सर्वप्रथम वांगी पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत. नंतर एका कोरड्या फडक्याने पुसून घ्यावीत. वांग्यांवर उभ्या चिरा मारुन घ्याव्यात आणि थोडा तेलाचा हात लावून गॅसवर जाळावर खरपूस भाजून घ्यावीत.
वांगी पूर्ण थंड होऊ द्यावीत आणि मगच सोलावीत. जोपयॅंत वांगी थंड होत आहेत तोपर्यंत कांदे, टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरावेत.
एका खलबत्यात लसूण , मिरच्या आणि आले कुटून त्याचा जाडसर ठेचा बनवावा. जर मिक्सर ला वाटायचे असेल तर अजिबात पाणी न घालता फिरवून घ्यावे.
वांगी थंड झाली की ती सोलून घ्यावीत आणि त्याचा गर चांगला घोटून घेणे. पोटॅटो माशर चा वापर करावा किंवा सुरीने कापून घ्यावे.
कढईत तेल गरम करावे. त्यात मोहरी घालावी, मोहरी तडतडल्यानंतरच जीरे आणि हिंग घालावे. बारीक चिरलेला कांदा घालून तो चांगला पारदर्शक होईपर्यंत परतून घ्यावा.
कांदा परतून झाला की हळद आणि लसूण, आले, मिरचीचा ठेचा घालावा. मंद आचेवर परतून घ्यावा जोवर आले लसणा चा कच्चे पणा निघून जात नाही.
जवळ जवळ 4 ते 5 मिनिटे परतल्यानंतर आता बारीक चिरलेला टोमॅटो घालावा. टोमॅटो लवकर शिजणयासाठी थोडे मीठ घालावे. मध्यम आचेवर टोमॅटो परतून घ्यावा. नंतर आच मंद करून झाकण ठेवून टोमॅटोला पाणी सुटू द्यावे जेणेकरून तो चांगला मऊ शिजेल.
टोमॅटो शिजुन त्याला तेल सुटू लागले की त्यात भाजून घेतलेल्या वांग्याचा लगदा घालावा.
चवीनुसार मीठ घालावे मंद आचेवर हे भरीत चांगले परतावे. भरीत परतताना ते भांड्याच्या तळाला चिकटणार नाही याची दक्षता घ्यावी . अगदी कडेने तेल सुटेपर्यंत भरीत जवळजवळ सात ते आठ मिनिटे परतावे .
तयार झाल्यावर त्यात उरलेली कोथिंबीर घालावी आणि कढई आचे वरुन खाली उतरवावी .
गरम गरम ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर हे भरीत खायला फार छान लागते .आवडत असल्यास बाजूला कच्चा कांदा आणि हिरवी मिरची द्यायला विसरू नका.
टीप :
हिवाळ्यात हुर्डा पार्टीला भरीत भाकरी चा खास बेत असतो.
जर तिखट खायला आवडत असेल तर हिरव्या मिरच्यांचे प्रमाण वाढवायला हरकत नाही.
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/vangyache-bharit-recipe-marathi/