Mulyacha Paratha recipe in Marathi| मुळ्याचा पराठा
Author: Smita Mayekar Singh
Ingredients
तयारीसाठी वेळ: ३० मिनिटे
शिजवण्यासाठी वेळ : ३० मिनिटे
किती बनतील : ८
साहित्य:
३ कप = ४५० ग्रॅम्स गव्हाचे पीठ
मीठ
तेल
३ मोठ्या आकाराचे मुळे = ७०० ग्रॅम्स - धुऊन, साले काढून आणि किसून
१/४ कप बारीक चिरलेली कोथिंबीर
१/२ कप = १०० ग्रॅम्स पनीर
५-६ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
१ इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून
१ टीस्पून हळद
१/२ टीस्पून काश्मिरी लाल मिरची पूड
१ टीस्पून धणे पावडर
१/२ टीस्पून गरम मसाला पावडर
१/२ टीस्पून चाट मसाला ( आमचूर पावडर वापरली तरी चालेल )
Instructions
कृती:
सर्वप्रथम किसलेल्या मुळ्याला हाताने दाबून त्यातले पाणी चाळणीतून काढून एका भांड्यात काढून घ्यावे. नंतर मुळ्याला चाळणीत थोडा वेळ राहू द्यावे. मुळ्याचे पाणी फेकून न देता पराठ्याचे पीठ मळताना त्याचा वापर करावा.
परातीत गव्हाचे पीठ, मीठ आणि १ टेबलस्पून तेल घालून मिसळून घ्यावे. मुळ्याचे गाळलेले पाणी वापरून पराठ्याची सैलसर कणिक मळून घ्यावी.
जवळजवळ आपण दीड कप पाणी वापरून पीठ मळले आहे. कणकेला तेलाचा हात लावून झाकून १५ मिनिटे बाजूला ठेवून द्यावे.
पराठ्याचे सारण बनवण्यासाठी एका भांड्यात किसलेला मुळा , किसलेले पनीर, चिरलेल्या मिरच्या, किसलेले आले, बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, धणे पावडर, लाल मिरची पूड, गरम मसाला पावडर , चाट मसाला आणि चविनुसार मीठ घालून एकत्र मिसळून घ्यावे.
पनीर मुळे सारणाला एक घट्टपणा येऊन ते पराठ्यात नीट पसरले जाते.
सारण तयार झाले आहे आणि कणकेलाही झाकून १५ मिनिटे झाली आहेत.
ज्या आकाराचे आपल्याला पराठे बनवायचे आहेत त्या आकाराचे आपण कणकेचे गोळे बनवून घेऊ. कोरडे पीठ लावून दोन पातळ पोळ्या लाटून घेऊ. एका पोळीवर सारण पसरवून घ्यावे. पोळीच्या कडांपर्यंत सारण पसरवावे आणि एक थर लावून घ्यावा. पोळीच्या कडांना थोडे पाणी लावून त्यावर दुसरी पोळी ठेवून हाताने हलके दाबून दोन्ही पोळ्या एकमेकींना नीट चिकटवून घ्याव्यात .
लाटण्याने पराठा हलक्या हाताने लाटून घ्यावा जेणेकरून सारण पसरले जाईल. पराठा लाटून तयार झाला आहे , आता आपण तो भाजून घेऊ.
तवा चांगला तापला कि पराठा दोन्ही बाजूंनी चांगला तेल लावून भाजून घेऊ.
मुळ्याचा पराठा तयार आहे . घट्ट सायीचे दही आणि लोणच्याबरोबर गरम गरम नाश्त्यासाठी वाढावा !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/mulyacha-paratha-in-marathi/