दही वडे- Dahi Vada recipe in Marathi- Kali Mirch By Smita
Author: 
Recipe type: Snacks
Cuisine: Indian
 
Ingredients
किती बनतील : ८ ते १०
तयारीसाठी वेळ : ४ ते ६ तास डाळ भिजवण्यासाठी
बनवण्यासाठी वेळ : १५ मिनिटे
साहित्य:
  • १/२ कप = १०० ग्रॅम्स उडीद डाळ , स्वच्छ धुऊन रात्रभर पाण्यात भिजवून किंवा कमीत कमी ४ तासांसाठी भिजवून
  • १/४ कप = ५० ग्रॅम्स मूगाची डाळ , स्वच्छ धुऊन रात्रभर पाण्यात भिजवून किंवा कमीत कमी ४ तासांसाठी भिजवून
  • १ इंच आल्याचा तुकडा
  • ३ हिरव्या मिरच्या
  • २ टेबलस्पून कोथिंबीर
  • २ कप= ४०० ग्रॅम्स दही
  • १/४ कप दूध
  • २-३ टेबलस्पून साखर
  • १ टीस्पून भाजून जिरे पावडर
  • १/२ टीस्पून लाल मिरची पूड
  • १/२ टीस्पून चाट मसाला
  • १/४ टीस्पून काळे मीठ
  • २ कप ताक
  • १/४ टीस्पून हिंग
  • मीठ चवीनुसार
  • हिरवी तिखट चटणी
  • चिंचेची गोड चटणी
  • तेल तळण्यासाठी
Instructions
कृती:
  1. वडे तळल्यानंतर आपण ते ताकात भिजवून ठेवणार आहोत, म्हणून आपण पहिल्यांदा ताकात हिंग आणि चवीपुरते मीठ घालून ढवळून घेऊ. ( नोट : हे ताक अर्धा कप दह्यात २ कप पाणी घालून मी घुसळून तयार केले आहे ) . ताक बाजूला झाकून ठेवून देऊ आणि दही सेट करून घेऊ.
  2. एका भांड्यात दही घेऊन त्यात दीड टेबलस्पून साखर , काळे मीठ , चवीपुरते मीठ घालून नीट फेटून घेऊ . गुठळी राहू देऊ नये. आता यात १/४ कप दूध ( रूम टेम्पेरचर वर दूध असावे ) घालून जरा पातळ करावे कारण हे दही वड्यांवर नीट पसरले गेले पाहिजे . दही फ्रिजमध्ये थंड होण्यास ठेवावे.
  3. आता डाळींचे पाणी काढून त्यांना एकत्र मिक्सरमधून वाटून घेऊ . पाव कप पाणी वापरून डाळीची घट्ट आणि एकदम बारीक पेस्ट करून घेऊ . फार जास्त पाणी घालून पातळ करू नये. मिक्सरच्या दुसऱ्या भांड्यात आले, मिरची आणि कोथिंबीरीचे पाणी न घालता जाडसर वाटण करून घेऊ.
  4. आता महत्त्वाची स्टेप: डाळीचे मिश्रण हाताच्या तळव्याचा वापर करून चांगले एकाच दिशेने गोलाकार फेटून घ्यावे. १० मिनिटे तरी फेटून घ्यावे. असे केल्याने वडे फार हलके होतात . मिश्रण जितके चांगले फेट्ले जाईल तितके वडे कापसासारखे मऊ आणि हलके नाहीतर खूप जड होतात ! मिश्रण फेटल्यावर तयार आहे कि नाही हे पाहण्यासाठी एका पाणी भरलेल्या भांड्यात मिश्रणाचे थेंब घालावेत , जर ते पटकन पाण्याच्या पृष्टभागावर तरंगायला लागले तर समजावे की मिश्रण छान हलके झाले आहे .
  5. वाटलेला मसाला मिश्रणात मिसळून १० मिनिटे बाजूला झाकून ठेवावे.
  6. वडे तळण्यासाठी वडे बुडतील इतके तेल कढईत घालून मध्यम आचेवर गरम होऊ द्यावे. . तेल गरम झाले की आच मंद करून हाताला पाणी लावून गोल गोल छोटे वडे तेलात अलगद सोडावेत. मंद आचेवर दोन्ही बाजूंनी खरपूस सोनेरी रंगावर वडे तळावेत . मंद आचेवर तळल्यामुळे वडे बाहेरून छान खरपूस भाजले जाऊन कुरकुरीत होतात!
  7. मला वड्यांची एक बॅच तळायला ७-८ मिनिटे लागली. एका भांड्यात हलके गरम पाणी घेऊन त्यात हे तळलेले वडे ३-४ मिनिटांसाठी बुडवून ठेवावेत जेणेकरून ते पाणी शोषून आतपर्यंत मऊ होतील!
  8. ३-४ मिनिटांनंतर वडे दोन्ही हातांच्या तळव्यांत अलगद दाबून त्यातले पाणी काढून टाकावे . वडे तुटणार नाहीत याची दक्षता घ्यावी. मग हे वडे वाढेपर्यंत ताकात भिजवून ठेवावेत. अशा प्रकारे सारे वडे तळून क्रमाने पाण्यात आणि नंतर ताकात भिजवून ठेवावेत.
  9. दही वडे सर्व करताना , प्रथम टाकत बुडवलेला वडा सर्विंग डिश मध्ये घेऊन त्यावर थंड दही घालावे , मग आवडीप्रमाणे लालमिर्ची पूड, जिरे पावडर आणि चाट मसाला भुरभुरावा . आवडीप्रमाणे हिरवी तिखट चटणी आणि चिंचेची गोड चटणी घालून थंड खावयास द्यावे!
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/dahi-vada-recipe-in-marathi/