Chole Bhature recipe in Marathi- छोले भटूरे- Kali Mirch by Smita
Author: 
Recipe type: Snacks
Cuisine: Indian
 
Ingredients
तयारीसाठी वेळ: ४-५ तास
बनवण्यासाठी वेळ : ३० मिनिटे
किती बनतील: १२- १५
साहित्य :
 • २ कप = ३०० ग्रॅम्स मैदा
 • पाव कप = ४० ग्रॅम्स बारीक रवा
 • अर्धा कप = १२५ ग्रॅम्स दही
 • अर्धा टीस्पून साखर
 • अर्धा टीस्पून मीठ
 • १ टीस्पून बेकिंग सोडा
 • १ टेबलस्पून तूप
 • पाणी गरजेनुसार
 • तळण्यासाठी तेल
छोले मसाला
 • तयारीसाठी वेळ : ८-९ तास ( छोले भिजण्यासाठी )
 • शिजवण्यासाठी वेळ : ३० मिनिटे
 • कितीजणांना पुरेल : ४-५
साहित्य :
 • १ कप = २०० ग्रॅम्स काबुली चणे , रात्रभर पाण्यात भिजवून
 • २ मोठे कांदे = २०० ग्रॅम्स बारीक चिरून
 • ४ मोठे टोमॅटो = ४०० ग्रॅम्स बारीक चिरून
 • ३ हिरव्या मिरच्या
 • दीड इंच आल्याचा तुकडा
 • २ तमालपत्र
 • दीड इंच दालचिनीचा तुकडा
 • २ मसाला वेलची
 • ४ हिरव्या वेलच्या
 • ४ लवंग
 • तेल
 • २ टीस्पून चहा पावडर
 • पाव टीस्पून हळद
 • अर्धा टीस्पून काश्मिरी लाल मिरची पूड
 • अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर
 • १ टीस्पून धणे पावडर
 • १ टीस्पून भाजलेली जिरे पावडर
 • २ टीस्पून छोले मसाला
 • २ टीस्पून अनारदाना पावडर
 • १ टीस्पून साखर
 • पाव टीस्पून बेकिंग सोडा
 • मीठ चवीनुसार
 • फोडणीसाठी :
 • १ टेबलस्पून तूप
 • अर्धा टीस्पून काश्मिरी लाल मिरची पूड
 • २ हिरव्या मिरच्या मधून चिरलेल्या
 • १ इंच आल्याचे लांब पातळ चिरलेले तुकडे
Instructions
कृती:
भटूरे
 1. सर्वप्रथम रवा गरम पाण्यात भिजवून ठेवावा . रवा बुडेल इतपतच पाणी घालावे . फार पातळ करू नये . १० मिनिटे भिजत घालावा .
 2. चाळणीत मैदा आणि मीठ एकत्र करून परातीत चाळून घ्यावे .
 3. मैद्यात १ टेबलस्पून तूप घालून व्यवस्थित रगडून घ्यावे. ब्रेड क्रम्ब्स सारखे मैदा दिसू लागतो . आता त्यात बेकिंग सोडा अन साखर घालून नीट एकत्र करून घ्यावे. आता दही आणि भिजलेला रवा घालून नीट मिसळून घ्यावा .
 4. थोडे थोडे गरम पाणी घालून हे पीठ घट्ट मळून घ्यावे . हाताला तेल लावून पीठ " स्ट्रेच अँड पुल " म्हणजे ताणून खेचणे या पद्धतीने मळून लवचिक बनवावे . पाणी घालून मऊ करू नये . मी मळताना फक्त दीड टेबलस्पून पाणी वापरले आहे .
 5. आता हा मैद्याचा गोळा एक मलमलचे कापड भिजवून घट्ट पिळून त्यात गुंडाळून ठेवावा ४ ते ५ तासांसाठी !
