200 ग्रॅम्स तीळ ( पॉलीश न केलेले गावठी तीळ घेतले तर उत्तमच )
200 ग्रॅम्स चिक्कीचा गूळ
100 ग्रॅम्स =१/२ कप शेंगदाणे
50 ग्रॅम्स =1/2 कप किसलेले सुके खोबरे
2 टेबलस्पून तूप
1 टीस्पून वेलची पावडर
Instructions
कृती :
एका कढईत शेंगदाणे भाजायला घेऊ. कढई चांगली तापवून मध्यम आचेवर सतत हलवून शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घेऊ. तिळाच्या लाडवांची सामग्री भाजताना एकच दक्षता घ्यावी कि कोणतीही वस्तू करपू देऊ नये. नाहीतर लाडवांची चव खराब होते. शेंगदाणे एकसमान भाजून झाले ( लागणारा वेळ : ८ मिनिटे ) की एका ताटलीत काढून पूर्णपणे थंड झाल्यावरच त्यांच्या साली काढाव्यात!
त्याच कढईत आपण आता तीळ भाजून घेणार आहोत. थोडे थोडे तीळ घालून आपण ते हलक्या करड्या रंगावर छान परतून घ्यायचे आहेत. जितके तीळ छान चुरचुरीत भाजले जातील ना तितके लाडू मस्त चुरचुरीत बनतात. तीळ भाजून एका ताटलीत काढून थंड होऊ द्यावेत.
आता किसलेले सुके खोबरे भाजून घेऊ. खोबरे बारीक किसलेले असले तर ते लाडवाचा मिश्रणात चांगले एकजीव होते.
भाजलेल्या शेंगदाण्यांना हलके कुटून घेऊ जेणेकरून त्यांचे फक्त एका दाण्याचे २ तुकडे होतील. जास्त बारीक पावडर करू नये. सारी भाजलेली सामग्री एकत्र मिसळून घेऊ.
कढईत २ टेबलस्पून तूप वितळवून घेऊ. मंद ते मध्यम आचेवर गूळ विरघळून घेऊ. आपण गूळ मंद आचेवर ७ मिनिटे शिजवून घेतला आहे. गुळाचा पाक गोळीबंद झाला आहे कि नाही हे पाहण्यासाठी गुळाच्या पाकाचे काही थेंब एका पाणी भरलेल्या वाटीत टाकावेत. जर ह्या पाकाची हातात गोळी बनत असेल आणि ताटात आपटल्यावर टणकन आवाज येत असेल तर समजावा कि गुळाचा गोळीबंद पाक तयार झाला. या उप्पर जर गूळ शिजवला तर लाडू अतिशय टणक होतात.
वेलची पूड घालून गॅस बंद करावा. या गुळाच्या पाकात बाकीचे सारे मिश्रण मिसळून घ्यावे.
आता खरी परीक्षेची वेळ, हाताच्या तळव्यांना तूप चांगले चोपडून लाडवांचे मिश्रण गरम असतानाच लाडू वळायला सुरुवात करावी. थोडे हाताला चटके बसतात परंतु तूप हाताला लावले तर थोडे कमी जाणवतात . छोटे छोटे लाडू बांधून घ्यावेत. लाडू वळता वळता जर मिश्रण थंड होऊन कोरडे पडले तर परत मंद आचेवर फक्त ३० सेकंड गरम करून परत लाडू वळावेत. लाडू वळून झाले कि एका घट्ट हवाबंद झाकणाच्या डब्यात भरून ठेवावेत.
महत्त्वाची टीप: जेव्हा आपण तीळ भाजून घेत असतो तेव्हा तिळाचा एक भरणा भाजून थंड झाला की मग लगेच एका हवाबंद डब्यात भरून ठेवावा म्हणजे बाहेरच्या हवेने तीळ नरम न पडता खुसखुशीत राहतात आणि पर्यायाने आपले तिळाचे लाडू सुद्धा !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/tilache-ladoo-in-marathi/