काल काही कामानिमित्त एफ सी रोडला ( फर्ग्युसन कॉलेज रस्ता, पुणे ) जाणे झाले . सकाळी सकाळी ७. ३० च्या विरळ ट्रॅफिकचा फायदा घेत उबर कॅब ने वेग घेतला . सेनापती बापट रोड ला जशी कॅब वळली तसे थंड हवेच्या झुळुका खात मन रहदारी पाहण्यात गुंतले.
सहज माझी नजर गेली ” महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ , बालभारती” आणि मन लागले ना हिंदोळे झुलायला !प्राथमिक शाळेचे इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग, तिथली इवली इवली बाके आणि नव्या कोऱ्या पुस्तकांचे सुवास ! बालभारतीचे पुस्तक आठवतेय का हो तुम्हाला .. ती दोन वेण्या घातलेली ताई आणि तिच्या सोबत बालभारतीचे पुस्तक वाचणाऱ्या छोट्या भावाचे चित्र …. बालभारतीच्या पुस्तकाचा तो लोगो होता जणू ! १३ जूनला शाळा सुरु व्ह्याच्या १ आठवडा आधीच नवी कोरी पुस्तके आणली जायची. मी बाकी सारी पुस्तके फक्त पाने नीट आहेत कि नाही एवढे बघण्यापुरतेच चाळायची परंतु बालभारतीचे मराठी पुस्तक मात्र पूर्ण वाचून काढायचे . मला खूप आवडायच , एकतर वाचनाची आवड मला आईने फार लहानपणीच अंगवळणी पाडली होती आणि दुसरे म्हणजे ते पुस्तक इतक्या रंगीबेरंगी चित्रांनी बहरलेले असायचे, की कितयांदा चाळले तरी डोळ्याचे पारणे फिटायचे नाही. मग एखाद दुसरी कविता किंवा गोष्ट पाठ करून ,शाळेतल्या बाईंनी तो धडा किंवा कविता शिकवताना आमची कॉलर आधीच टाईट असायची ! आगाऊपणा नुसता अजून काय 🙂
घरी परत आल्यावर सहजच इंटरनेट वर बालभारती संबधीत काही माहिती मिळते का म्हणून शोधले आणि चक्क मला अलिबाबाचा खजिनाच मिळाला जणू !
https://balbharatikavita.blogspot.com या वेब साईटवर दुर्मिळ अशा बालभारतीच्या पुस्तकात प्रकाशित झालेल्या कवितांचा संग्रह आहे .
उद्या आपले नवीन वर्ष सुरु होणारेय , चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडव्याचा सण ! या अनुषंगाने ” चैत्र पाडवा ” या नावाची मंगला गोखलेंची कविता गुढीपाडव्याचे महत्त्व किती सुंदर शब्दांत वर्णन करते पहा ,
” घराघरांवर उभारूया गुढी , मनामनांतील सोडून अढी , संदेश असा हा देई मानवा , चैत्र प्रतिपदा गुढीपाडवा !”
( पूर्ण कवितेचा रसास्वाद घेण्यासाठी या लिंक वर वाचा )
वसंत ऋतूच्या आरंभाचा बिगुल वाजवणारा हा सण ! चैत्राची नेत्रसुखद कोवळी पालवी आणि रखरखता वैशाखवणवा यांच्या मिलनाचा महोत्स्व- वसंतोत्सव !
गुढीपाडव्याला गुढी उभारणे हे एक विजयध्वजाचे प्रतीक आहे ! मग तो विजय रामाने रावणावर मिळवलेला असो की मनुष्याच्या शरीरातील त्रिदोषांनी म्हणजेच कफ, वात आणि पित्त यांनी एकमेकांशी सांगड घालून निरोगी राहण्यासाठी मिळवलेला असो ! हेमंत ऋतूतील वाढलेल्या कफाचे निवारण करण्यासाठी, आणि पुढे येणाऱ्या ऋतूबदलासाठी , पित्तदोष कमी करण्यासाठी , आहारात कटू रसाचा समावेश करा हे सांगण्यासाठीच गुढीवर कडुनिंबाचा पाला बांधण्यात येतो . खडीसाखर तब्येतीला थंड आणि उष्णतेपासून बचाव करण्यासाठी तिचा हार घालून गुढी नटते ! ध्वज विजयाचा उंच धरा रे , म्हणूनच लांबलचक गुढीवर सुबत्तेचे प्रतीक म्हणून तांब्या उपडा लावला जातो!
