शीर खुर्मा- Sheer Khurma recipe in Marathi- Kali Mirch by Smita
Author: Smita Mayekar Singh
Recipe type: Dessert
Cuisine: Indian
Ingredients
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिटे
कितीजणांसाठी बनेल : ५-६
साहित्य:
१ लिटर घट्ट सायीचे दूध ( म्हशीचे दूध )
१/४ कप = ६० ग्रॅम्स साखर
३० ग्रॅम्स बारीक शेवया
तूप
१० बदाम , रात्रभर पाण्यात भिजवून
६ खारका , रात्रभर पाण्यात भिजवून
१०-१२ काजू , रात्रभर पाण्यात भिजवून
१ टेबलस्पून पिस्ते ( न खारवलेले ) , रात्रभर पाण्यात भिजवून
१ टेबलस्पून चारोळ्या
१ टेबलस्पून मनुका
२ टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचे पातळ काप
१ टीस्पून वेलदोड्याची जाडसर कुटून पावडर
१ टेबलस्पून केवडा जल
थोडे केशराचे धागे
Instructions
कृती:
एका जाड बुडाच्या कढईत किंवा पातेल्यात दूध तापवण्यास ठेवावे. दुधाला उकळी फुटली की ते ढवळून आच मंद करावी . मधे मधे सतत ढवळत राहावे जेणेकरून दूध उतू जाणार नाही .
आपण दुसऱ्या गॅसवर सुका मेवा तुपावर खमंग परतून घेऊ. १ टेबलस्पून तूप गरम करून त्यात बदामाचे, काजूचे, पिस्त्याचे आणि खारकांचे काप परतून घेऊ. बदाम आणि पिस्त्यांच्या साली काढून मगच त्यांचे काप करायचे आहेत . त्यातच चारोळी आणि सुक्या खोबऱ्याचे काप घालून मंद आचेवर परतून घेऊ. गरज वाटल्यास अजून १-२ टीस्पून तूप घालावे. ३ मिनिटे मंद आचेवर परतल्यानंतर एका वाटीत काढून घ्यावे. त्याच पॅनमध्ये जून १ टेस्पून तूप घालून शेवटी मनुका परतून घ्याव्यात . मनुका छान फुलेपर्यंतच परताव्यात आणि वाटीत काढून घ्याव्यात.
सुका मेवा परतल्यानंतर १ टेबलस्पून तूप घालून मंद आचेवर शेवया परतून घ्य्वयात . शेवया परतताना अजिबात घाई करू नये नाहीतर त्या करपतात आणि फेकून देण्याशिवाय पर्याय उरत नाही ! मंद आचेवर एकसारखा खरपूस तांबूस रंग येईपर्यंत शेवया परतून घ्याव्यात .
शेवया आणि सुका मेवा तयार आहे . आता दुधाकडे जरा लक्ष देऊ. दूध बारीक आचेवर जवळजवळ १२ मिनिटे तापल्यानंतर घट्ट व्हायला लागते . जवळ जवळ पाऊण पटीपर्यंत कमी होऊन दूध घट्ट झाले पाहिजे . आता साखर घालून २ मिनिटे मंद आचेवर साखर विरघळू द्यावी.
आता सुका मेवा , मनुका आणि शेवया घालून नीट दुधात एकत्र करून घ्यावे. आच मंदच ठेवावी. शीर खुर्मा आपण अजून ५ मिनिटे आचेवर शिजवून घेतला आहे. हा फार घट्ट किंवा फार पातळ नसावा. आता वेलची पावडर आणि केशराचे धागे घालून १ मिनिट मंद आचेवर शिजू द्यावा.
नंतर केवडा जल घालून , एकत्र ढवळून , गॅस बंद करावा . शीर खुर्मा वाढेपर्यंत झाकून ठेवावा .
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/sheer-khurma-recipe-in-marathi/