Puranache Dind recipe in Marathi- नागपंचमी विशेष - पुरणाचे दिंड- Kali Mirch by Smita
Author: 
Cuisine: Indian
 
Ingredients
बनवण्यासाठी वेळ : ५० मिनिटे
किती बनतील : १५ - १८
साहित्य:
 • १ कप = २०० ग्रॅम्स चण्याची डाळ , स्वच्छ धुऊन किमान २ तास पाण्यात भिजवून , त्यानंतर पाणी काढून टाकणे
 • १ कप = २०० ग्रॅम्स किसलेला गूळ ( साधा गूळ घ्यावा , चिक्कीचा नाही )
 • अर्धा टीस्पून वेलची पावडर
 • अर्धा टीस्पून सुंठ पावडर
 • दीड कप = २२५ ग्रॅम्स गव्हाचे पीठ
 • १ टीस्पून मीठ किंवा चवीनुसार
 • तूप गरजेप्रमाणे
 • २ टेबलस्पून तेल
Instructions
कृती :
 1. सगळ्यात पहिल्यांदा आपण पुरण शिजवून घेऊ. त्यासाठी आपण १ कप चणा डाळ शिजवण्यासाठी ३ कप पाणी उकळत ठेऊ. त्यात भिजवून पाणी काढलेली चणा डाळ घालून मंद ते मध्यम आचेवर झाकण घालून शिजवावी. साधारण २० मिनिटांत चण्याची डाळ शिजते . हाताने दाबून शिजलीये की नाही ते पाहावे. गॅस बंद करून डाळीचे पाणी चाळणीतून गाळून वेगळे काढावे . या पाण्याची आपल्याला कटाची आमटी बनवता येईल .
 2. एका कढईत शिजलेली चण्याची डाळ आणि किसलेला गूळ घालून मंद आचेवर शिजू द्यावे.
 3. जसेजसे गूळ वितळू लागेल तसतसे एका मॅशर ने डाळ आणि गूळ एकत्र जाडसर घोटून घ्या. पुरणपोळीसाठी आपण पुरण शिजल्यावर मऊसूत वाटून घेतो . परंतु दिंडासाठीचे पुरण जाडसर असावे. म्हणून कढईतच शिजताना पुरण जाडसर घोटून घ्यावे.
 4. मध्यम आचेवर पुरण जरासे कोरडे होईपर्यंत शिजवावे. पुरण पातळ राहू देऊ नये नाहीतर ते दिंडात भरणे अशक्य होईल . मग वेलची पावडर आणि सुंठ पावडर घालून नीट एकत्र करून घ्यावे. गॅस बंद करून कढई खाली उतरवावी . पुरण थंड होऊ द्यावे.
 5. तोपर्यंत दिंडासाठी कणिक मळून घेऊ. एका खोलगट भांड्यात गव्हाचे पीठ , मीठ घालून एकत्र करून घ्यावे. त्यात २ टेबलस्पून कडकडीत गरम तेलाचे मोहन घालावे. नीट पिठात चोळून घ्यावे. असे केल्याने दिंड खुसखुशीत होतात आणि खाताना चिकट किंवा गिळगिळीत लागत नाहीत.
 6. पाणी घालून कणिक घट्ट मळून घ्यावी , जशी आपण पुरीसाठी मळतो तशीच ! मी अर्धा कप पाणी वापरले आहे कणिक मळण्यासाठी. ही कणिक किमान १५ मिनिटे तरी झाकून मुरू द्यावी.
 7. १५ मिनिटांनंतर परत एकदा कणिक चांगली दाब देऊन मळून घ्यावी . एका छोट्या लिंबाएवढे गोळे करून घ्यावेत . इतके चांगले दाब देऊन गोळे बनवावेत की त्यावर भेगा नाही राहिल्या पाहिजेत! हाताला तूप लावून गोळे मळून घ्यावेत.
 8. आता आपण दिंडासाठी पातळ पाऱ्या लाटून घेऊ. पोळपाटावर तुपाचा हात लावून एका पुरीच्या जाडीएवढ्या गोल पाऱ्या लाटून घेऊ. लाटण्यासाठी पीठ वापरू नये.
 9. जितक्या आकाराचा कणकेचा गोळा घेतला होता साधारण तेवढाच पुरणाचा गोळा घ्यावा .नीट गोल करून पारीच्या मध्यभागी ठेवावा . दिंड हे आयताकृती असतात . म्हणून पारीची वरची आणि खालची दोन्ही टोके दुमडून मध्यभागी चिकटवावीत. तसेच बाजूची दोन्ही टोके देखील मध्ये चिकटवावीत. असे दिंडाचे आयत तयार करून घ्यावेत. एका ताटलीत तुपाचा हात लावून त्यात तयार केलेले दिंड ठेवावेत .
 10. मोदकपात्रात पाणी उकळत ठेवावे. मोदकांच्या थाळीला ( भोके असतात ) तुपाचा हात लावावा व दिंड एका बाजूला एक असे लावून घ्यावेत . चिकटवून ठेवू नये , थोडे अंतर दोन दिंडाच्या मध्ये ठेवावे. कारण जसजसे दिंड उकडले जातात तसे ते प्रसरण पावतात आणि एकमेकांना चिकटूशकतात !
 11. पात्रात पाणी उकळले की आच मध्यम करावी आणि दिंड १८ ते २० मिनिटे व्यवस्थित वाफवून घ्यावेत . दिंड शिजल्यावर त्यांचा रंग थोडा बदलतो आणि एका एका सुरीच्या साहाय्याने दिंड शिजले असल्याची खात्री करू शकता !
 12. हे दिंड गरम गरम साजूक तुपाची धार घालून खावयास द्यावे !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/puranache-dind-recipe-in-marathi/