Laal Bhoplyache Gharge recipe in Marathi- लाल भोपळ्याचे घारगे- Kali Mirch by Smita
Author: 
Recipe type: Snack
Cuisine: Indian
 
Ingredients
तयारीसाठी वेळ :१५ मिनिटे
बनवण्यासाठी वेळ : ३० मिनिटे
किती बनतील: २० -२२
साहित्य:
  • १ कप= २०० ग्रॅम्स तांदळाचे पीठ
  • पाव कप = ५० ग्रॅम्स गव्हाचे पीठ
  • अर्धा कप = १०० ग्रॅम्स गूळ किसून किंवा बारीक चिरून
  • २५० ग्रॅम्स लाल भोपळा
  • १ टेबलस्पून तूप
  • अर्धा टीस्पून वेलची पावडर
  • चुटकीभर मीठ
  • तेल तळण्यासाठी
  • पाणी गरजेनुसर
Instructions
कृती:
  1. लाल भोपळयाची वैशिष्ट्ये :वरील सालीचा रंग तांबूस लाल, थोडा टणक आणि मांसल, चवीला गोडसर. महाराष्ट्रीयन गोड़ व्यंजनात याचा प्रामुख्याने वापर केला जातो जसे लाल भोपळ्याची खीर , घारगे यासारखे पदार्थ . या भोपळ्यांपासून बनवलेले भरीत देखील चवीला उत्कृष्ट लागते.
  2. भोपळा स्वच्छ धुऊन त्याच्या साली काढून घ्याव्यात . किसणीच्या मध्यम आकाराच्या छिद्रांनी भोळा किसून घ्यावा. भोपळ्याच्या साली काढल्यावर आणि किसल्यावर त्याचे वजन कमी होऊन साधारण दीड कप म्हणजे १५० ग्रॅम्स इतके होते. रेसिपीमधील बाकी घटक पदार्थाचे प्रमाण ही बाब लक्षात घेऊनच दिले आहे .
  3. एका कढईत १ टेबलस्पून गरम करून त्यावर किसलेला भोपळा मध्यम आचेवर मिनिटभर परतून घ्यावा. मग त्यात किसलेला गूळ घालून बारीक आचेवर वितळू द्यावा. हे घारगे नैवेद्यात खीरीसोबत वाढले जाणार आहेत , परंतु तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर गुळ थोडा वाढवला तरी चालेल!
  4. साधारण ३ मिनिटांत गूळ वितळतो , परंतु गुळाचे पाणी भोपळ्याने पूर्ण शोषून घेईपर्यंत शिजवावे . अजून ३-४ मिनिटांत मिश्रण चांगले मिळून येते . आता वेलची पावडर घालून एकत्र करून गॅस बंद करावा . मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यावे.
  5. एका मोठ्या बाऊलमध्ये , तांदळाचे पीठ , गव्हाचे पीठ व मीठ घालून एकत्र करून घ्यावे. गूळ भोपळ्याचे मिश्रण घालून पिठात नीट एकत्र करून घ्यावे.
  6. पीठ मळण्यासाठी आपण गरम पाणी वापरणार आहोत. पाव कप गरम पाणी थोडे थोडे घालून पीठ पुरीसाठी आपण मळतो तसे घट्ट मळायचे आहे . गरम पाण्यामुळे घारगे छान खुसखुशीत होतात आणि तळताना तेलात चांगले फुगतात ! पीठ मळले की ते १५ मिनिटांसाठी झाकून मुरू द्यावे.
  7. १५ मिनिटांनंतर घारगे थापण्यास सुरुवात करूया. घारगे कधीही लाटले जात नाहीत , त्यांना थापण्यासाठी एका पोळपाटावर सुती पाण्यात भिजवून घट्ट पिळून अंथरावे. आपल्याला ज्या आकाराचे घारगे बनवायचे आहेत त्या आकाराचे गोळे बनवून घ्यावेत.
  8. हाताला पाणी लावून हे गोळे कापडावर चपटे करत गोल थापून घ्यावेत , घारगे जरासे जाडसरच थापावेत , पातळ थापले तर ते नीट फुगत नाहीत .
  9. अशाच प्रकारे ४-५ घारगे एकदम थापून घ्यावेत . तळण्यासाठी तेल कढईत चांगले तापवून घ्यावे . पिठाचा छोटा गोळा तळून पाहावा , जर तो लगेच तळून तेलाच्या वर तरंगू लागला , समजावे की तेल चांगले तापलंय . आच मंद करून कढईच्या कडेने एकेक घारगा तेलात सोडावा , आणि तो स्वतःहून तळून तेलावर येत नाही तोपर्यंत त्याला उलटू नये . घारगा तळून वर आला की उलटावा आणि झाऱ्याने हलके दाबून त्याला फुगू द्यावे.
  10. छान पैकी तांबूस कडा येईपर्यंत खरपूस तळून घ्यावे. अशाच प्रकारे सारे घारगे तळून घ्यावेत.
  11. टीप: तळताना आच मंद ते मध्यम ठेवावी, मोठया आचेवर घारगे तळले तर ते बाहेरून लगेचच तांबूस होतात परंतु आतपर्यंत शिजत नाहीत!
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/laal-bhoplyache-gharge-marathi/