मसाला पाव- Masala Pav recipe in Marathi- Kali Mirch by Smita
Author: 
Recipe type: Snack
Cuisine: Indian
 
Ingredients
तयारीसाठी वेळ: १५ मिनिटे
शिजवण्यासाठी वेळ: ४० मिनिटे
कितीजणांना पुरेल: ४-५
साहित्य:
  • ६ नरम पाव
  • २ मोठे कांदे = १८० ग्रॅम्स बारीक चिरून
  • ४ मध्यम आकाराचे टोमॅटो =२७५ ग्रॅम्स बारीक चिरून
  • १ मोठी भोपळी मिरची = ७५ ग्राम बारीक चिरून
  • १ मध्यम आकाराचा बटाटा = ९० ग्राम , उकडून , साली काढून
  • १/५ इंच आल्याचा तुकडा
  • ८-१० लसणीच्या पाकळ्या
  • ३-४ हिरव्या मिरच्या
  • पाव कप कोथिंबीर बारीक चिरून
  • पाव टीस्पून हळद
  • १ टेबलस्पून काश्मिरी लाल मिरची पूड
  • १ १/२ टेबलस्पून पावभाजी मसाला
  • मीठ
  • २ बटरचे क्यूब्स
  • १ चीजचा क्यूब
  • तेल
Instructions
कृती:
  1. मसाला पाव बनवण्यासाठी मी पावभाजीचा लोखंडी तवा वापरला आहे . तुम्ही नॉनस्टिक तवा वापरला तरी चालेल . तव्यावर २ टेबलस्पून तेल चांगले तापवून घ्यावे . तेल तापले की त्यात १ टेबलस्पून बटर घालून घ्यावे . बटर वितळले की त्यात चिरलेला कांदा घालून मध्यम आचेवर चांगला पारदर्शक होईपर्यंत ४ते ५ मिनिटे परतून घ्यावा .
  2. कांदा परतला की त्यात आले -लसूण -हिरव्या मिरच्यांची पेस्ट घालून घ्यावी ( पेस्ट बनवताना १ टेबलस्पून पाणी घालून बारीक वाटून घ्यावे ) . २ -३ मिनिटे चांगले परतल्यावर त्याचा कच्चेपणा निघून जातो !
  3. आता हळद , बारीक चिरलेली भोपळी मिरची व १-२ टेबलस्पून पाणी घालून नरम होईपर्यंत शिजवून घ्यावी. ३ मिनिटे मध्यम आचेवर शिजवल्यावर भोपळी मिरची जरा नरम होते . आता त्यात चिरलेला टोमॅटो व थोडे मीठ घालून पूर्ण नरम होईपर्यंत शिजवून घ्यावे .
  4. जवळजवळ १० मिनिटे शिजवल्यावर, टोमॅटो नरम झाले की आता लाल मिरची पूड, पाव भाजी मसाला , थोडी चिरलेली कोथिंबीर , १ टेबलस्पून बटर आणि चवीपुरते मीठ घालून हा पूर्ण मसाला छान परतून घ्यावा . मसाले करपू नयेत म्हणून १-२ टेबलस्पून पाणी घालून परतावा . छान तेल सुटू द्यावे .
  5. मसाला चांगला ८-१० मिनिटे परतल्यानंतर उकडलेला बटाटा चांगला कुस्करून त्याचा लगदा घालून घ्यावा . बटाट्याच्या फोडी नाही राहिल्या पाहिजेत . बटाट्याचा लगदा घातल्याने हा मसाला मस्त क्रिमी होतो आणि पावावर छान गुळगुळीत पसरतो .
  6. आता चीझ किसून घालावे जेणेकरून मसाल्यात अजून क्रीमीपणा येतो! पाव कप पाणी घालून मिसळून घ्यावे . हा मसाला फार पातळ किंवा घट्ट नसावा , पावावर पसरण्याइतका असावा! मसाला तयार झाल्यावर तो तव्याच्या कडेला सरकवून त्यावर कोथिंबीर भुरभुरावी!
  7. तव्याच्या मध्यभागी थोडे बटर घालून त्यात कडेचा मसाला थोडा घालून घ्यावा . या मसाल्यावर आत बाहेर दोन्ही बाजूंना बटर लावून पाव शेकून घ्यावे .
  8. पावाच्या मध्ये मसाला घालून आणि वरूनही मसाला लावून पावाला पूर्णपणे मसाल्याने कोट करून घ्यावे .
  9. गरम गरम मसाला पाव, वरून चिरलेला कांदा , थोडे चीझ घालून आणि लिंबाच्या फोडी बरोबर खायला द्यावा !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/masala-pav-recipe-in-marathi/