काळी पावभाजी- Black Pav Bhaji recipe in Marathi
Author: 
Recipe type: Breakfast
Cuisine: Indian
 
Ingredients
तयारीसाठी वेळ: १५ मिनिटे
शिजवण्यासाठी वेळ: ३० मिनिटे
कितीजणांना पुरेल: ४-५
साहित्य:
लागणाऱ्या भाज्या:
 • ३ मध्यम आकाराचे बटाटे = १५० ग्रॅम्स , स्वच्छ धुऊन , साली काढून , मोठ्या चौकोनी फोडी करून
 • १/४ कप मटारचे दाणे . ताजे किंवा फ्रोझन = ५० ग्रॅम्स
 • १ लहान आकाराची भोपळी मिरची बारीक चिरून = ६० ग्रॅम्स
 • १/२ कप फुलकोबी/कॉलीफ्लॉवरचे तुकडे= १०० ग्रॅम्स
 • २ मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून = १२५ ग्रॅम्स
 • २ मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक चिरून = २०० ग्रॅम्स
 • १/२ कप कोथिंबीर बारीक चिरून
मसाल्याचे वाटण:
 • दीड इंच आले
 • १५ लसणीच्या पाकळ्या
 • ४ हिरव्या मिरच्या
काळया मसाल्याचे साहित्य:
 • १ टीस्पून जिरे
 • १ टीस्पून शहाजिरे
 • १/२ टीस्पून लवंग
 • दीड इंच दालचिनीचा तुकडा
 • २ मसाला वेलच्या
 • १ टीस्पून दगडफूल
 • १ टेबलस्पून आमचूर पावडर
 • १ जावित्रीचे फूल
 • १ चक्रीफूल
 • २-३ तमालपत्र
 • २ टीस्पून बडीशेप
 • २ टेबलस्पून धणे
 • १ टेबलस्पून काळी मिरी
 • १ टीस्पून खसखस
 • १ टीस्पून कारळे
 • १ टीस्पून पांढरे तीळ
 • ६० ग्रॅम्स सुके खोबरे
इतर साहित्य:
 • बटर गरजेनुसार
 • मीठ चवीप्रमाणे
 • तेल
Instructions
कृती:
 1. सर्वप्रथम आपण प्रेशर कूकरमध्ये मटार, बटाटे आणि फ्लॉवरचे तुकडे घालून शिजवून घेऊ. भाज्या बुडतील इतपतच पाणी घालावे. थोडे मीठ घालावे. मध्यम आचेवर ८ मिनिटे किंवा १ शिट्टी येईपर्यंत भाज्या शिजवून घेऊ. कुकर पूर्णपणे थंड झाल्यावरच उघडावा.
 2. एका मिक्सरमधून आले, लसूण, हिरव्या मिरच्या आणि थोडे पाणी घालून बारीक वाटून घेऊया.
 3. काळा मसाला बनवण्यासाठी एका तव्यात काळ्या मसाल्याचे जिन्नस एकत्र मंद आचेवर भाजून घेऊ. फक्त खसखस आणि आमचूर पावडर नंतर घालावी कारण खसखस लगेच करपते. मंद ते मध्यम आचेवर सारे गरम मसाले नीट खरपूस भाजून घ्यावेत. करपू देऊ नयेत. ३ मिनिटांत मसाले करड्या रंगावर भाजून होतात. आता खसखस आणि आमचूर पावडर घालून ४० सेकन्द भाजून घ्यावी. हा मसाला गॅसवरून उतरवून पूर्णपणे थंड होऊ द्यावा.
 4. गॅसवर जाळावर खोबरे चिमट्याने फिरवून आतून बाहेरून नीट भाजून घ्यावे. फक्त करपू देऊ नये नाहीतर मसाल्याला कडवटपणा येईल. खोबरे थंड झाले कि त्याचे तुकडे आणि भाजलेले गरम मसाले एकत्र करून मिक्सरमधून त्यांची बारीक पावडर करून घेऊ. हा काळा मसाला आपल्याला जितके तिखट आवडत असेल त्याप्रमाणे भाजीत वापरावा आणि उरलेला मसाला एका हवाबंद बरणीत ठेवून तुम्ही पुढच्या वेळी भाजी बनवताना वापरू शकता.
 5. कुकर थंड झाला की भाजीचे पाणी वेगळे करून भाज्या नीट मॅश करून घ्यायच्या आहेत . भाजीचे पाणी फेकून न देता ते भाजी बनवताना वापरले जाईल.
 6. भाजी बनवण्यासाठी एका कढईत २ टेबलस्पून तेल आणि २ टेबलस्पून बटर तापवून घेऊ. त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तो नरम होईपर्यंत परतायचा आहे. कांदा नरम झाला की त्यात तयार केलेले आले-लसूण-हिरव्या मिरच्यांच्या मसाल्याचे वाटण घालून त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यावे.
 7. आता चिरलेली भोपळी मिरची घालून २-३ मिनिटे परतून शिजू द्यावी . बारीक चिरलेला टोमॅटो, थोडी कोथिंबीर आणि थोडे मीठ घालून एकत्र ढवळून घ्यावे. आच मंद करून झाकण घालून टोमॅटो अगदी नरम होईपर्यत शिजवून घ्यावेत. मंद आचेवर ८ मिनिटांत टोमॅटो नरम झाले कि ते पोटॅटो मॅशरने मॅश करून घ्यावेत. यात आता ३ टेबलस्पून काळा मसाला घालून परतून घ्यावा. मसाले करपू देऊ नयेत , जर ते कोरडे व्हायला लागले तर त्यात थोडे पाणी घालून मसाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यावा. ६-७ मिनिटे मसाला परतल्यानंतर त्यात आपण मॅश केलेली भाजी ढवळून घ्यावी. जितकी पातळ भाजी हवी असेल तेवढे पाणी घालावे. मी दीड कप पाणी वापरले आहे. भाजी नीट ढवळून घेऊन मोठ्या आचेवर तिला एक उकळी फुटू द्यावी. चवीप्रमाणे मीठ घालावे.
 8. भाजीला उकळी आली की आच मंद करून झाकण घालून थोडा वेळ भाजी शिजू द्यावी.
 9. ५ मिनिटे भाजी शिजल्यावर तिच्यावर छान तवंग येऊ लागतो आणि ती घट्टही व्हायला लागते. भाजी गॅसवरून उतरवून झाकून ठेवावी.
 10. तव्यावर पाव शेकण्यासाठी बटर, थोडी कोथिंबीर आणि २-३ टेबलस्पून भाजी घालावी. तव्यावर पाव चांगले क्रिस्पी होईपर्यंत शेकून घ्यावेत.
 11. थोडे बटर वरून घालून , भाजीवर थोडी कोथिंबीर आणि चिरलेला कांदा घालून गरमागरम वाढावी!
 12. महाराष्ट्रयीन गावरान तडक्याची मुंबईची स्पेशल स्वादिष्ट काळी पावभाजी नक्की करून पहा !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/black-pav-bhaji-recipe-in-marathi/