महाराष्ट्रात हिरव्या पालेभाज्यांशिवाय स्वयंपाकाला पूर्णत्व येत नाही . थाळीत एखादी पालेभाजी असणे म्हणजेच चौरस आहाराची संकल्पना पूर्ण होऊ शकते. मळ्यातील कसदार मातीतले क्षार आणि जीवनसत्वांनी युक्त अशा या पालेभाज्या निरनिराळ्या रूपांत शिजवून आहारात समाविष्ट होतात- मग ती ओले खोबरे किंवा शेंगदाण्याचा कूट घालून केलेली भाजी असो, धिरडे किंवा थालीपीठ वा वाफवलेले फुणके असोत!
हिवाळा हा माझा प्रचंड आवडीचा ऋतू कारण या ऋतूत बाजारात सगळीकडे निरनिराळ्या पालेभाज्यांनी मनमोहक हिरवळ पसरवलेली असते. आठवड्याच्या शेतकरी बाजारातून परत येताना माझे पाकीट अक्षरशः रिकामे झालेले असते, परंतु मनात एक आनंदी मूल बागडत असते कि स्वयंपाकाला काय करू आणि काय नको !
आताशा ह्या वयात जेव्हा मी माझ्या घराची अन्नपूर्णा झालेय तर सगळ्या अन्न घटकांशी माझे सख्य आहे , परंतु माझ्या लहानपणी आपण जे हाडवैर म्हणतो ना तसेच काहीसे मी काही भाज्यांशी पंगा घेऊन ठेवला होता , उदाहरणार्थ – दुधी भोपळा, दोडके, शिराळे , कारले आणि सगळ्यावर मात म्हणजे मुळ्याची पालेभाजी. तसे आई मुळा चिरताना मुळ्याला मीठ लावून छान फोडी करून खायला द्यायची, तो करकरीत ताजा कच्चा मुळा खायला आवडायचा बरं का ! पण जसा तो पालेभाजीच्या रूपात फोडणीला पडला कि आम्ही मैत्रिणी आमच्या भातुकलीचे चंबू गबाळे आवरून पार टोकाला जिन्यावर खेळायला जायचो. तरी येताजाता कोणी तरी पचकायचेच ” कोणाकडे तरी मुळ्याची भाजी शिजतेय ” , माझा गोरामोरा झालेला चेहरा पाहून मैत्रिणी फिदीफिदी हसायच्या. तणतणत एकदा आईला म्हटलेले सुद्धा आठवतेय ” शी..ss कसली घाणेरड्या वासाची भाजी बनवतेस!” त्यानंतर ज्या माझ्या मैत्रिणी हसल्या होत्या ते मला हातावर फूटपट्टीचा मार खाऊन “अय्योओयू ” म्हणताना पाहूनच! ” अन्न हे पूर्णब्रह्म” मानणाऱ्या या धरतीत कुठल्याही प्रकारच्या अन्नाला नावे ठेवणे , हे संस्कारमान्य नाही हे तेव्हाच एका फूटपट्टीतच कळून चुकले होते.
जसे जसे मोठे होत गेले तसे या संस्कारांची शिदोरी आजवर उपयोगी पडत आहे. बरं ही मुळ्याची भाजी आणि माझ्यात आता एकदम समेट झाला आहे , कारण तिचे औषधी गुणधर्म अगणित आहेत. बाबांचे फुगलेले पोट मुळ्याची भाजी खाल्ल्यावर सकाळी अगदी साफ होऊन जाते, माझ्या ऍनिमिक मैत्रिणीला रक्त वाढण्यासाठी मुळ्याच्या पाल्याचा रस प्यायला वैद्यांनी सांगितलं होता. माझ्या वेट लॉस डाएट साठी रात्री वरणाबरोबर मी हि भाजी कधी कधी नुसती हि खाते. अगदी हलके वाटते सकाळी !
अरे सांगायलाच विसरले कि मी आता चिरायला घेतलीये मुळ्याचीच भाजी, आजीचे स्वर कानात घोळतायत , संत सावतामाळीचा अभंग म्हणतानाचे !
“कांदा, मुळा, भाजी
अवघी विठाई माझी
लसूण, मिरची, कोथिंबिरी
अवघा झाला माझा हरी
ऊस, गाजर, रताळू
अवघा झालासे गोपाळू
मोट, नाडा, विहीर, दोरी
अवघी व्यापिली पंढरी
सावता म्हणे केला मळा
विठ्ठल पायी गोविला गळा!”
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा

- ४ ताजे लहान आकाराचे मुळे = ७०० ग्रॅम्स , साली काढून स्वच्छ धुऊन
- मुळ्याचा ताजा पाला =२५० ग्रॅम्स , धुऊन कोवळ्या देठांसकट पाने वेगळी करावीत
- २ मोठे कांदे = १५० ग्रॅम्स लांब चिरून
- १/२ कप = ५० ग्रॅम्स किसलेले ओले खोबरे
- १/४ कप = ५० ग्रॅम्स चणा डाळ - धुऊन १ तास पाण्यात भिजवून
- ३-४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
- ५-६ लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून
- १ टीस्पून हळद
- मीठ
- तेल
- सर्वप्रथम मुळे आणि पाला बारीक चिरून घ्यावा. भाजी चिरल्यानंतर ती एका चाळणीत काढून घ्यावी जेणेकरून त्यातील अतिरिक्त पाणी निघून जाईल. भाजीत पाणी राहिल्यास अति शिजून भाजीला उग्र दर्प येतो.
- कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करावे . तेल तापले कि त्यात लसूण मिरचीची फोडणी करावी. लसूण गुलाबी रंगावर परतला गेला कि चिरलेला कांदा घालून चांगला पारदर्शक होईपर्यत मध्यम आचेवर परतावा.
- चण्याची डाळ घालावी . मंद आचेवर कांद्यासोबत जरा परतून थोडे मीठ घालावे. झाकण घालून शिजू द्यावे.
- ३ मिनिटे आपण चण्याची डाळ शिजू दिली आहे , आता हळद घालून १ मिनिट परतून घेऊ.
- चिरलेली भाजी घालून एकत्र मिसळून घेऊ. झाकण घालून पाणी अजिबात न घालता मंद आचेवर शिजू देऊ..
- १२ मिनिटे भाजी शिजवून घेतली आहे . मुळा आणि चण्याची डाळ चांगली शिजून नरम झाली आहे. आता चविनुसार मीठ घालून ढवळून घ्यावे.
- किसलेला ओला नारळ घालून भाजी छान एकत्र करून घ्यावी. नारळाची गोडसर चव भाजीत खूप छान लागते . गॅसवरून उतरवून गरम गरम भाकरी किंवा चपातीसोबत वाढावी. भातात मिसळून खायला तर एकदम चविष्ट लागते. डब्यासाठी उत्तम !

Leave a Reply