
  • Dal Preparations
  • Dessert
  • Diwali recipes
  • Dussehra Recipes
  • Egg recipes
  • Exotic recipes
  • Fasting/Upwas recipes
  • Fish Fry
  • Green Peas (Hara Matar) Recipe
  • Happy Baking
  • Holi Special
  • How To?
  • Indian Bread Recipes
  • Karnataka Cuisine
  • Kerala cuisine recipes
  • Konkan Recipes
  • Lunch Box recipes
  • Maharashtrian Recipes
  • Makar Sankranti/ Khichri Recipes
  • Mangalore recipes
  • Marathi Recipes
  • Microwave
  • Monsoon recipes
  • Mutton Recipes
  • Navratri recipes
  • Paneer Recipes
  • Prawns/Shrimps/Kolambi/Jhinga
  • Raita recipes
  • Rajasthani Cuisine
  • Ramadan recipes
  • Restaurant/Dhaba Delicacies
  • Rice Preparations
  • Sadhya-A Feast for All
  • Sandwiches
  • Seafood
  • Short Stories
  • Snacks/Breakfast Recipes
  • South Indian Delicacies
  • Spice Story
  • Summer Special
  • Suran/Yam recipes
  • The Food Stop
  • Uncategorized
  • Uttar Pradesh Recipes
  • Veg Recipes
  • Winter recipes

Meta

  • Log in
  • Entries feed
  • Comments feed
  • WordPress.org

Copyright © 2022 · by Shay Bocks · Built on the Genesis Framework · Powered by WordPress

loading Cancel
Post was not sent - check your email addresses!
Email check failed, please try again
Sorry, your blog cannot share posts by email.