Kuilth Pithla recipe in Marathi| कुळीथ पिठलं
Author: 
 
Ingredients
तयारीसाठी वेळ : १५ मिनिटे
शिजवण्यासाठी वेळ : २० मिनिटे
किती जणांना पुरेल : 4 ते 5
साहित्य:
  • ½ कप =60 ग्रॅम्स कुळीथ पिठी /कुळथाचे पीठ
  • 2 मोठे कांदे - १८० ग्रॅम्स लांब व पातळ चिरून
  • ½ कप खवलेला ताजा नारळ
  • तेल
  • पाणी
  • 2 हिरव्या मिरच्या
  • 5-6 लसणीच्या पाकळ्या
  • 1 टीस्पून जिरे
  • 2 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
  • 1 टीस्पून मोहरी
  • १/४ टीस्पून हिंग
  • १/४ टीस्पून हळद
  • 1 टेबलस्पून मालवणी मसाला (मालवणी मसाला नसेल तर २ टीस्पून लाल मिरची पूड + १ टीस्पून गरम मसाला )
  • 2-3 कोकम
  • मीठ
Instructions
कृती:
  1. सर्वप्रथम एका खलबत्त्यात जिरे , लसूण आणि हिरव्या मिरच्या जाडसर कुटून त्यांची पेस्ट करून घ्यावी. मिक्सर वापरला तरी चालेल.
  2. आता एका वाडग्यात कुळथाची पिठी घेऊन त्यात पाणी घालून सरसरीत पातळ करून घ्यावे. पाऊण कप पाणी घालून मी ही पिठी पातळ करून घेतली आहे.
  3. एका कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करून त्यात मोहरी , हिंगाची फोडणी घालून वाटलेला मसाला घालून घ्यावा. लसूण खरपूस होऊ द्यावी.
  4. आता कांदा घालून तो मध्यम आचेवर चांगला करडा होऊ द्यावा. त्यात हळद आणि मालवणी मसाला घालून २ मिनिटे चांगला परतून घ्यावा .
  5. कुळथाचे पीठ घालून घ्यावे आणि मसाल्यात चांगले ढवळून घ्यावे. गरज वाटेल तेवढे पाणी घालून पिठलं हवे तेवढे पातळ करावे. फार जास्त घट्ट आणि पातळ ठेवू नये. हे पिठले कोकणी घरांमध्ये भाताबरोबर जास्त खाल्ले जाते.
  6. आपण ४ कप पाणी घातले आहे. मीठ घालून घेऊ. मोठ्या आचेवर पिठल्याला चांगली उकळी येऊ देऊ. उकळी आली कि आच मंद करून झाकण घालून पिठलं शिजू देऊ.
  7. ५ मिनिटे शिजवल्यावर पिठले घट्ट होऊ लागते. कोकम घालून झाकण न घालता अजून २ मिनिटे शिजू देऊ. पीठीचा कच्चेपणा दार झाला कि समजाव पिठले शिजले. आता खवलेला नारळ आणि कोथिंबीर घालून १ मिनिट शिजवून घेऊ.
  8. पिठले तयार आहे . गरमगरम भाकरी किंवा भातासोबत वाढावे. सोबत एखादा पापड भाजलेला मिळाला कि क्या बात !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/kuilth-pithla-recipe-in-marathi/