राजेशाही आम्रखंड | Amrakhand recipe in Marathi
Author: 
Recipe type: Dessert
Cuisine: Indian
 
Ingredients
तयारीसाठी वेळ : १० मिनिटे
कितीजणांना पुरेल : ४-५
साहित्य :
 • २०० ग्रॅम्स आंब्याचा गर ( हापूस किंवा कोणताही गोड आंबा घेतला तरी चालेल )
 • २५० ग्रॅम्स चक्का ( टांगून ठेवलेले दही ) - हे बाजारात विकतही मिळते
 • ७५ ग्रॅम्स साखर
 • १ टेबलस्पून चारोळी - ३० सेकण्ड तव्यावर भाजून
 • आवडीप्रमाणे काजू, बदाम, आणि पिस्ता जाडसर कुटून किंवा त्यांचे पातळ काप करून
 • १/२ टीस्पून वेलची पावडर
 • १/४ टीस्पून जायफळ पावडर
 • थोडे केशराचे धागे ( १ टेबलस्पून हलक्या गरम दुधात भिजवून )
Instructions
कृती :
 1. सर्वप्रथम चक्का म्हणजे श्रीखंडासाठी लागणारे घट्ट दही बनवण्यासाठी :
 2. आपल्याला २५० ग्रॅम्स चक्क्याची गरज आहे म्हणून आपण ८०० ग्रॅम्स दही एका मलमलच्या किंवा सुती पातळ कापडात बांधून २ तासांसाठी किचन ओट्यावर किंवा नळावर बांधून ठेवू. खाली दह्याचे पाणी म्हणजेच व्हे गोळा करण्यासाठी एक भांडे ठेवू. दोन तासांनी दह्याचे गाठोडे फ्रिजमध्ये याच प्रकारे ६ ते ७ तासांसाठी किंवा रात्रभर बांधून ठेवायचे आहे म्हणजे उरलेसुरलेले पाणीसुद्धा निघून जाईल . आपल्याला छान असा घट्ट मऊ चक्का मिळतो. चुकूनही २ तासांपेक्षा जास्त वेळ दही बाहेर टांगून ठेवू नये , आंबट होते .
 3. दह्याचे पाणी हे पौष्टिक असते ते फेकून न देता त्यात तांदळाचे पीठ, आले-लसूण-मिरच्या-जिरे यांची पेस्ट घालून घावन किंवा धिरडे बनवावेत . चविष्ट होतात .
 4. एका मोठ्या बाउल मध्ये चक्का , साखर घालून फेटून घ्यावे . दह्याच्या गुठळ्या राहू न देता साखर पुर्णतः विरघळेपर्यंत चांगले फेटून घ्यावे. इलेक्ट्रिक बीटर चा वापर केला तरी चालतो.
 5. आंब्याचा गर घालून नीट मिसळून घ्यावा. अगदी एकत्र चांगले फेटून घ्यावे. हे आपले आम्रखंड तयार आहे .
 6. आता आम्रखंडाला राजेशाही बनवण्यासाठी आटवलेली रबडी किंवा किसलेला खवा, मलाई बर्फी किंवा आंबा कलाकंद किसून घालावा ( ५० ग्रॅम्स )
 7. आता केशराचे दूध, वेलची पावडर , जायफळ पावडर घालून नीट मिसळून घ्यावे.
 8. काजू,बदाम, पिस्त्याचे काप आणि चारोळी घालून ढवळून घ्यावे. चारोळ्यांशिवाय श्रीखंडाला मजाच नाही बुवा !
 9. वाढण्याआधी किमान २ तास तरी फ्रिजमध्ये आम्रखंड थंड होऊ द्यावे.
 10. तळटीप : साखरेची मात्रा आपल्या आवडीनुसार आणि आंब्याच्या गोडव्यावर ठरवावी !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/amrakhand-recipe-in-marathi/