Mutton Yakhni Pulao recipe in Marathi| मटण यखनी पुलाव
Author: 
 
Ingredients
तयारीसाठी वेळ : १५ मिनिटे
शिजवण्यासाठी वेळ : ६० मिनिटे
किती जणांना पुरेल : ४ ते ५
साहित्य:
मटणाच्या यखनी साठी :
  • 500 ग्रॅम्स मटण ( बकऱ्याचे ) , धुऊन आणि स्वच्छ करून
  • १ लहान कांदा - ५० ग्रॅम्स दोन तुकडे करून
  • १ १/२ इंच आल्याचा तुकडा
  • १ अख्खा लसणीची गाठ
  • १ चक्रीफूल
  • १/४ टीस्पून लवंग
  • १/२ टीस्पून बडीशेप
  • १/२ टीस्पून धणे
  • १ मसाला वेलची
  • १/४ टीस्पून हिरव्या वेलच्या
  • १/२ इंच दालचिनी
  • १ तमालपत्र
  • मीठ
  • १/४ टीस्पून काळी मिरे
पुलावासाठी :
  • १ १/२ कप =३०० ग्रॅम्स बासमती तांदूळ - तांदूळ धुऊन ३० मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावा
  • २ मोठे कांदे =१५० ग्रॅम्स लांब चिरून
  • १/२ कप =१०० ग्रॅम्स दही फेटून घ्यावे
  • २ हिरव्या मिरच्या मधोमध चिरा देऊन, २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  • १/२ कप =१२५ ग्रॅम्स तूप
  • १ टेबलस्पून आले लसूण पेस्ट
  • १ तमालपत्र
  • १/२ इंच दालचिनी
  • १ मसाला वेलची
  • १/४ टीस्पून हिरवी वेलची
  • १/४ टीस्पून काळी मिरे
  • १/४ टीस्पून लवंग
  • १/२ टीस्पून जिरे
  • १/२ टीस्पून शाही जिरे
  • १ टीस्पून केवडा जल
  • थोडे केशराचे धागे १ टेबलस्पून हलक्या गरम दुधात भिजवून
Instructions
कृती :
  1. सगळ्यात पहिल्यांदा आपण यखनी म्हणजेच मटणाचा स्टॉक बनवून घेऊ. एका प्रेशर कुकर मध्ये मटणाचे साफ केलेले तुकडे घालून घेऊ. त्यातच कांद्याचे तुकडे, आले, लसणीची गाठ , आणि मीठ घालून सुमारे ३ कप पाणी घालू. आता आपण खड्या गरम मसाल्याची एक पोटली बांधून घेऊ. एका मलमलच्या कापडाच्या चौकोनात मसाला वेलची, हिरव्या वेलच्या , धणे , काळी मिरी, लवंग, दालचिनी, बडीशेप, तमालपत्र आणि चक्रीफूल एकत्र बांधून पोटली बनवू.
  2. हि पोटलीसुद्धा कुकर मध्ये घालून कुकर बंद करू. मध्यम आचेवर १५ ते २० मिनिटे मटण शिजवून घेऊ.
  3. आपण मटण १८ मिनिटे शिजवून घेतले आहे , या दरम्यान कुकर ला ३ शिट्ट्या आल्या आहेत. कुकर गॅस वरून उतरवून पूर्णपणे थंड झाल्यावरच उघडावा.
  4. मटणाची यखनी गाळणीने गाळून घेऊ. मटणाचे तुकडे वेगळे काढून घेऊ आणि मसाल्याची पोटली वेगळी करून घेऊ. आपल्याला ३ कप यखनी मिळाली आहे. दीड कप तांदूळ शिजवण्यासाठी ३ कप यखनीची आवश्यकता आहे. जर काही कारणास्तव यखनी कमी बनली तर तितके पाणी घालून बरोबर यखनी ३ कप बनवून ठेवावी.
  5. आता आपण पुलाव बनवायला सुरुवात करू. एका कढईत तूप गरम करून घेऊ. त्यात लांब चिरलेला कांदा घालून तो चांगला करड्या रंगावर येईपर्यंत खरपूस भाजून घेऊ. कांदा चांगला १० मिनिटे भाजल्यावर खडे गरम मसाले घालून घेऊ- मसाला वेलची, हिरव्या वेलच्या , काळी मिरे, लवंग, शाही जिरे, जिरे, तमालपत्र, व दालचिनी. ३० सेकंदांपर्यंत हे मसाले भाजून घेऊ . आले लसणाची पेस्ट , आणि हिरव्या मिरच्या घालून २- ३मिनिटे परतून घेऊ. कांदा बिलकुल करपू देऊ नये. आता आच मंद करून फेटलेले दही घालावे व लगेच ढवळावे नाहीतर कढईच्या उष्णतेने दही फुटते.
  6. आता शिजलेले मटण आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ. मंद आचेवर शिजवून घेऊ. आपण मटण ७ मिनिटे शिजवून घेतले आहे.
  7. आता यखनी घालून घेऊ. नीट ढवळून घेऊ आणि यखनीला मोठया आचेवर एक उकळी फुटू देऊ. २ मिनिटे मोठ्या आचेवर शिजवल्यानंतर गॅस मंद करू आणि झाकण घालून १ मिनिट शिजू देऊ.
  8. एका मिनिटानंतर भिजवलेले तांदूळ घालून हलक्या हाताने मिसळून घेऊ. माध्यम आचेवर भात शिजू द्यावा. जवळ जवळ १० मिनिटांत भात शिजायला लागतो आणि पाणीही शोषले जाते.
  9. आता २ उभ्या चिरा मारलेल्या मिरच्या , केवडा जल, आणि केशराचे दूध घालून घेऊ. केशर घातल्याने छान रंग आणि सुवास येतो पुलावाला.
  10. आता आपण पुलावाला दम देणार आहोत. गॅस बंद करून कढईला ऍल्युमिनिअम फॉईल लावून बंद करावे आणि वर घट्ट झाकण लावावे. एक लोखंडी तवा मोठ्या आचेवर गरम करून घ्यावा, तवा चांगला तापला कि त्यावर पुलावाची कढई ठेवून मंद आचेवर दम द्यावा. आपण पुलावाला १० मिनिटे दम दिला आहे. गॅसवरून खाली उतरवून वाढेपर्यंत हा पुलाव झाकूनच ठेवावा . एखाद्या रायत्या बरोबर किंवा सालन बनवून पुलावाबरोबर वाढावे.
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/mutton-yakhni-pulao-in-marathi/