हिवाळ्यातले शास्त्र - गाजराचा हलवा
Author: 
Recipe type: Dessert
Cuisine: Indian
 
Ingredients
  • तयारीसाठी वेळ : १५ मिनिटे
  • शिजवण्यासाठी वेळ : १ तास
  • कितीजणांना पुरेल : ६ ते ८
  • साहित्य:
  • १ किलो गाजरे ( लाल रंगाची )
  • २५० ग्रॅम साखर
  • २५० ग्रॅम्स खवा
  • ७५० ml दूध
  • १ टीस्पून वेलची पावडर
  • अर्धा कप सुका मेवा आणि बेदाणे
  • पावकप तूप
  • २-३ थेंब खाण्याचा गुलाब इस्सेन्स
Instructions
  1. १. खरी चव गाजराच्या निवडीत : हलव्यासाठी गाजर घेताना लालबुंद आणि अगदीच मळ्यातून खुडून नाही , तरी ताजी गाजरे पाहून घ्यावीत . लेचीपेची , डागाळलेली गाजरे तर प्रश्नच दूर .... गाजरे स्वतः निवडून घ्यावीत . नाहीतर भाजी विक्रेत्याने तुमचा डोळा चुकवून एखादे दुसरे जून किंवा खराब गाजर तराजूत तोललेच म्हणून समजा ! अति लहान किंवा लठ्ठ गाजरे घेऊ नयेत , मध्यम आकाराची बेस्ट !
  2. शक्यतो जेव्हा हलवा बनवायचा आहे तेव्हाच गाजरे आणून लगेच किसायला घ्यावीत , फ्रिजमध्ये ठेवणे टाळावे . सर्वप्रथम पाण्यात गाजरे व्यवस्थित बुचकळवुन धुवावीत . नंतर चाळणीत निथळत ठेवावीत किंवा स्वच्छ कापडाने पुसून घ्यावीत , म्हणजे अतिरिक्त पाण्याचा अंश राहणार नाही .
  3. २. किस बाई किस : गाजराची दोन्ही टोके कापून, त्यांच्या अंतर्भागाचा कोवळा भाग शाबूत राहील इतक्याच नाजूकपणे सोलण्याने ( peeler ) त्यांच्या साली काढून घ्याव्यात . नंतर त्यांचे ३-४ इंचाचे तुकडे करून घ्यावेत म्हणजे किसणीवर किसताना हातात नीट धरता येतील . किसताना शक्यतो किसणीच्या मध्यम आकाराच्या छिद्रांचा वापर करावा . तसेच गरज असल्यास इथे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावयास बिलकुल कचरू नये . मी इथे माझा स्वयंपाकघरातील शिलेदार " फूड प्रोसेसर" यांचा उल्लेख करीत आहे . जेव्हा पाहुणे येति घरा , तेव्हा अशा वेळखाऊ कामांसाठी फूड प्रोसेसर नक्की उपयोगी पडतो . टीप : जेव्हा १ किलो चा हलवा बनवायचा असतो तेव्हा साधारण ११०० किंवा १२०० ग्राम गाजरे घ्यावीत म्हणजे सोलून त्यांचे वजन १ किलो पर्यंत येते . याला कलिनरी सायन्स मध्ये " Preparation Loss " असे म्हणतात .
  4. ३. दुग्ध-शर्करा योग : किसलेले गाजर एका जाड बुडाच्या कढईत घालून त्यात दूध आणि साखर घालावे . मध्यम आचेवर या मिश्रणाची भट्टी जमू द्यावी . नंतर झाकण घालून हा मिलाप चांगला ४५ मिनिटे ते १ तास होऊ द्यावा . इथे घाईचे काम नाही , गाजरे स्वतःच्या रसात नी दूधसाखरेत जितकी उत्तम शिजतात तितकाच रसरशीत पणा हलव्याला येतो . म्हणून हलवा बनवताना आधी हे मिश्रण शिजत घालावे नी तोपर्यंत सगळा स्वयंपाक आटपून घ्यावा किंवा आवडत्या वेबसीरिजचा एखादा एपिसोड बघून घ्यावा .
  5. ४. लुसलुशीत : जसजसे दूध गाजराने शोषून घेतले की बाजूला एका तव्यात खवा हलका गुलाबी रंगावर २ ते ३ मिनिटे परतून घ्यावा . खव्याचा लुसलुशीत पणा शाबूत ठेवूनच खवा भाजावा . जर जास्त भाजून दाणेदार झाला तर गाजरात मिळून येत नाही .
  6. ५. मेव्याची रंगत : गाजर शिजून दूध आटले की एका ताटात काढून घ्यावे . कढईत तूप मंद आचेवर वितळवून त्यात सुका मेवा हलकासा परतून घ्यावा . बेदाणे छान फुलले पाहिजेत . बाजूला काढून घ्यावेत . त्याच तुपात शिजलेले गाजर २-३ मिनिटे परतून घ्यावे . गाजराच्या कणाकणांना तुपाचा सुगंध आणि चव लपेटून एक अप्रतिम चव येते . नंतर खवा घालून हलव्यात एकत्र करून घ्यावा . गरज वाटल्यास चमच्याने हलके दाबून खवा मिक्स करावा . तुपात परतलेला सुका मेवा घालून एकदा एकत्र करून घ्यावे .
  7. ६. शाही सुगंध : गाजराच्या हलव्यात वेलदोडे कुटून घालणे हे शास्त्र आहे , आणि हलवा आचेवरून उतरवायच्या क्षणभर आधीच मिसळून द्यावे . आपल्या पाहुण्यांना नवाबी थाटाची मेजवानी तुम्ही प्लॅन करत असाल तर एक दोन थेंब खायचे गुलाब इससेन्स किंवा केवडा इससेन्स हलकेच मिसळून द्यावे . चांदीचा वर्ख असल्यास हात बिलकुल मागे न घेता वर लावून द्यावा .
  8. गाजराचा हलवा वरून सुक्यामेव्याचे काप आणि तुपाची धार सोडून गरमागरम खावयास द्यावा .
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/traditional-dessert-gajar-halwa-in-marathi/