एका पॅन मध्ये २ टेबलस्पून तेल गरम करून त्यात बडीशेपची फोडणी द्यावी. आता किसलेले आले घालून १-२ मिनिटे परतावे. आल्याचा कच्चेपणा निघून गेल्यावर त्यात चिरलेला कांदा घालून ५ मिनिटे मऊ होईपर्यंत शिजवावा. हळद आणि लाल मिरची पूड घालून घ्यावी.
मसाले करपू नयेत म्हणून अगदी थोडे पाणी घालून परतून घ्यावेत. चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालावी. उकडून मॅश केलेले बटाटे घालून एकत्र करून घ्यावेत. आमचूर पावडर, अनारदाना पावडर , आणि उरलेली कोथिंबीर घालून नीट एकत्र करून घ्यावे. गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्यावे.
बेसनाचा घोळ बनवण्यासाठी एका खोलगट भांड्यात बेसन, ओवा, हळद, लाल मिरची पूड, आले लसणाची पेस्ट , आणि चवीपुरते मीठ घालून ढवळून घ्यावे. या मिश्रणात १ टेबलस्पून कडकडीत गरम केलेले तेल घालून एकत्र करावे. तेलाचे मोहन घातल्याने मिरची वडे चुरचुरीत बनतात. आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्ट पीठ भिजवावे. हा घोळ चमच्याच्या मागच्या भागाला कोट होईल इतपत घट्ट असावा. पातळ असू नये , नाहीतर मिरच्या तुरट कच्या कच्य्या लागतील. मी पाऊण कप पाणी वापरून घट्ट बेसनाचा घोळ बनवला आहे .
मिरच्यांचे देठ ठेवून त्यांच्या पोटाकडच्या भागावर मधोमध चिरा देऊन , जमतील तेवढ्या बिया काढून टाकाव्यात. या मिरच्या बटाट्याच्या तयार केलेल्या सारणाने भरून बंद कराव्यात . जास्तीचे सारण काढून टाकावे .
मिरच्यांना बेसनाच्या घोळात बुडवून तळण्यासाठी एक सोप्पी युक्ती ! एका छोट्या ग्लासमधे ज्यात मिरच्या पूर्णपणे उभ्या बुडतील , त्यात बेसनाचा घोळ घालावा . नंतर त्यात मिरच्या बुडवून , मग कढईत तळाव्यात .
तळण्यासाठी तेल चांगले गरम आहे की नाही हे पाहण्यासाठी बेसनाचे २-३ थेंब घालून पाहावे . जर ते तळून लगेचच वर आले तर समजावे की तेल तापले आहे. मंद ते मध्यम आचेवर मिरच्या खरपूस तळून घ्याव्यात.
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/mirchi-vada-recipe-in-marathi/