Solapuri Kala Masala recipe in Marathi |सोलापुरी काळा मसाला
Author: Smita Mayekar Singh
Ingredients
किती बनेल : ५५० ग्रॅम्स
साहित्य:
मसाले कोरडे भाजण्यासाठी :
8 ग्रॅम जिरे
8 ग्रॅम खसखस
8 ग्रॅम बडीशेप
8 ग्रॅम मोहरी
3 ग्रॅम शाही जिरे
8 ग्रॅम पांढरे तीळ
1-2 ग्रॅम जायफळ
3 ग्राम दगडफूल
मसाले थोड्या तेलात भाजण्यासाठी :
100 ग्रॅम्स बेडगी सुक्या लाल मिरच्या रंगासाठी
150 ग्रॅम्स पांडी सुक्या लाल मिरच्या तिखटपणासाठी - पांडीच्या ऐवजी संकेश्वरी किंवा लवंगी मिरच्या वापरल्या तरी चालतील
3 ग्रॅम्स दालचिनी
3 ग्रॅम जावित्री
3 ग्रॅम चक्रीफूल
3 ग्रॅम मसाला वेलची
3 ग्रॅम मायपत्री
3 ग्रॅम नागकेशर
3 ग्रॅम तिरफळे
3 ग्रॅम काळी मिरी
2 ग्रॅम मेथी दाणे
3 ग्रॅम लवंग
3 ग्रॅम हिरवी वेलची
मसाले तेलात तळण्यासाठी :
60 ग्रॅम सुके खोबरे
70 ग्रॅम लांब आणि पातळ चिरलेला कांदा
5 ग्रॅम हिंगाचा खडा
3 ग्रॅम सुंठेची गाठ
10 ग्रॅम हळकुंडे
5 ग्रॅम तमालपत्र
50 ग्रॅम धणे
इतर साहित्य:
तळण्यासाठी तेल
1 टेबलस्पून जाडे मीठ / खडे मीठ
Instructions
कृती:
मसाले भाजण्यासाठी एका मोठ्या शक्यतो लोखंडी किंवा नॉनस्टिक कढईचा वापर करावा . एक मोठे उलथणे किंवा सिलिकॉन स्पॅचूलाचा वापर करावा. सर्वप्रथम आपण जे मसाले कोरडे भाजायचे आहेत ते भाजून घेऊ. कृपया मसाले भाजताना एकत्र ना भाजता वेगवेगळे खरपूस भाजावेत. प्रत्येक मसाला हा वेगवेगळ्या तापमानावर स्वतःचे सुगंध आणि गुणधर्म बदलतो म्हणून ते भाजताना तापमानाची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. तरच मसाला हा जास्त स्वादिष्ट आणि फार काळ टिकतो. आच शक्यतो मंद ते मध्यम ठेवावी . मसाले कोरडे भाजून घेतल्यावर एका मोठ्या परातीत बाजूला काढून थंड होऊ द्यावेत.
आता आपण जे मसाले थोड्या तेलात भाजायचे आहेत त्यांना भाजून घेऊ. त्याच कढईत २ टेबलस्पून तेल घालून घेऊ आणि एकेक मसाला मंद आचेवर भाजून घेऊ. बिलकुल घाई न करता एकेक मसाला त्याचा सुगंध दरवळे पर्यंत छान खरपूस भाजावा. गरज लागली तर थोडे थोडे तेल आपण आणखी घालून मसाले भाजू शकतो. हे लक्षात घ्यावे कि हा मसाला नावाप्रमाणेच गडद करड्या रंगाचा काळसर असतो. मोठ्या आचेवर मसाला भाजला तर करपू शकतो आणि करपलेला मसाला फेकून देण्याशिवाय गत्यंतर उरत नाही . जेव्हा आपण मिरच्या भाजतो तेव्हा त्या अगदी चुरचुरीत भाजायच्या आहेत. मसाले भाजून झाले की थंड होण्यासाठी परातीत काढून घ्यावेत.
सगळ्यात शेवटी आपण जे मसाले तेलात तळायचे आहेत त्यांना तळून घेऊ. अर्धा कप तेल कढईत घालू आणि मंद आचेवर एकेक मसाला खरपूस करड्या रंगावर तळून घेऊ. मसाले तळताना त्यांच्या रंगामुळे तेल थोडे काळसर होते, परंतु याच तेलात सारे मसाले तळून काढावे. हे मसाले देखील परातीत काढून थंड होऊ द्यावे.
सारे मसाले थंड झाल्यावर आपण त्यांना थोडे थोडे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ. पहिल्यांदा कोरडे भाजलेले मसाले वाटावेत, नंतर थोड्या तेलात भाजलेले मसाले , तेलात तळलेले मसाले आणि सगळ्यात शेवटी लाल मिरच्या वाटून घ्याव्यात . मिरच्या वाटतानाच त्यात खडे मीठ घालून फिरवावे म्हणजे मीठ चांगले मिसळले जाते.
सगळे मसाले वाटून झाले की हातात ग्लोव्हस घालून किंवा मोठ्या उलथन्याने हे सर्व मसाले एकत्र मिसळून घ्यावेत. चांगले ५ -६ मिनिटे त्यांना मिसळत राहावे जेणेकरून ते चांगले मिसळून जातील.
आपला साठवणीचा काळा मसाला तयार झाला आहे , एका घट्ट झाकणाच्या बरणीत हा भरून ठेवावा . त्यात एक हिंगाचा खडा घालावा आणि बरणीच्या झाकणाला कापड गुंडाळून ठेवावे. जर तुम्ही दमट वातावरणात राहत असल्यास हा मसाला एका झिपलॉक पिशवीत भरून फ्रिजमध्ये ठेवला तरी वर्षभर टिकतो.
महत्त्वाची टीप:
कांदा तळताना लवकर ब्राऊन व्हावा म्हणून चिरल्यानंतर २-३ तासांसाठी एका ताटात पसरवून उन्हात वाळवून घ्यावा. त्याचे पाणी सुकून जाते आणि विश्वास ठेवा रेकॉर्ड ब्रेकिंग कमी वेळेत चटकन तळून होतो.
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/solapuri-kala-masala-in-marathi/