कितीजणांसाठी बनेल : ३-४ तयारीसाठी वेळ : ४५ मिनिटे शिजवण्यासाठी वेळ : ३० मिनिटे
Ingredients
साहित्य :
अर्धा किलो करंदी ( लहान आकाराची कोळंबी / कोळंबीची पिल्ले ) - साफ करून , वजन साधारण २४० ग्रॅम्स
अर्धा टीस्पून हळद
मीठ
अर्धा कप किसलेले सुके खोबरे - ५० ग्रॅम्स
तेल
७-८ लसणीच्या पाकळ्या
१ मध्यम आकाराचा कांदा लांब चिरून = ७० ग्रॅम्स
पाव कप कोथिंबीर
१०-१२ कढीपत्ता
१ लहान कांदा पातळ लांब चिरून = ५० ग्रॅम्स
२ टेबलस्पून मालवणी मसाला ( नसल्यास दीड टेबलस्पून काश्मिरी/बेडगी मिरची पावडर + अर्धा टेबलस्पून गरम मसाला )
१०० ग्राम टोमॅटो बारीक चिरलेले
३-४ कोकमं
Instructions
कृती:
करंदी व्यवस्थित साफ करून घ्यावी. त्यासाठी तिचे डोके, शेपूट, मधले कवच नी पाय नीट अलगद हाताने काढून घ्यावेत . धसमुसळेपणा केला तर ती मधूनच तुटते . नंतर एकदाच पाण्यातून स्वच्छ धुऊन चाळणीत काढून घ्यावी .
एका भांड्यात करंदीला हळद आणि मीठ लावून घ्यावे . दहा मिनिटे बाजूला ठेवावे.
एका लंगडीत सुके खोबरे खरपूस भाजून घ्यावे आणि एका ताटलीत बाजूला काढून घ्यावे . त्याच लंगडीत २ टेबलस्पून तेल गरम करून त्यात लसूण घालावी . जराशी गुलाबी रंगावर आली की कांदा घालावा . कांदा खरपूस परतला की कोथिंबीर तेलातच परतून घ्यावी. मग शेवटी भाजलेले खोबरे घालून नीट एकत्र करून घ्यावे . हे वाटण पूर्ण थंड झाले की पाणी घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे .
लंगडीत २ टेबलस्पून तेल गरम करावे . त्यात ताज्या कढीलिंबाची फोडणी करावी . लहान कांदा लांब चिरून घालावा . जरासा पारदर्शक झाला की त्यात २ टेबलस्पून भरून मालवणी मसाला घालावा . मसाला करपू नये म्हणून २ टेबलस्पून पाणी घालून परतून घ्यावे .
आता वाटलेला मसाला घालून वरून अर्धा कप पाणी घालावे . मसाला चांगला मध्यम आचेवर झाकून शिजू द्यावा .
साधारण दहा मिनिटांनंतर टोमॅटो घालावे व चवीपुरते मीठ घालून एकत्र करून घ्यावे . झाकण घालून टोमॅटो पूर्ण शिजू द्यावे .
७-८ मिनिटांनी करंदी घालावी आणि हलक्या हाताने चमच्याने वर खाली मसाल्यात करून घ्यावी . फक्त २ मिनिटे शिजण्यास पुरेसे आहेत . त्यानंतर कोकमं पिंजून घालावीत आणि एकत्र ढवळून घ्यावीत . फक्त १ मिनिट कोकमाचा रस करंदीत उतरू द्यावा . त्यानंतर गरमागरम करंदी तांदळाची भाकरी , पोळी किंवा पावासोबत मिटक्या मारत खावी !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/konkani-karandi-sukka-baby-shrimps-sukka/