कच्च्या फणसाची दम बिर्याणी - Raw Jackfruit Dum Biryani - Dhungar Vali Kathal Biryani In Marathi
Author: 
Recipe type: Main
Cuisine: Indian
 
कितीजणांना पुरेल : ४ ते ५ तयारीसाठी वेळ : ३० मिनिटे शिजवण्यासाठी वेळ : ४५ मिनिटे
Ingredients
  • साहित्य :
  • • ३ मोठे कांदे= ३०० ग्रॅम्स , लांब चिरून , तळलेले ( बिरिस्ता )
  • • दीड इंच आल्याचा तुकडा
  • • ४-५ हिरव्या मिरच्या
  • • ८-१० लसणीच्या पाकळ्या
  • • तूप
  • • ३०० ग्रॅम्स कच्च्या फणसाचे दीड ते २ इंचाचे तुकडे
  • • २ मोठे = २०० ग्रॅम्स बटाटे ,सोलून ४ तुकडे करून
  • • २५० ग्रॅम्स दही
  • • पाव टीस्पून हळद
  • • ३ टीस्पून काश्मिरी किंवा आवडत असल्यास तिखट लाल मिरची पूड
  • • २ टीस्पून गरम मसाला
  • • १ टीस्पून धणे पावडर
  • • मीठ
  • • अर्धा कप कोथिंबीर
  • • १ तमालपत्र
  • • १ चक्रीफूल
  • • २ वेलदोडे
  • • ४ लवंग
  • • अर्धा इंच दालचिनीचा तुकडा
  • • दीड कप = ३०० ग्रॅम्स लांब दाण्यांचा बासमती तांदूळ , स्वच्छ धुऊन अर्धा तास पाण्यात भिजवून
  • • ३ मोठे = ३०० ग्रॅम्स टोमॅटो मोठे तुकडे करून
  • • केशराचे धागे १ टेबलस्पून हलक्या गरम पाण्यात भिजवून
  • • कोळशाचा एक तुकडा धुन्गार देण्यासाठी ( ऐच्छिक )
  • • तेल
Instructions
  1. कृती:
  2. • पाव कप तळलेला कांदा बिर्याणीच्या लेअरिंग साठी बाजूला करावा . उरलेला कांदा मिक्सरमधून २-३ टेबलस्पून पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्यावा .
  3. • आले , लसूण आणि मिरच्यांची मिक्सरमधून पाणी न घालता जाडी भरडी चटणी वाटून घ्यावी .
  4. • एका कढईत ३ -४ टेबलस्पून तूप ग्राम करून घ्यावे . त्यात फणसाचे तुकडे मध्यम आचेवर ५-६ मिनिटे परतून घ्यावेत . एका ताटलीत काढून घ्यावेत .
  5. • त्याच कढईत अजून २-३ टेबलस्पून तूप घालून मध्यम आचेवर बटाट्याच्या फोडी बाहेरून कुरकुरीत आणि आतपर्यंत शिजेपर्यंत परतून घ्याव्यात . त्यासाठी आच मंद ते मध्यम करून झाकून बटाटे ५-६ मिनिटे शिजू दयावेत .
  6. • मॅरिनेशनसाठी एका मोठ्या भांड्यात दही , हळद, लाल मिरची पूड, गरम मसाला , धणे पावडर आणि मीठ घालून नीट फेटून घ्यावे . त्यातच हिरवे वाटण, कांद्याची पेस्ट आणि पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकत्र करून घ्यावे . यात ज्या तेलात आपण कांदे तळले होते त्यापैकी पाव कप तेल घालावे . चांगले मिक्स करून घ्यावे .
  7. • आता तळलेले फणसाचे व बटाटयाचे तुकडे घालून नीट खाली वर करून घ्यावे . हे मिश्रण झाकून १५ मिनिटे बाजूला ठेवावे .
  8. • बिर्याणीचा भात शिजवण्यासाठी एका मोठ्या टोपात किंवा कढईत ८ ते ९ कप पाणी उकळत ठेवावे . त्यात १-२ टीस्पून तूप , २ टीस्पून मीठ आणि खडे गरम मसाले - तमालपत्र, चक्रीफूल , वेलदोडे , लवंगा, आणि दालचिनी घालावे . पाण्याला चांगली उकळी येऊ द्यावी .
  9. • पाण्याला दणकून उकळी आली की त्यात भिजवलेले तांदूळ घालून ९० टक्के शिजेपर्यंत शिजवावेत . साधारण ५ मिनिटांत तांदूळ शिजतात . गॅस बंद करावा आणि भात चाळणीतून उपसूनएका मोठ्या परातितर किंवा ताटात काढावा . पूर्ण थंड होऊ द्यावा .
  10. • एका कढईत २ टेबलस्पून तूप गरम करावे . त्यात मॅरीनेट केलेले फणसाचे व बटाट्याचे तुकडे मिश्रणासकट घालावेत . पाव कप पाणी घालावे . झाकून मंद आचेवर चांगले शिजू द्यावे .
  11. • दहा मिनिटांत फणस नी बटाटे मसाल्यात मुरून शिजले की त्यात टोमॅटो चे तुकडे घालावेत . मंद आचेवर झाकून पूर्ण शिजू द्यावेत ,
  12. • साधारण ८ मिनिटांत टोमॅटो शिजले की गॅस बंद करावा आणि बिर्याणीच्या लेअरिंग साठी एका हंडीला किंवा मोठ्या जाड बुडाच्या पातेल्याला तळाला व कडांना तूप लावून घ्यावे .
  13. • तळाशी पहिला थर शिजलेल्या भाजीचा लावावा . अर्धी भाजी वरच्या थरासाठी राखून घ्यावी . त्यावर थोडा तळलेला कांदा पसरावा. नंतर अर्धा भात पसरावा . तळलेला कांदा नी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी . हा झाला बिर्याणीचा पहिला थर पूर्ण ! अशाच प्रकारे दुसरा थर सुद्धा लावून घ्यावा .
  14. • शेवटी हंडीच्या कडांनी थोडे तूप सोडावे , वरून केशराचे पाणी शिंपडावे .
  15. • आता बिर्याणीला धुन्गार देण्यासाठी एक कोळसा चांगला पेटवून घ्यावा . कांद्याच्या सालीवर ठेवून बिर्याणीच्या वरील थरावर मध्यभागी ठेवावा . त्या कोळशावर थोडे तूप घालावे . जसा धूर निघू लागला की पटकन हंडीचे झाकण बंद करावे व १-२ मिनिटासाठी हंडी तशीच बंद ठेवावी .
  16. • नंतर कोळसा कांद्याच्या सालीसकट बाजूला काढावा . हंडी अल्युमिनिम फॉईल किंवा कणकेने बंद करावी . झाकणावर एक मोठे जाद पातेले किंवा खलबत्ता ठेवावा जेणेकरून हंडीत वाफेचा दाब चांगला निर्माण होईल . मोठ्या आचेवर ३ मिनिटे हंडी ठेवावी .
  17. • बाजूला एक लोखंडी तवा मोठ्या आचेवर चांगला तापवून घयावा . ३ मिनिटांनंतर हंडी या तव्यावर ठेवावी व आच मंद करावी . दहा मिनिटे दम वर बिर्याणी शिजू द्यावी .
  18. • नंतर हंडी उघडून गरम गरम वाफाळती बिर्याणी बीटरूट रायता किंवा अन्य कोशिंबिरी सोबत वाढावी !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/kachhya-phansachi-biryani-raw-jackfruit-dum-biryani/