Rava Amboli recipe in Marathi| रव्याची आंबोळी| लुसलुशीत रवा आंबोळी
Author: Smita Mayekar Singh
Recipe type: Breakfast
Cuisine: Indian
Ingredients
किती बनतील : ८-१०
साहित्य:
१ कप = २०० ग्रॅम्स गव्हाचा बारीक रवा
अर्धा कप = १२५ ग्रॅम्स उडीद डाळ
अर्धा कप = ४० ग्रॅम्स पोहे
१ टीस्पून मीठ
तेल
पाणी गरजेनुसार
Instructions
कृती:
सगळ्यात आधी उडीद डाळ आणि पोहे स्वच्छ धुऊन ३-४ तासांसाठी भिजत घालावेत . रवा आंबोळीचे वाटण करण्याआधी फक्त ३० ते ४५ मिनिटें आधी भिजत घालावा .
४ तासांनंतर डाळ आणि पोह्यातले जास्तीचे पाणी काढून टाकून ते एकत्र मिक्सरला अगदी बारीक वाटावी .वाटताना साधारण पाऊण कप पाण्याचा मी वापर केला आहे . त्या आधी रवा साधारण अडीच कप पाण्यात अर्ध्या तासासाठी भिजत घालावा .
रवा भिजला की तो डाळीच्या वाटलेल्या मिश्रणात हाताने एकाच दिशेने गोलाकार फिरवत नीट मिसळून घ्यावा . ही क्रिया साधारण ५-६ मिनिटे करावी .
हे पीठ सरसरीत पातळ असावे . झाकण घालून ८ ते १० तासांसाठी आंबवण्यासाठी ठेवावे.
८ ते १० तासांनंतर हे पीठ चांगले फुगून वर येते . त्यात मीठ घालून हलक्या हाताने डावाने ढवळून घ्यावे.
आंबोळी बनवण्यासाठी एक बिडाची काहील किंवा नॉन स्टिक तवा तापवून घ्यावा. त्यावर तेल चांगले पसरवून घ्यावे. नारळाच्या शेंडीचा किंवा कांद्याचा वापर करावा तेल पसरवून घेण्यासाठी. आच मंद ते मध्यम ठेवून २ डाव भरून आंबोळीचे पीठ तव्याच्या मध्यमभागी घालून गोलाकार पसरवून घ्यावे. आंबोळ्या जास्त पातळ न घालता जाडसरच बनवाव्यात . झाकण घालून २-३ मिनिटे एका बाजूने शिजून द्यावी. त्यानंन्तर झाकण काढून आंबोळी पलटवून दुसऱ्या बाजूनेही शिजू द्यावी.
अशा प्रकारे साऱ्या आंबोळ्या बनवून घ्याव्यात . कोकणात या आंबोळ्या नारळाच्या किंवा कैरीच्या चटणीबरोबर , काळ्या वाटाण्याच्या सांबारासोबत आणि चिकन / मटणाच्या रस्स्यासोबत फारच छान लागतात !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/rava-amboli-recipe-in-marathi/