कोळंबीला हळद, लिंबाचा रस व मीठ चोपडून १५ मिनिटांसाठी झाकून ठेवावे.
सुके खोबरे कढईत कोरडे खरपूस भाजून घ्यावे .
त्याच कढईत २ टेबलस्पून तेल घालून त्यात लसूण तळून घ्यावी . मग कांदा घालून खरपूस करड्या रंगावर तळून घ्यावा. त्यात कोथिंबीर चांगली परतून घ्यावी. मग भाजलेले खोबरे घालून एकत्र करावे , हे मिश्रण पूर्ण थंड करावे.
थंड झाल्यावर अर्धा कप पाणी घालून बारीक गंधासारखे वाटण करून घ्यावे. तसेच टोमॅटोची प्युरी देखील वाटून घ्यावी.
कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करून त्यात कढीपत्त्याची फोडणी घालावी. आता गॅस मंद करून त्या तेलात मालवणी मसाला घालून परतून घ्यावा . करपू देऊ नये . आता वाटण घालून नीट परतून घ्यावे . मसाल्याला चांगले तेल सुटेपर्यंत मसाला परतावा, गरज वाटल्यास थोडं पाणी घालून परतून घ्यावा .
आता बटाटे आणि शेंगा घालाव्यात . १-२ कप गरम पाणी घालावे . मध्यम आचेवर उकळी येऊ द्यावी . आच मंद करून ५-६ मिनिटे झाकून शिजवून घ्यावे.
नंतर कोळंबी घालून एकत्र करून घ्यावी . झाकण घालून मंद आचेवर २-३ मिनिटे शिजवावी .
मग टोमॅटोची प्युरी घालून काही मिनिटे कच्चेपणा जाईपर्यंत शिजवून घ्यावी . ५ मिनिटे साधारण शिजल्यानंतर त्यात कोकम घालून चवीप्रमाणे मीठ घालावे . २ मिनिटे झाकण न घालता शिजवावे .
कोळंबीचे कालवण तयार आहे , वाढण्याआधी जरा वेळ वाफ निघून गेली की मग वाढावे . तांदळाची भाकरी, आंबोळी , घावन किंवा भातासोबत अप्रतिम लागते !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/kolambi-kalvan-recipe-in-marathi/