 6. ४ तासानंतर आपण भटुरे लाटायला घेऊ . हलक्या हाताने मैद्याचा लंबगोल बनवून घ्यावा. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दोन बोटांच्या पोकळीने त्याला पीळ घालून गोळे तोडून घ्यावेत . गोळे नीट हाताचा पंजा करून लवचिक करून घ्यावा , त्यावर भेगा राहू देऊ नयेत . प्रत्येक गोळ्यांवर तेल लावावे आणि उरलेल पीठ मलमलच्या कपड्यात गुंडाळून ठेवावे.
 7. भटुरे लाटताना पिठाचा किंवा मैद्याचा वापर न करता पोळपाटाला तेल लावून त्यावर लाटावेत . लंबगोल आकारात लाटून मध्यभागी पातळ आणि कडांना जाडसरच राहतील असे लाटावेत .
 8. कढईत तेल चांगले गरम करून घ्यावे . तेल अजिबात थंड नाही राहिले पाहिजे. भटुरे तेलात घालण्यापूर्वी त्यांच्या कडा थोड्या ओढून अजून लांब कराव्यात अन मगच तेलात भटुरा सोडावा .
 9. झाऱ्याने भटुरा दाबावा म्हणजे वाफ पसरून तो चांगला टम्म फुगतो . दुसऱ्या बाजूने उलटून भटुरा चांगला खरपूस तळावा . असेच सारे भटुरे तळून घ्यावे .
छोले मसाला
 1. चहापावडर एका मलमल किंवा सुती कापडात बांधून त्याची पोटली बांधावी . चण्याचे जास्तीचे पाणी काढून टाकून चणे प्रेशर कुकर मध्ये चणे , ३ कप पाणी , खडे गरम मसाले ( २ तमालपत्र ,दीड इंच दालचिनीचा तुकडा ,२ मसाला वेलची ,४ हिरव्या वेलच्या,४ लवंग ) , बेकिंग सोडा , थोडे मीठ आणि चहाची पोटली घालावी . मोठ्या आचेवर ५ मिनिटे शिजवून मग मंद आचेवर १०-१२ मिनिटे चणे शिजवून घ्यावेत . कुकर थंड झाला की छोले वेगळे काढून त्याचे पाणी सांभाळून ठेवावे . भाजी शिजवताना उपयोगी पडते ..
 2. आले आणि मिरच्यांची मिक्सरमधून जाडसर पेस्ट वाटून घ्यावी. वाटताना पाणी घालू नये .
 3. एका कढईत ३ टेबलस्पून तेल घालून त्यात बारीक चिरलेला कांदा घालून अगदी खरपूस करडा होईपर्यंत परतून घ्यावा . त्यात मसाल्याची जाडसर पेस्ट , हळद घालून १-२ मिनिटे परतून घ्यावे .
 4. आता अनारदाना पावडर घालून १-२ मिनिटे परतावे. त्यात बारीक चिरलेले टोमॅटो व मीठ घालून पूर्ण शिजेपर्यंत झाकण घालून शिजवावेत.
 5. टोमॅटो पूर्ण शिजले की त्यात काश्मिरी मिरची पूड, जिरे पावडर , धणे पावडर , गरम मसाला पावडर , आणि साखर घालून नीट एकत्र करून घ्यावेत . ४- ५ मिनिटे मसाला परतून घ्यावा .
 6. मसाल्याला तेल सुटले की त्यात शिजवलेले चणे आणि चण्याचेच पाणी व अजून १-२ कप पाणी घालून मध्यम आचेवर एक उकळी येऊ द्यावी . नंतर मंद आचेवर ५ मिनिटे छोले शिजवून घ्यावेत .
 7. छोल्यांचा रस्सा थोडा घट्ट झाला की आपण त्याला वरून तुपाची फोडणी घालणार आहोत . एका वेगळ्या पॅनमध्ये तूप गरम करून त्यात आल्याच्या काड्या व हिरव्या मिरच्या घालून १ मिनिट परतून घ्यावयात . ही फोडणी छोल्यांवर घालून गॅस बंद करावा . वाढेपर्यंत झाकण घालून ठेवावे .
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/chole-bhature-recipe-in-marathi/