पुरणपोळी | Puran Poli recipe in Marathi
Author: 
Recipe type: Dessert
Cuisine: Indian
 
Ingredients
तयारीसाठी वेळ: २ तास
शिजवण्यासाठी वेळ : १ तास
किती बनतील: १२-१५
साहित्य:
 • १ कप चणाडाळ= २५० ग्रॅम्स , स्वच्छ धुऊन , कमीत कमी २ तास पाण्यात भिजवून ठेवावी
 • १ कप किसलेला गूळ= २५० ग्रॅम्स
 • पाऊण कप मैदा =१५० ग्रॅम्स
 • १/२ कप गव्हाचे पिठ = १०० ग्रॅम्स
 • १/२ टीस्पून हळद
 • १/४ टीस्पून मीठ
 • ३-४ हिरव्या वेलच्या
 • १ छोटा जायफळाचा तुकडा
 • १/२ टीस्पून सुंठ पावडर
 • १/२ टीस्पून बडीशेप
 • थोडे केशराचे धागे
 • तेल
 • तूप
 • तांदुळाचे पीठ
Instructions
कृती:
 1. सर्वप्रथम चण्याची डाळ शिजवण्यासाठी एका पातेल्यात ५ कप पाणी उकळत ठेवावे . चणा डाळ १ कप घेतल्याने तिच्या ५ पट पाणी घ्यावे. पाण्याला उकळी आली की त्यात भिजवलेली डाळ घालून मंद ते माध्यम आचेवर झाकण घालून शिजू द्यावी.
 2. पोळ्यांसाठी पीठ भिजवून घेऊ. मैदा, गव्हाचे पीठ, मीठ आणि हळद घालून एकत्र मिसळून घ्यावी. हळदीने पोळ्यांना फार सुंदर रंग येतो . १ टेबलस्पून तेल घालून पिठात चांगले रगडून घ्यावे जेणेकरून पोळ्या खुसखुशीत होतात .
 3. थोडे थोडे पाणी घालून पोळ्यांची कणिक चांगली तिंबून घ्यावी. फार जास्त मऊ किंवा घट्ट असे पीठ मळू नये. पीठ मळताना मी ३/४ कप पाणी वापरले आहे . पीठ जरासं मुलायम झाले कि त्याला २ टीस्पून तेलाचा हात लावून चांगले रगडून घ्यावे. ह्या पिठाचा गोळा १ तास झाकून मुरू द्यावा.
 4. चण्याची डाळ मंद आचेवर अर्ध्या तासात शिजते . डाळीचा दाणा हाताने दाबून बघावा, लगेच पिठुळ झाला तर समजावे कि डाळ शिजली ! डाळ चाळणीत काढून तिचे उरलेले पाणी म्हणजेच "कट " वेगळा बाजूला काढावा . या कटाचीच प्रसिद्ध आमटी बनते जिला येळवण्याची आमटी असेही म्हटले जाते.
 5. पुरण शिजवण्यासाठी एका कढईत १ टेबलस्पून तूप घालून त्यात शिजलेली चण्याची डाळ ( गरम असतानाच ) घालावी आणि बरोबरच किसलेला गूळही घालावा. मंद ते माध्यम आचेवर गूळ पूर्ण विरघळू द्यावा.
 6. पुरण शिजेपर्यंत वेलच्या , बडीशेप आणि जायफळ खलबत्त्यात कुटून किंवा मिक्सरमधून फिरवून बारीक पावडर करून घ्यावी.
 7. १५ मिनिटांत पुरण शिजत आले की त्यातील गुळाचा रस आटत येऊन डाळीत एकजीव होतो. पुरण शिजले कि नाही हे पाहण्यासाठी त्याच्या मधोमध कढईत एक चमचा उभा करून ठेवावा , जर तो चमचा नीट उभा राहिला तर समजावे कि पुरण शिजले! या उप्पर पुरण शिजवू नये नाहीतर पुरण कोरडे पडून ते पिठात भरता येणार नाही ! त्यात तयार केलेली पावडर , केशर आणि सुंठ पावडर घालून नीट एकजीव करून घ्यावे. गॅसवरून उतरवून पुरण थंड होऊ द्यावे.
 8. पुरण थंड झाले कि ते पुरणयंत्रातून किंवा मिक्सरमधून फिरवून बारीक वाटून घ्यावे.
 9. पोळ्या बनवण्यासाठी पीठ आपण १ तास मुरू दिले , त्या पीठाला परत एकदा तेलाचा हात लावून चांगले मळून घ्यावे. जितके पीठ मुलायम तितक्या पुरणपोळ्या लाटायला सोप्या पडतात. पीठाचे एकदीड इंच व्यासाचे गोळे बनवून घ्यावेत. मोदकासारखी पारी करून त्यात पिठाच्या गोळ्याच्या आकारापेक्षा थोडा जास्त पुरणाचा गोळा घेऊन दाबून भरत जावा. नीट बंद करून हाताने चपटा करून पोळी लाटण्यास सुरुवात करावी.
 10. तांदळाच्या पिठीवर पोळी लाटावी , मला लहान आकाराच्या पोळ्या आवडतात , तुम्हाला आवडत असतील तर पीठाचे मोठे गोळे बनवून ८ ते १० इंच व्यासाची मोठी पोळी लाटू शकता.
 11. तव मध्यम आचेवर गरम करून पोळी दोन्ही बाजूंनी भरपूर तूप घालून खरपूस गुलाबी करड्या रंगावर भाजून घ्यावी. या पोळ्या खुसखुशीत तर बनतातच परंतु ५-६ दिवस बाहेर ठेवून सुद्धा खराब होत नाहीत.
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/puran-poli-recipe-in-marathi/