“दिवा पाहुनि लक्ष्मी येते
करुं तिची प्रार्थना, करुं तिची प्रार्थना
शुभं करोती म्हणा, मुलांनो, शुभं करोती म्हणा ॥१॥
जेथे ज्योती तेथे लक्ष्मी
उभी जगाच्या सेवाधर्मी
दिशा दिशांतुनि या लक्ष्मीच्या
दिसता पाऊलखुणा – शुभं करोती म्हणा, मुलांनो, … ॥२॥
या ज्योतीने सरे आपदा
आरोग्यासह मिळे संपदा
शत्रुबुद्धिचा विनाश होता
सौख्य मिळे जीवना – शुभं करोती म्हणा, मुलांनो,….॥३॥
दिव्या दिव्या रे दीपत्कार
कानीं कुंडल मोती हार
दिव्यास पाहुन नमस्कार,
हा रिवाज आहे जुना
शुभं करोती म्हणा, मुलांनो,शुभं करोती म्हणा ॥४॥”
आपल्या भारतीय संस्कृतीत ३३ कोटी देवी देवतांचे जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व हे विश्व ज्या पंचमहाभूतांनी बनलंय त्यांनासुद्धा आहे . पृथ्वी, आप ( पाणी) , तेज ( अग्नी ) , वायू आणि आकाश ! यांच्याशिवाय ही विश्व निर्मिती निव्वळ अशक्य ! अग्नी हा बाह्य रीतीने मनुष्याला जिवंत ठेवण्यासाठी लागणारा आहार शिजवण्यासाठी जितका महत्त्वाचा तितकाच तो खाल्लेले अन्न पचविण्यासाठी लागणाऱ्या जठराग्नीच्या स्वरूपातही अत्यंत गरजेचा!
म्हणूनच आपले पूर्वज आयुर्वेदाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा संदेश आपल्यासाठी देऊन गेलेत . ऋतुमानाप्रमाणे आपल्या आहारात, सवयींत योग्य ते बदल करून जगल्यास शरीर हे रोगांचे नाही तर उत्तम आरोग्याचे मंदिर बनेल. साधारणपणे आषाढ महिन्याच्या शेवटी ग्रीष्म ऋतूची सांगता होऊन श्रावण महिना पावसाची वर्षा संगे घेऊन येतो . श्रावण महिना म्हटलं की पक्क्या मांसाहारी लोकांच्या पोटात गोळा येतो , ” अर्रे बापरे , कसा पाळायचा श्रावण “! परंतु श्रावण महिन्यातल्या शाकाहाराचे आणि धार्मिक सणांचे महत्त्व हे आपल्या आरोग्याला धरूनच आहे, हे कळले तर काहीच अशक्य नाही ! वर्षा ऋतूत पडणाऱ्या पावसाच्या पाण्यात वाढलेले आम्ल , भाजीपाला-फळं , व पिके वाढणीला असताना त्यावर झालेला कीटकनाशकांचा फवारा , जलचरांचा ( मासे , खेकडे वगैरे ) कुटुंबवृद्धीचा काळ आणि मुख्य म्हणजे मंद झालेला शरीरातील जठराग्नी , या अशा बऱ्याच कारणांमुळे पचायला जड असा आहार आणि मांसाहार आरोग्यासाठी थोड्या अडचणी निर्माण करतो. अपचनाचे विकार , मलावरोध यांसारख्या अडचणी मन कुठल्याही कामात एकाग्र होऊ देत नाही ! त्यातून होणारी चिडचिड हे मानसिक स्वास्थ्य सुद्धा ढासळवू लागते. ह्याच गोष्टी टाळण्यासाठी श्रावणात साध्या , सात्त्विक आहाराला उत्तेजना देण्यासाठी आपल्या धर्माने ऋतुमानाप्रमाणे खाण्यापिण्याची सांगड ही सणासुदींशी घातली आहे . जेणेकरून सणांमुळे मानसिक समाधान आणि सात्त्विक , पचायला हलक्या आहारामुळे शरीरही टुणटुणीत!