खास करून गुढीपाडव्यापासून आमच्या घरी पाण्यात कडुलिंबाची पाने घालून अंघोळ करण्याची प्रथा आजही कायम आहे. पिकलेले आंबे या दिवशी देवापुढे ठेवून मगच त्याचे सेवन करावे या साठी आईबाबांची आजही धडपड असते. पाडव्याला गुढी उभारल्यानंतरचा कडू गोड अशा कडुनिंब आणि गुळाच्या चटणीचा प्रसाद तोंड वेडे वाकडे न करता खावा यासाठी आज्जी भले मोठे पुराण सांगायची! त्यानंतर जे स्वयंपाकघरात घमघमाट सुटायचे त्याला तोडच नाही . श्रीखंड पुरीशिवाय नैवेद्याचे पान हालतच नाही . आयुर्वेदाचार्य श्री बालाजी तांबे यांच्या विवरणातून असे समजते की श्रीखंड हा फक्त एक गोडाचा पदार्थ नसून त्याला आयुर्वेदात फार महत्त्वाचे स्थान आहे , त्याला संस्कृत भाषेत ” रसाला शिखरिणी ” असे संबोधले जाते . उन्हाळ्यात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी श्रीखंड हे माध्यम उपयोगी पडते.
खोलात विचार केला तर कितीतरी असे संदर्भ लाभतील जे हिंदू संस्कृतीच्या मुळाशी आहेत . मला वैयक्तिकरित्या असे वाटते की आपले सण साजरे करताना त्या मागची विचारसरणी जाणून घेतली तर त्या सणाचा आनंद द्विगुणित होतो , नाही का ? आता गुढीपाडव्याचेच बघा ना , ही परंपरा खरोखर एक ऊर्जा स्रोत आहे , एक प्राचीन काळापासून चालत आलेली आयुर्वेदिक परंपरा म्हटले तर हरकत नाही !
मंगला गोखले म्हणतायेत ना ,
” जुन्यास कोणी म्हणते सोने, कालबाह्य ते सोडून देणे , नव्या मनूचे पाईक व्हा, हेच सांगतो गुढीपाडवा!”
उद्या या नववर्षारंभी , चला बनवूया राजेशाही आम्रखंड! तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा

- २०० ग्रॅम्स आंब्याचा गर ( हापूस किंवा कोणताही गोड आंबा घेतला तरी चालेल )
- २५० ग्रॅम्स चक्का ( टांगून ठेवलेले दही ) - हे बाजारात विकतही मिळते
- ७५ ग्रॅम्स साखर
- १ टेबलस्पून चारोळी - ३० सेकण्ड तव्यावर भाजून
- आवडीप्रमाणे काजू, बदाम, आणि पिस्ता जाडसर कुटून किंवा त्यांचे पातळ काप करून
- १/२ टीस्पून वेलची पावडर
- १/४ टीस्पून जायफळ पावडर
- थोडे केशराचे धागे ( १ टेबलस्पून हलक्या गरम दुधात भिजवून )
- सर्वप्रथम चक्का म्हणजे श्रीखंडासाठी लागणारे घट्ट दही बनवण्यासाठी :
- आपल्याला २५० ग्रॅम्स चक्क्याची गरज आहे म्हणून आपण ८०० ग्रॅम्स दही एका मलमलच्या किंवा सुती पातळ कापडात बांधून २ तासांसाठी किचन ओट्यावर किंवा नळावर बांधून ठेवू. खाली दह्याचे पाणी म्हणजेच व्हे गोळा करण्यासाठी एक भांडे ठेवू. दोन तासांनी दह्याचे गाठोडे फ्रिजमध्ये याच प्रकारे ६ ते ७ तासांसाठी किंवा रात्रभर बांधून ठेवायचे आहे म्हणजे उरलेसुरलेले पाणीसुद्धा निघून जाईल . आपल्याला छान असा घट्ट मऊ चक्का मिळतो. चुकूनही २ तासांपेक्षा जास्त वेळ दही बाहेर टांगून ठेवू नये , आंबट होते .
- दह्याचे पाणी हे पौष्टिक असते ते फेकून न देता त्यात तांदळाचे पीठ, आले-लसूण-मिरच्या-जिरे यांची पेस्ट घालून घावन किंवा धिरडे बनवावेत . चविष्ट होतात .
- एका मोठ्या बाउल मध्ये चक्का , साखर घालून फेटून घ्यावे . दह्याच्या गुठळ्या राहू न देता साखर पुर्णतः विरघळेपर्यंत चांगले फेटून घ्यावे. इलेक्ट्रिक बीटर चा वापर केला तरी चालतो.
- आंब्याचा गर घालून नीट मिसळून घ्यावा. अगदी एकत्र चांगले फेटून घ्यावे. हे आपले आम्रखंड तयार आहे .
- आता आम्रखंडाला राजेशाही बनवण्यासाठी आटवलेली रबडी किंवा किसलेला खवा, मलाई बर्फी किंवा आंबा कलाकंद किसून घालावा ( ५० ग्रॅम्स )
- आता केशराचे दूध, वेलची पावडर , जायफळ पावडर घालून नीट मिसळून घ्यावे.
- काजू,बदाम, पिस्त्याचे काप आणि चारोळी घालून ढवळून घ्यावे. चारोळ्यांशिवाय श्रीखंडाला मजाच नाही बुवा !
- वाढण्याआधी किमान २ तास तरी फ्रिजमध्ये आम्रखंड थंड होऊ द्यावे.
- तळटीप : साखरेची मात्रा आपल्या आवडीनुसार आणि आंब्याच्या गोडव्यावर ठरवावी !

Leave a Reply