दक्षिण भारतासाठी आंतरिक ओढ कधी नी कशी निर्माण झाली हे मला नाही सांगता येणार , परंतु माझ्या जीवनातल्या महत्त्वाच्या टप्प्यांत आणि पर्यायाने खाद्यजीवनात, हा दक्षिण भारत नेहमीच हिरीरीने भाग घेत आलाय . ‘शिक्षण’, हाच मानाने आणि उत्तम जीवन जगायचा मार्ग आहे , असे मानणाऱ्या मुंबईतील मध्यमवर्गीय घरातला जन्म आणि त्यानंतर स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पंखांत बळ देणारी माझी आय टी तली नोकरी , ही कर्नाटकाची भेट ! घरापासून पहिल्यांदाच दूर , जिथे माता पिता जवळ नसताना , जीवाला जीव देणारे माझ्याच वयाचे सखे-सवंगडी ,हे सगळे कधी आपलेसे झाले कळलेच नाही!
…