आषाढी अमावस्या ही महाराष्ट्रात ” गताहारी अमावस्या ” किंवा ” दीप अमावस्या ” म्हणून साजरी केली जाते . मागच्या ऋतूतील आहार म्हणजेच गताहार करण्याचा हा शेवटचा दिवस आणि त्यानंतर येणारा सात्त्विक श्रावण महिना ! या दिवशी बहुतेक महाराष्ट्रीय घरांत आखाडी अगदी जोशात साजरी होते. प्रत्येकाच्या खिशाला परवडेल असे निरनिराळे मांसाहाराचे व्यंजन बनवले जातात . पुढच्या दिवसांत ऋतुमानात आणि आहारात होणारे बदल अंगिकारण्यासाठी केला जाणारा हा गताहाराचा दिवस, दुर्दैवाने ही अमावस्या ” गटारी अमावस्या ” अशा अपभ्रंशाने बदनाम झालीये याचे थोडेसे वाईट वाटते . परंतु जर आपण स्वतःला याचे मूळ स्वरूप माहित असेल तर समाजातून असले गैरसमज दूर व्हायला कितीसा वेळ लागणार, नाही का ?
आता थोडेसे या अमावास्येच्या ” दीप अमावस्या ” स्वरूपाविषयी जाणून घेऊ. हिला “दिव्यांची अवस ” किंवा ” दिवली अमावस्या ” असेही म्हटले जाते . जसे मी सुरुवातीला म्हटले तसे अग्नीदेव हा सर्वांच्या मध्य स्थानी ! आपल्याकडे पूजेला, लग्नाला इतकेच काय सणासुदीच्या दिवशी चुलीला अग्निदेवतेचा नैवेद्य दाखवल्यानंतरच अन्न ग्रहण करायचा रिवाज आहे . ” दीप” म्हणजेच दिवा हा अग्नीचा स्रोत ! त्यातील तेल म्हणजे मनुष्याच्या अंतर्मनातील वाईट विचार , वाईट सवयी , दुर्गुण यांचे प्रतीक … आत्मयारूपी कापसाची वात जाळून आपण आपल्या मनातील आणि आजूबाजूचा अंधकार जाळून टाकतो हेच या दिव्याचे महत्त्व! संध्याकाळी हात पाय धुऊन दिवेलागणीच्या वेळेला ” शुभं करोति” म्हणताना आपण याच शत्रुबुद्धीचा विनाश होवो अशीच ईश्वराकडे प्रार्थना करतो! माझी आजी जसा आखाडाचा शेवटचा आठवडा जवळ आला की फर्मान सोडायची ” मेल्यानो तुम्हाला काय ते मटण , कोंबडी आणायचेय ते आधीच्या रविवारी आणा , अवसेला दिव्यांना पुजायचेय , त्या दिवशी नाही हो मी करू द्यायची !” आता आजीची आज्ञा मोडायची काय कोणाची बिशाद , आमची ही ” गताहारी” आधीच साजरी व्हायची .आणि मग दीप अमावस्येच्या दिवशी आजी आणि आई आदल्याच दिवशी छान घर झाडून पुसून , जळमटे काढून तयार व्हायच्या . सकाळीच आई पहाटे उठून दाराबाहेर आणि देव्हाऱ्यासमोर रांगोळी काढून साग्रसंगीत पूजा करायची . या दिवशी तसे सगळे दिवे , निरांजने घासून पुसून लख्ख केले जायचे , परंतु मला वक्तृत्व स्पर्धेत पहिले बक्षिस मिळालेला पितळेचा लामण दिवा बराच भाव खाऊन जायचा . देव्हार्याच्या बाजूला लावलेल्या खिळ्यावर त्याची साखळी अडकवून त्यात पंचारती सजवली जायची . चारी दिशा उजळून अंधकार नाहीसा व्हावा हीच त्यामागची भावना ! दिव्यांच्या नैवेद्यासाठी कधी खीर पुरी , कधी चुणाचे लाडू तर कधी खीर , बासुंदी असा नैवेद्य बनायचा! महाराष्ट्रात काही भागांत कणकेचे आणि गुळाचे दिवे बनवून त्यात तुपाची वात पेटवतात आणि प्रसाद म्हणून हेच दिवे ग्रहण करण्यासाठी दिले जातात . किती छान पद्धत आहे ना !
