कसले धुंद वातावरण झालेय बाहेर, असे वाटतेय मेघ बरसतिल आणि नेमके रेडियो वर गाणे लागलेय , लता जिंच्या मधुर आवाजातले “घन ओथंबून येती, बनांत राघू ओगिरती, पंखावरती सर ओघळती, झाडांतून झडझडती” !!
असे काहीही झाले नाहीए, मला भजी खायची प्रचंड इच्छा झालीय आणि मला गोल गोल बटाटे खूणवत्यात की, अग बाई खा मला , जिमचे ट्रान्सफॉर्मशन चॅलेंज सुरु झाल्यापासून हे बटाटे तसे दुर्लक्षित राहिले होते. जाऊ दे.. बिचा र्याची शेवटची इच्छा पूर्ण करते, आज डाएट बीएट जाऊ दे तेल लावत .
म्हणजेच तेलाच्या कढईत हो .. मुंबईच्या वडा पाव नंतर जर काही मुंबईकरांच्या जिभेला भावत असेल, केव्हाही कधीही… तर आहे हा बटाटा भजी पाव! “छोटी छोटी भूक टाडा डा डा … “ बघा काय अगदी मनमोराचा पिसारा फुललाय भजीचा विषय निघाल्यावर …
घ्या तर मग खमंग कुरकुरीत बटाट्याची भजीची रेसिपी..
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा

- १ कप = १५० ग्रॅम्स बेसन ( चण्याच्या डाळीचे पीठ )
- २ मोठे बटाटे , २०० ग्रॅम्स
- १ टेबलस्पून रवा
- १ टीस्पून हळद
- १ टीस्पून लाल मिरची पूड
- मीठ गरजेनुसार
- तेल
- १ इंची आल्याचा तुकडा
- ५-६ लसणीच्या पाकळ्या
- २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
- १ टीस्पून जिरे
- २ हिरव्या मिरच्या
- सर्वप्रथम हिरवे वाटण बनवून घेऊ. एका मिक्सरच्या भांड्यात जिरे, आले-लसूण, हिरव्या मिरच्या , कोथिंबीर व १ टेबलस्पून पाणी घालून बारीक वाटून घेऊ.
- एका भांड्यात हिरवा मसाला , बेसन , रवा, लाल मिरची पूड, हळद, आणि चवीनुसार मीठ घालून घेऊ. त्यातच १ टेबलस्पून कडकडीत गरम तेल घालून घेऊ. मिक्सरच्या भांड्यात जवळजवळ पाऊण कप पाणी घुसळून घेऊन या मिश्रणात हळू हळू मिसळून एक छानपैकी बॅटर तयार करून घेऊ.
- हे बॅटर जितके चांगले फेट्ले जाते तितकेच भजी हलक्या बनतात . बॅटर थोडा वेळ झाकून ठेऊ.
- आता बटाट्याच्या पातळ चकत्या कापून घेऊ. त्यांना थंड पाण्यात बुडवून ठेवू जेणेकरून ते काळे पडणार नाहीत.
- भजी तळायला सुरुवात करू. तेल मोठ्या आचेवर चांगले गरम करून घेऊ. तेलाचे तापमान पाहण्यासाठी त्यात बॅटर चे २-३ थेंब घालून पाहावे, जर ते टाळून त्वरित तेलाच्या पृष्ठभागावर तरंगू लागले म्हणजेच आपले तेल नीट गरम झाले आहे.
- बटाट्याच्या चकत्या बेसनात नीट घोळवून तेलात हलकेच सोडाव्यात . भजी तळताना आच मध्यम ठेवावी.
- बॅटर नीट फेटलेले असले की भजी छान फुगतात आणि तेलसुद्धा जास्त शोषून घेत नाहीत. दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर भाजी तळून घ्याव्यात. किचन टिश्यू पेपरवर काढून घ्याव्यात.
- गरमागरम भजी आणि वाफाळता कटिंग चहा मस्त कॉम्बिनेशन !
- भजी कुरकुरीत होण्यासाठी रवा किंवा तांदळाचं पीठ बॅटरमध्ये जरूर घालावे.
- कडकडीत तेलाचे मोहन घातल्याने भजी क्रिस्पी होतात .
- बॅटर बराच वेळ फेटल्याने हलके होते आणि भजीसुद्धा ! मग बेकिंग सोडा वगैरे वापरायची गरजच भासत नाही !

Leave a Reply