होळी विशेष पाकातल्या चंद्रकला - खव्याच्या चंद्रकला
Author: 
Recipe type: Dessert
Cuisine: Indian
 
किती बनतील : २५-३० तयारीसाठी वेळ : ३० मिनिटे बनवण्यासाठी वेळ : ३० मिनिटे
Ingredients
  • साहित्य:
  • पारीसाठी साहित्य :
  • • २ कप्स = २५० ग्रॅम्स मैदा
  • • १ टेबल्स्पून रवा
  • • पाव कप = ५० ग्रॅम्स तूप
  • • २ टेबलस्पून दूध
  • • पाणी
  • सारणासाठी साहित्य:
  • • अर्ध्या कपाहून थोडा जास्त खवा /मावा = १५० ग्रॅम
  • • अर्धा कप = १०० ग्रॅम्स बारीक रवा
  • • अर्धा कप = १०० ग्रॅम्स पिठीसाखर
  • • पाव कप = २५ ग्रॅम्स बारीक किसलेले सुके खोबरे
  • • १ टेबलस्पून बदाम
  • • १ टेबलस्पून चारोळी
  • • १ टेबलस्पून काजू
  • • १ टेबलस्पून मनुका
  • • ५-६ हिरव्या वेलच्या ( जाडसर कुटून )
  • • तूप
  • पाकासाठी साहित्य:
  • • २ कप साखर = ४०० ग्रॅम्स
  • • १ कप पाणी
  • • थोडे केशराचे धागे
Instructions
  1. कृती:
  2. • एका परातीत मैदा , रवा नीट एकत्र करून घ्यावा .
  3. • टीप : रव्यामुळे करंजीचे बाहेरील आवरण खुसखुशीत होते .
  4. • तूप हलके गरम करून घ्यावे . हे तूप पिठात चांगले दोन हातांच्या तळव्यांनी चोळून घ्यावे . यामुळे चंद्रकला अतिशय तोंडात विरघळतील इतक्या खुसखुशीत बनतात ! अर्धा कप कोमट पाण्याने पीठ घट्टसर मळून घ्यावे . एका भिजवलेल्या सुती कापडाने हा गोळा किमान अर्ध्या तासासाठी झाकून ठेवावा.
  5. • आता चंद्रकला करंजीचे सारण बनवण्यासाठी एका पॅन मध्ये २ टेबलस्पून तूप गरम करून त्यात रवा सोनेरी रंगावर येईपर्यंत साधारण १० मिनिटे भाजून घ्यावा .
  6. • त्याच पॅनमध्ये बदाम, काजू , आणि चारोळी साधारण २-३ मिनिटे भाजून घ्यावीत . थंड झाल्यावर मिक्सरमधून त्यांची जाडसर पूड करून घ्यावी .
  7. • नंतर सुके खोबरे हलका खमंग सुगंध दरवळेपर्यंत भाजावे , रंग बदलू देऊ नये . बाजूला काढून ठेवावे .
  8. • आता खवा हाताने कुस्करून ५ मिनिटे मंद आचेवर भाजावा . त्यात जरासा कोरडेपणा आला की आच बंद करावी .
  9. • एका मोठ्या भांड्यात खवा , रवा आणि सुके खोबरे एकत्र करून घ्यावे . त्यात सुक्या मेव्याचा जाडसर कूट , वेलची पावडर , आणि बारीक चिरलेल्या मनुका घालाव्यात . तसेच पिठीसाखर सुद्धा मिसळून घ्यावी . आपले करंजीचे सारण तयार आहे .
  10. • एका कढईत साखर आणि पाणी घालून मध्यम आचेवर साखर विरघळू द्यावी . त्यातच थोडे आवडत असल्यास केशराचे धागे घालावेत . साधारण २ मिनिटांत साखर विरघळते . त्यानंतर मंद आचेवर हा पाक अजून ४ मिनिटे शिजू द्यावा व एकतारी पाक बनवावा . पाक जास्त पातळ राहिला तर चंद्रकला मऊ पडू शकते आणि घट्ट झाला तर करंजीवर साखरेचे कण दिसू लागतात . पाक तयार झाला की जरा थंड होऊ द्यावा .
  11. • पीठ झाकून अर्धा तास झाला आहे . त्या पीठाचे ३ गोळे करून घ्यावेत . एक गोळा पोळपाटावर ठेवून , बाकीचे दोन गोळे रुमालाखाली झाकून ठेवावेत. म्हणजे कोरडे होणार नाहीत .
  12. • गोळ्याला पोळपाटावर दाब देऊन दोन्ही हाताने चांगले मळून लांब वळ्याचा आकार द्यावा . सुरीने त्याचे एकाच आकाराचे लहान तुकडे कापून घ्यावे आणि एकेक गोळ्याला व्यवस्थित दाबून मऊसूत करून घ्यावे .
  13. • एक चंद्रकला बनवण्यासाठी दोन पुरीच्या आकाराच्या पाऱ्या पातळ लाटाव्यात . जाड पारी खायला चांगली लागत नाही . अगदीच वेळ नसेल तर मोठा गोळा घेऊन मोठी पातळ पोळी लाटावी . रिंग कटर किंवा वाटीच्या साहाय्याने पुऱ्या काढून घ्याव्यात .
  14. • एका पारीवर कडांना दुधाचे किंवा पाण्याचे बोट लावावे . मध्यभागी चमचा भरून सारण घालावे . सारण अंदाजे कमी जास्त करावे . कडांपर्यंत पोहूचू देऊ नये . नंतर दुसरी पारी त्यावर ठेवून कडा नीट दाबून बंद कराव्यात .
  15. • करंजीच्या कडा व्यवस्थित मुरड घालून नक्षीदार कराव्यात .
  16. • एकेक करंजी झाली की कापडाखाली झाकावी म्हणजे वातड होत नाही .
  17. • करंज्या तळण्यासाठी कढईत करंज्या बुडतील इतके तूप घालावे . मध्यम आचेवर तूप तापवावे . तूप कडकडीत झाले तर करंज्या घालताक्षणीच करपतात .
  18. • आच मंद करून करंज्या उलटून पालटून सोनेरी रंगावर तळाव्यात . साधारण चार पाच करंज्या एकत्र तळताना ८ ते १० मिनिटे तळायला लागतात . तूप निथळून एका ताटात काढून घ्याव्यात .
  19. • चंद्रकला जरा थंड झाल्या की पाकात व्यवस्थित बुडवून घोळवाव्यात . पाक हलका एकदम कोमट असावा . नंतर एका ताटात काढून घ्याव्यात . वरून पिस्त्याचे काप आणि आवडत असल्यास खाण्याचा वर्ख लावून सजवाव्यात ! या करंज्या हवाबंद डब्यात ठेवल्या तर आठवडाभर टिकतात .
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/chandrakala-gujiya-in-marathi-pakatlya-chandrakala/