BARODA MUTTON PULAO - बडोदा मटण पुलाव - Shahi Baroda Mutton Pulao
Author: 
Recipe type: Main
Cuisine: Indian
 
Ingredients
  • कितीजणांना पुरेल: ४ ते ५
  • तयारीसाठी वेळ : ३० मिनिटे
  • शिजवण्यासाठी वेळ : ६० मिनिटे
  • साहित्य:
  • भाताचे साहित्य:
  • दीड कप = ३०० ग्रॅम मोठ्या दाण्यांचा सुवासिक बासमती तांदूळ . तांदूळ स्वच्छ धुऊन किमान अर्ध्या तासासाठी पाण्यात भिजवून ठेवावा.
  • २ तमालपत्रे
  • ३ चक्रीफूल
  • ४-५ काळ्या मिऱ्या
  • ४-५ वेलदोडे
  • ४ लवंगा
  • २ इंच दालचिनीचा तुकडा
  • १ टीस्पून धणे
  • १ टीस्पून बडीशेप
  • १ मोठा कांदा = १०० ग्रॅम्स लम्ब पातळ चिरलेला
  • १० बेडगी सुक्या लाल मिरच्या
  • मटणाचे साहित्य:
  • अर्धा किलो बकऱ्याचे /बोकडाचे मटण , स्वच्छ धुऊन मध्यम आकाराचे तुकडे करून
  • २ मध्यम आकाराचे कांदे = १५० ग्रॅम्स लांब चिरून
  • १ टेबलस्पून खसखस १- २ तास पाण्यात भिजवून
  • २ टेबलस्पून किसलेलं सुकं खोबरं
  • १ टीस्पून जिरे
  • २ टेबलस्पून आले लसणाची पेस्ट
  • १ टीस्पून हळद
  • २ टीस्पून तिखट लाल मिरची पूड
  • इतर साहित्य:
  • पाव कप किसलेले ओले खोबरे
  • पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर
  • २ टेबलस्पून तळलेले काजू
  • १ कप तळलेला कांदा ( बिरिस्ता )
  • थोडे केशराचे धागे २ टेबलस्पून दुधात भिजवून
  • चवीनुसार मीठ
  • तूप
Instructions
  1. कृती:
  2. पुलावाचा भात शिजवण्यासाठी , पहिल्यांदा एका सुती कापडात भाताच्या साहित्यात दिलेले सगळं साहित्य करकचून घट्ट बांधून त्याची एक पोटली बनवावी .
  3. भात शिजवण्यासाठी भातापेक्षा किमान ५ ते ६ पट पाणी एका कढईत उकळत ठेवावे . त्यात ही पोटली घालावी आणि पाण्याला हळूहळू उकळी येताच ही पोटली बाजूला काढून घ्यावी . म्हणजे या मसाल्यातले रस आणि सुगंध पाण्यात उतरतील .
  4. आता भिजवलेले तांदूळ घालून त्यातच १ टीस्पून मीठ आणि १ टीस्पून तूप घालावे . म्हणजे भाताला चव तर येतेच पण पुलावात भात मोकळा राहतो .
  5. भात साधारण ८० ते ९० टक्के होईपर्यंत शिजवून घ्यावा , भाताचे एक शीत कच्चे राहील इतका ! अगदीच बोटचेपी होऊ देऊ नये .
  6. भात शिजला की एका ताटात उपसून पसरून ठेवावा म्हणजे मोकळा राहतो .
  7. आता मटणासाठी आपल्याला मसाले वाटून घ्यायचे आहेत . सुके खोबरे , भिजवलेली खसखस, नि जिरे यांची साधारण २-३ टेबलस्पून किंवा लागेल तितकेच पाणी घालून घट्ट बारीक पेस्ट वाटून घ्यावी . तसेच एका तव्यात १ टेबलस्पून तूप घालून गरम करून घ्यावे . यात पोटलीतले सारे मसाले एकत्र चुरचुरीत होईपर्यंत परतून घ्यावेत . हे मसाले थंड झाले की साधारण अर्धा कप पाणी घालून त्याची बारीक पेस्ट वाटून घ्यावी .
  8. एका मोठ्या कढईत ३ टेबलस्पून तूप गरम करून घ्यावे . त्यात लांब चिरलेले कांदे घालून कडांनी हलके तांबूस होईपर्यंत परतावे.
  9. आता हळद , लाल मिरची पूड घालून जराशी परतून घ्यावी . त्यातच आले लसणाची पेस्ट, खसखस पेस्ट , आणि मसाल्याची पेस्ट घालावी .
  10. थोडेसे अर्धा कप पाणी घालून चांगले दहा एक मिनिटे परतून घ्यावे . मसाला चांगला कडांनी तूप सुटेपर्यंत शिजवून घ्यावा .
  11. आता मटणाचे तुकडे घालावेत . मीठ घालून वरून दीड कप उकळते गरम पाणी घालावे . झाकण घालून मंद आचेवर मटण पूर्ण शिजू द्यावे .
  12. साधारण ३५ ते ४५ मिनिटे मटण शिजायला लागतात . मटणाच्या प्रतीवर वेळ अवलंबून असते . मसाला जरासा दाट सर झाला की गॅस बंद करावा .
  13. पुलावाला दम देण्यासाठी एका बिर्याणी हंडीचा किंवा जाड बुडाच्या पसरट पातेल्याचा किंवा डेगची चा वापर करावा . मोठ्या गॅस वर एक लोखंडी तवा तापत ठेवावा .
  14. हंडीत पहिल्यांदा सगळीकडे तूप लावून घ्यावे म्हणजे पुलाव खाली लागणार नाही . पहिला थर मटणाचा, त्यावर तळलेला कांदा, अर्धा भात , बारीक चिरलेली कोथिंबीर , किसलेले ओले खोबरे , केशराचे दूध , तळलेले काजू असे पसरून याचप्रमाणे दुसरा थर सुद्धा लावून घ्यावा . हंडी कणकेच्या मऊ गोळ्याने किंवा ऍल्युमिनिअम फॉईल ने घट्ट बंद करून घ्यावी जेणेकरून वाफ बाहेर पडणार नाही .
  15. पहिल्यांदा हंडी २ मिनिटे मोठ्या आचेवर ठेवावी कि त्यात उष्णता निर्माण होते आणि वाफेचा दाब तयार होतो . नंतर तापवलेल्या लोखंडी तव्यावर हंडी ठेवावी . आच मंद करून १२ ते १५ मिनिटे दम वर पुलाव शिजवावा.
  16. नंतर गॅस बंद करून हंडी खाली उतरवावी आणि ५ मिनिटानंतर स्वादिष्ट बडोदा मटण पुलाव वाढावयास घ्यावा . बुंदीचे रायते सोबत असण्यास हरकत नाही .
  17. टीप : या पुलावाला कोळशाचा धुन्गार सुद्धा देतात . त्यासाठी कोळशाचे तुकडे जाळावर चांगले लालबुंद पेटवून एका वाटीत घ्यावेत त्यावर थोड्या तुपाची धार सोडावी . जसा धूर येऊ लागला कि ही वाटी पुलावाचे थर लावून झाल्यावर हंडीत १-२ मिनिटांसाठी ठेवावी आणि हंडी गच्च झाकावी . नंतर वाटी काढून हंडी कणकेच्या गोळ्याने किंवा अल्युमिनियम फॉईल ने बंद करून दम वर शिजायला ठेवावी !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/shahi-baroda-mutton-pulao/