प्रत्येक सण साजरा करताना आजी आम्हाला त्या त्या सणाचे महत्त्व सांगायची, आमच्याकडे एक पुराणकथांचे पुस्तक आहे , कधी त्यातून तर कधी पोथ्यांमधून! दिव्यांच्या अवसेची अशीच एक इंटरेस्टींग गोष्ट जी मला आजीने सांगितलेय ती सांगते हां…. ” आटपाट नगरात एका राजाची सून होती , अगदी हुशार , देखणी , गृहकृत्यदक्ष आणि सुशील ! एके दिवशी त्यांच्या मुदपाकखान्यात अन्नाची नासाडी झाली . अनवधानाने सुनेने आरोप केला उंदीर मामांवर ! उंदीर मामांना आपल्यावर विनाकारण बालंट आल्याचा प्रचंड राग आला . मग रागाने आपल्या मिशा फिस्कारत त्यांनी राजाच्या सुनेला धडा शिकवायचा ठरवले . उंदीरमामांनी केलेलया काही खोडसाळपणाने राजा सुनेवर चिडला आणि तिचे काही न ऐकता तिला राजवाड्याबाहेर हाकलवून दिले . गरीब दीनवाणी ती जंगलात झोपडे बांधून उदरनिर्वाह चालवू लागली . एके दिवशी राजा शिकारीला जंगलात गेला , रात्र खूप झाल्याने थकलेला राजा एका गर्द वृक्षाखाली विसावला . त्या दिवशी दिव्यांची दिवस होती . नगरातले सारे दिवे मानवी रूप धारण करून त्या झाडावर जमून कोणाकोणाच्या घरी दिव्यांची कशी सरबराई झाली, काय नैवेद्य बनवण्यात आला होता अशा गप्पा मारीत बसले होते . राजाच्या राजवाड्यातील दिवा मात्र एकाकी एका फांदीवर बसून अश्रू गाळीत होता . त्याची विचारपूस केल्यावर तो म्हणाला , ” काय सांगू बाबांनो , मी राजवाड्यातील दिवा , राजाची सून मोठ्या गुणांची! दिव्यांच्या अवसेच्या दिवशी माझी इतकी लक्ख पुसून काळजी घ्यायची , गोडधोडाचा नैवेद्य बनवायची , परंतु आता ती नाही तर माझी ही दुर्दशा ! कोणीही मला विचारतदेखील नाही ,उंदराने केलेल्या चुकीमुळे ती नाहक शिक्षा भोगतेय!” असे म्हणून त्याने घडलेला सारा वृत्तांत आपल्या मित्रांना सांगितला! खाली बसलेला राजा हे सारे संभाषण ऐकत होता , त्याला लागलीच आपली चूक कळली ! राजवाड्यात परतताच त्याने सैनिकांबरोबर मेणा पाठवून सुनेला मानसन्मानाने परत घरी आणले . तर अशी ही दिव्यांची अवस राजाच्या सुनेला फळली तशी तुम्हा आम्हासही फलो ही प्रार्थना!”
काय कशी वाटली गोष्ट तुम्हाला , या गोष्टीत तथ्य किती , हे मी नाही सांगू शकत परंतु त्यातून मिळालेला संदेश आजीने आमच्या मनावर ठामपणे बिंबवला आहे ,” कधी काही कोणासाठीही केलेले चांगले कर्म , नेहमी चांगलेच फळ देते !”
आज सकाळी दिवे घासताना अचानक मनात आलेल्या या आठवणींनी न राहवून ब्लॉग लिहायला घेतला . आजच्या दिवसासाठी काही गोडाचे पदार्थ खाली लिंक देत आहे , नक्की वाचा आणि करून पहा ! हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला सांगायला विसरू नका , खाली कॉमेंन्टमध्ये !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा
Deep Amavasya recipes: –Mawa Gujiya
Leave a Reply