Fish Khengat recipe in Marathi-माशांचे खेंगाट-Bombil Khengat
Author: Smita Mayekar Singh
Ingredients
तयारीसाठी वेळ : ३० मिनिटे
शिजवण्यासाठी वेळ :
कितीजणांना पुरेल : ४ -५
साहित्य:
आपल्या आवडीप्रमाणे लहान मासे घ्यावेत . मी खालील मासे घेतले आहेत .
ओले छोट्या आकाराचे बोंबील - १०० ग्रॅम्स ( धुऊन , लहान तुकडे करून )
मोदक किंवा बिलज्या मासे - १०० ग्रॅम्स
लहान मांदेली - १०० ग्रॅम्स
चिंगळ्या मासे - १०० ग्रॅम्स
लहान कोळंबी - १०० ग्रॅम्स ( करंदी मिळाली तर उत्तमच )
१०-१२ कढीपत्ता
५-६ लसूण पाकळ्या सालीसकट
१/४ टीस्पून हळद
२-३ टेबलस्पून मालवणी मसाला ( आपल्या तिखट चविनुसार कमी - जास्त घालावा )
५-६ कोकम
मीठ
तेल
मसाला वाटण्यासाठी :
१ १/२ इंच आल्याचा तुकडा
१५-१८ लसणीच्या पाकळ्या
१ कप कोथिंबीर
Instructions
कृती:
सर्वप्रथम आपण मसाला वाटून घेऊ. एका मिक्सरच्या भांड्यात आले,लसूण आणि कोथिंबीर घालून पाणी घालून बारीक वाटून घ्यावे. वाटण्यासाठी मी अर्धा कप पाणी वापरले आहे आणि मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप पाणी घालून मसाल्याचे वाटण एका वाडग्यात काढून घेतले आहे .
एका कढईत ३ टेबलस्पून तेल तापवून घ्यायचे आहे. कढीपत्ता घालून ज्या लसणीच्या पाकळ्या सालीसकट आहेत त्या चेचून फोडणीत घालाव्यात . लसूण गुलाबी रंगावर परतून घ्यावी.
आता मसाल्याचे वाटण आणि हळद घालून परतून घ्यावे. मसाल्याला चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. मालवणी मसाला आणि मीठ घालून मिसळून घ्यावे. हा मसाला एकत्र चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यावा. कोरडा होत असल्यास थोडे थोडे पाणी घालून झाकण घालून परतावा.
५ मिनिटे आपण मसाला झाकण घालून परतला आहे , छान तेल सुटू लागले आहे. आता त्यात जेवढे घट्ट किंवा पातळ कालवण हवे असेल तेवढे पाणी घालू कारण यात मासेही शिजणार आहेत. म्हणून मी २ कप पाणी घातले आहे. चवीपुरते मीठही घालून घेऊ. मोठ्या आचेवर एक उकळी येऊ देऊ.
उकळी आल्यावर आच मंद करू आणि मासे घालून घेऊ. झाकण घालून शिजू देऊ.
६ मिनिटे मासे शिजवले आहेत , कालवण ही थोडे घट्ट झाले आहे. या उप्पर मासे जास्त शिजवले तर ते तुटून त्यांचा गोळा होतो. आता कोकम घालून बस २ मिनिटे कालवण शिजवायचे आहे जेणेकरून कोकमाचा रस उतरेल. कोकम नसेल तर १-२ टेबलस्पून चिंचेचा कोळ घालावा.
२ मिनिटांनंतर गॅस बंद करावा आणि झाकण घालून कालवण थोडे मुरू देऊन मग वाढावे. हे तांदळाच्या/नाचणीच्या/ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा मऊ भातासोबत खूपच छान लागते .
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/fish-khengat-recipe-in-marathi/