Chicken Dum Biryani recipe in Marathi- चिकन दम बिर्याणी- Kali Mirch by Smita
Author: Smita Mayekar Singh
Recipe type: Main
Cuisine: Indian
Ingredients
कितीजणांसाठी बनेल : ४ ते ५
शिजवण्यासाठी वेळ : ५५ मिनिटे
साहित्य :
७५० ग्रॅम्स चिकन , मध्यम आकाराचे तुकडे करून, स्वच्छ धुऊन व साफ करून
१ कप ताजी कोथिंबीर निवडून
पाऊण कप ताजी पुदिन्याची पाने
दीड इंच आल्याचा तुकडा
१२ हिरव्या मिरच्या
१२-१५ लसणीच्या पाकळ्या
२ मोठे कांदे = २०० ग्रॅम्स लांब चिरून
पाव कप = ३० ग्रॅम्स ओला नारळ खवून किंवा खोबऱ्याचे काप
अर्धा कप = १२५ ग्रॅम्स दही
पावणेदोन कप ( १ ३/४ ) = ३५० ग्रॅम्स लांब दाण्याचा बासमती तांदूळ
२ तमालपत्र
पाव टीस्पून हिरव्या वेलच्या
१ चक्रीफूल
१ टीस्पून शाही जिरे
पाव टीस्पून लवंग
अर्धा इंच दालचिनीचा तुकडा
मीठ चवीनुसार
१/२ टीस्पून गरम मसाला पावडर
१/४ टीस्पून जावित्री पावडर
एका लिंबाचा रस
१ टीस्पून केवडा जल
तेल
Instructions
कृती :
सर्वप्रथम आपण कांद्याचा बिरिस्ता बनवून घेऊ , म्हणजेच कांदा खरपूस कुरकुरीत करड्या रंगावर तळून घेऊ. त्यासाठी कांदा बुडेल इतपत कढईत तेल घालून मध्यम आचेवर कांदा तळून घेऊ. १५ मिनिटांत मंद ते मध्यम आचेवरकांदा खरपूस भाजला की गॅस बंद करून एका किचन टिश्यू पेपरवर काढावा .
आता बिर्याणीसाठी हिरवं वाटण बनवून घेऊ . कोथिंबीर, अर्धा कप पुदिना ( बाकीचा पुदिना बिर्याणीच्या थरांसाठी बाजूला काढून ठेवावा ) , हिरव्या मिरच्या , लसूण, आले, खोबऱ्याचे तुकडे, लिंबाचा रस आणि अर्धा कप किंवा लागेल तसे पाणी घालून एकत्र बारीक वाटून घ्यावे .
चिकनच्या मॅरिनेशनसाठी एका बाऊलमध्ये दही घेऊन चांगले फेटून घ्यावे . गुठळ्या राहू देऊ नयेत . त्यात गरम मसाला पावडर, हिरवे वाटण , चवीपुरते मीठ , अर्धा तळलेला कांदा हाताने चुरून घालावा . ३ टेबलस्पून तेल घालावे . शक्यतो कांदा ज्या तेलात तळला होता तेच तेल वापरावे . एकत्र नीट मिसळून घ्यावे .
या मॅरिनेडमध्ये चिकनचे तुकडे घालून नीट मिसळून घ्यावेत . किमान २ तासांसाठी चिकन या मॅरिनेडमध्ये मुरू द्यावे . फ्रिजमध्ये ठेवण्यास विसरू नये .
चिकन मॅरीनेट होऊन १ तास झाला की बिर्याणीचा भात शिजवण्याची तयारी करू. त्यासाठी तांदूळ स्वच्छ धुऊन पाण्यात ३० मिनिटांसाठी भिजवून ठेवावा. ३० मिनिटांनंतर एका कढईत २ लिटर पाणी उकळत ठेवावे . पाण्यात खडे गरम मसाले - लवंग, शाही जिरे , हिरव्या वेलच्या , चक्रीफूल, दालचिनी आणि तमालपत्रे , व १ टीस्पून तेल आणि मीठ घालावे . मीठ विसरल्यास बिर्याणीमध्ये भात फिका लागतो.
पाण्याला उकळी आली की तांदळातील पाणी काढून टाकून भिजवलेला तांदूळ घालावा. मध्यम ते मोठ्या आचेवर भात ९० टक्के शिजेपर्यंत शिजवून घ्यावा . भाताचा एक कण कच्चा राहिला पाहिजे . भात चाळणीत काढून एका ताटात किंवा परातीत पसरून थंड होण्यास ठेवावा .
चिकन २ तास मॅरीनेट झाले की फ्रिजमधून बाहेर काढावे . एका कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करून त्यात चिकन मॅरिनेशनच्या मिश्रणासकट कढईत घालावे. झाकण घालून मध्यम आचेवर शिजू द्यावे. पाणी घालू नये . चिकनच्या अंगच्या पाण्यात आणि दह्याच्या मॅरिनेशन मध्ये चिकन शिजते . गरज लागली तरच पाणी घालावे. २० मिनिटे शिजल्यानंतर झाकण काढावे आणि मीठ गरज असल्यास चवीप्रमाणे अजून घालावे. परत झाकून मंद आचेवर शिजू द्यावे. साधारण ३५ मिनिटांत चिकन पूर्णपणे शिजते . गॅस बंद करावा .
आता बिर्याणी दम वर शिजवण्यासाठी तिचे थर लावून घेऊ. भातामधून खडे गरम मसाले वेगळे काढून घेऊ जेणेकरून ते बिर्याणी खाताना दाताखाली येणार नाहीत! एका मोठ्या पातेल्यात किंवा हंडीत किंवा कूकरच्या भांड्यात ( शिटी काढून ) तळाला व भांड्याच्या बाजूंना तेलाचा हात लावून घेऊ. सगळ्यात पहिला थर हा चिकन रस्स्याचा असणार आहे . त्यावर थोडी जावित्रीची पावडर भुरभुरावी. तळलेला कांदा घालावा . दुसरा थर भाताचा लावून घ्यावा . त्यावर जावित्री पावडर, पुदिन्याची पाने , उरलेला कांदा आणि केवडा जल घालावे. पातेल्याला अल्युमिनिम फॉईल ने झाकून वर घट्ट झाकण घालावे.
बिर्याणीचे पातेले मोठ्या आचेवर २ मिनिटे ठेवावे . वाफ बाहेर पडू नये यासाठी वरवंटा किंवा तत्सम जड वस्तू पातेल्यावर ठेवावी. एक लोखंडी तवा दुसऱ्या आचेवर चांगला तापवून घ्यावा. २ मिनिटांनंतर पातेले तव्यावर ठेवावे आणि आच मंद करावी. बिर्याणीला मंद आचेवर १० मिनिटे दम द्यावा.
बिर्याणी १० मिनिटांनंतर गॅसवरून खाली उतरवावी . ५ मिनिटांनंतर गरम गरम वाफाळती बिर्याणी आवडीच्या रायत्यासोबत किंवा सालन सोबत वाढावी!
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/chicken-dum-biryani-recipe/